दोन विचारधारेचे अनोखे समन्वय
मकरंद साठे लिखित आणि आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘प्रस्थान ऊर्फ EXIT’ हे कोविडकाळानंतरचे साठेंचे पहिले नाटक आहे. नाटकात आलोकच्या दिग्दर्शनाखालील पात्रांची तगमग, सुप्त इच्छा, तुटलेपणाच्या व दडलेल्या भावना प्रकट होताना दिसतात. या नाटकात दोन कलाकारांचेच नाही, तर दोन पिढ्यांच्या विचारांचे अनोखे समन्वय पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि त्या निमित्ताने सतत एकमेकांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या दोन व्यक्तींच्या पार्श्वभूमीसोबत हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येते. यातील वृद्ध पुरुष केवळ फॅसिझमच जगाला वाचवू शकते, या तटस्थ मताचे रेल्वेतून निवृत्त झालेले एक अधिकारी आहेत. तर, त्यांची पत्नी ही शिकलेली, वाचनाची आवड व राजकीय विचारधारांचा अभ्यास असलेली, डाव्या विचारांची मध्यमवर्गीय गृहिणी आहे. दोन वयोवृद्धांबरोबर असलेले तिसरे पात्र म्हणजे यमदूत, जे नाटकाला विडंबनात्मक रूप देते.
गजानन परांजपे आणि सुहिता थत्ते यांनी साकारलेले हे वृद्ध जोडपे इंटरेस्टिंग वाटतात. दोघांपैकी एक जण मृत्यू पावलेला असला तरी ती व्यक्ती नेमकी कोण? याबद्दल संभ्रम आहे. कारण, मेलेली व्यक्ती आणि यमदूताच्या ऍपवर येणाऱ्या मेलेल्या व्यक्तीचे नाव वेगवेगळे आहे. यातून सुरू होणारा खेळ ट्रॅजिक वाटतो. त्यातून उलगडणारा आशय मग राजकारण, समाजकारण, अस्तित्व आणि मृत्यू अशा अनेक गोष्टींना भिडतो. मानवी जीवनातील निरनिराळ्या घटकांचा जसे की जीवन-मृत्यू, एकाकीपणाचे दुःख आणि ‘दुसऱ्या’ कोणासोबत राहण्यातून येणारी बंधने, नरक म्हणजे इतर लोक, स्वातंत्र्य, नंतर त्याचेही ओझे वाटणे या गोष्टी नाटकात दिसतात. शिवाय, रोज दिसणाऱ्या अनेक गोष्टी मार्मिकपणे मांडलेल्या दिसतात. डाव्या विचारसरणीच्या मांडणीतील चतुरपणा, जसे की चर्चिल सोईस्कर वाटणे, ‘आता नवीन तंत्रज्ञान आम्हाला शिकायचे नाही, आमची वृद्धांची पिढी सतत शिकतेच आहे’ हा संदर्भ, कम्युनिस्ट आणि फॅसिस्ट या दोन्ही बाजूंनी बोलताना दोन्ही बाजूंची उणीदुणीही काढताना पात्र दिसतात.
स्वतःचे मनोबल वाढवण्यासाठी हिटलरचे भाषण वाचणारे आजोबा आणि बिअरचा घोट घेत ६०च्या दशकातील संगीतावर नाचून दमल्यावर थकवा दूर करण्यासाठी चर्चिलचे भाषण वाचणारी आजी प्रेक्षकांना टिकवून ठेवतात. माणसांमध्ये वाढत चाललेला इगो आणि त्यातून निर्माण होणारी तेढ उत्तम उभी केलेली दिसते. वेळ घालवण्यासाठी काय करावे या गूढात अडकलेले हे वृध्ददाम्पत्य या नाटकात एकमेकांबद्दल अगदी टोकाच्या गोष्टी प्रेक्षकांना सांगतात आणि नंतर हा आमचा वेळ घालवायचा उपाय असल्याचे दाखवत हे नाटक येऊन पोहचते. शेवटी माणसाला पडणारे प्रश्न, वेळ, परिस्थिती सर्व काही बदलत असते. पण, अटळ असतो तो मृत्यूच! आणि म्हणून जोडप्यातील एकाच्या मृत्यूने नाटकाचे exit होते.