ती
परवा रात्री गावाहून फोन आला : ‘गावाकडच्या एका मावशीवर सामूहिक बलात्कार झाला असून, त्यानंतर तिचा खून करण्यात आला आहे.’ सुन्न होण्याचाही अवसर मिळू न देणारी ही घटना.
तरी, फोनवरची माहिती मी जसजशी ऐकत गेले, तसतसं मन फार अस्वस्थ होत गेलं.
तिचं लग्न ठरलं तेव्हा मी इयत्ता चौथीत असेन. तिला लग्न करायचं नव्हतं; पण योग्य वयात लग्न झालं नाही तर अनेक महिलांप्रमाणे तिच्यावरही ‘चारित्र्य’ नावाचं लेबल समाजाकडून लावलं जाणार म्हणून घरच्यांनी – तिची इच्छा नसताना – तिचं लग्न ठरवलं. लहानपणी तिच्या लग्नाचे फोटो बघताना मी तिला नेहमी एक प्रश्न विचारत असे : ‘तू इतकी उदास का होतीस तुझ्या लग्नात? तुला तर नवीन कपडे, बटणवाला फोन आणि अजून एक घर मिळणार होतं ना?” तेव्हा ती वस्तीतल्या इतर महिलांप्रमाणेच मला म्हणायची : “तुझं लग्न झालं की तुला कळेल.”
तिचा नवरा व्यसनाधीन होता. दारू पिऊन तो तिला रोज मारहाण करायचा. त्यातच हिला पहिल्या दोन्ही मुलीच झाल्यामुळे सासरच्यांकडून तिला जाच सुरू झाला. ह्या सर्व त्रासाला वैतागून ती माहेरी चोपड्याला राहायला आली. आमच्या मांग- महार-चांभारवाड्यातल्या बायका तिला विचारत असत : “तू सासरी का जात नाहीस?” ‘नवऱ्याला सोडून राहते म्हणून आपल्यासाठी ती उपभोगाचं साधन आहे,’ असा समज करून घेऊन त्या दृष्टिकोनातून तिच्याकडं वाईट नजरेनं पाहणारी पुरुषजमातही आसपास होतीच. वयोवृद्ध महिला तिला सांगत : “माणूसनि जात अशीच रास.” (पुरुषाची जात ही अशीच असते).
“दोन पोरींचा सांभाळ तू एकटी कशी काय करणार?’ ‘तू नवऱ्यासोबत राहत नाहीस…मग तुझ्या पोरींशी पुढं लग्न कोण करणार ? असे प्रश्न तिला विचारले जात असत. ह्या सर्व प्रश्नांना वैतागून ती पुन्हा सासरी परतली; पण सासरी काहीही बदललेलं नव्हतं. सगळी परिस्थिती आधीच्या सारखीच होती.
काही महिन्यांनी ती जेव्हा परत माहेरी परतली तेव्हा तिच्या गर्भात आता तिसरं बाळ आकार घेत होतं. असं असलं तरी सासरी असताना व्यसनाधीन नवऱ्यानं दोन जिवांच्या तिला मारहाण सुरूच ठेवली होती. काळा-निळा पडलेला तिचा देहच तिला झालेल्या मारहाणीच्या जुलमी रात्रींची कहाणी सांगत होता… ‘काहीही झालं तरी आता सासरी परत जायचं नाही!’ असा ठाम निश्चय करूनच ती आली होती. समाजाकडून विचारले जाणारे काळीज कुरतडणारे प्रश्न मात्र थांबले नव्हते. तिन्ही पोरांना शिक्षण देता यावं म्हणून ती गल्लीतल्या बायकांबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्या वेचायला जायला लागली. गावातले गल्ली-बोळ, दवाखाना, स्मशानभूमी अशा परिसरातून ती पिशव्या गोळा करायची व तीन ते पाच रुपये किलो या दरानं पिशव्या विकायची आणि येणाऱ्या तुटपुंज्या पैशातून उदरनिर्वाह भागवायची. दोन वर्षांपूर्वी तिच्या भावाचं लग्न ठरलं. विवाहित असूनही जर बहीण माहेरी राहत असेल तर अशा घरात मुलगी द्यायला आपल्या समाजात मुलीचे आई-वडील कचरतात. भावाच्या लग्नात आपल्यामुळे अडथळा येत आहे हे ओळखून तिनं दुसरीकडं स्वतःचं एक छोटंसं घर उभारलं आणि तिचे वडील व तीन लेकरं यांच्यासह ती त्या घरात राहू लागली.
सोमवारी नेहमीप्रमाणे मुलांना शाळेत पाठवून ती खांद्यावर पोतं टाकून पिशव्या वेचायच्या कामावर निघाली. मात्र, आज कामावर गेलेली आपली आई परत येणारच नाही, याची पोरांना काय कल्पना? एरवी दुपारीच काम आटोपून येणारी आई संध्याकाळचे सहा वाजून गेले तरीही घरी पोहोचलीच नाही म्हणून पोरं रडू लागली. नातेवाइकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. गावाच्या वेशीवर असलेल्या पाण्याच्या पाटाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याचं कळलं. तो मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत काटेरी झाडा-झुडपांमध्ये असल्याचंही समजलं.
विजेच्या प्रवाहाच्या धक्क्यामुळे – करंटमुळे – तिच्या देहावर फोड आले होते. मृतदेहाची ओळख पटली… ती महिला म्हणजे माझी अनितामावशी होती!
अशा वेळी सुरेश भट ह्यांच्या दाहक ओळी आठवून जातात :
पाहिले होते जिचे मी
भोगलेले प्रेत रानी
माय ती माझीच होती!
लेक ती माझीच होती!
आमच्या चोपडा भागात पुण्यातल्यासारखे कुणी ‘बाबा आढाव’ नाहीत आणि कागद-कचरा वेचणाऱ्या महिलांच्या हक्कांसाठी लढणारी त्यांची ‘कागद-काच-पत्रा’सारखी कोणती संघटनाही तिकडं नाही. तेव्हा, माहीत नाही, अनितामावशीला खरंच न्याय मिळेल की नाही ते… की या महाराष्ट्रात आजवर घडून गेलेल्या बलात्काराच्या असंख्य घटनांचा आणि त्यातूनही तड न लागलेल्या किती तरी घटनांचाच एक भाग बनून जाईल अनितामावशीबाबतचीही घटना? माहीत नाही…
मावशी, तुझ्यावर बलात्कार करून तुझा खून करणारे तर तुझे गुन्हेगार आहेतच; पण बदनामीच्या भीतीचं कारण पुढं करून हे प्रकरण दाबणारे-दडपणारेही तितकेच दोषपात्र आहेत. मी तुझ्यासाठी कुठपर्यंत लढू शकेन मला माहीत नाही…पण माझ्याच्यानं होऊ शकणारे सगळे प्रयत्न मी करत राहीन…
तुझ्याबाबतची बातमी ऐकल्यानंतर तुझी एक आठवण सतत येत राहिली : लहानपणी आई घरी नसतानाची गोष्ट. सायकलच्या चेनमध्ये माझं बोट अडकून ते रक्तबंबाळ झालं होतं. बोटातून वाहणारं रक्त थांबावं म्हणून माझ्या बोटावर तू रॉकेल ओतून रक्त थांबवलं होतंस…व रडणाऱ्या मला शांत केलं होतंस. तुझ्या माघारी तुझी ही प्रेमळ आठवण माझ्या मनात वाहतच राहील…सतत. आणि, ही वाहती आठवण थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही मी. ती आठवण वाहतीच राहायला हवीय मला…!
– छाया काविरे
# # # # # ## # #
फक्त १३.७ टक्के प्रकरणांतच
बलात्काराच्या आरोपींना शिक्षा
भारतात एका दिवसात बलात्काराची सरासरी ८७ प्रकरणं नोंदवली जातात. हा आकडा म्हणजे पोलीस-ठाण्यात ज्यांची नोंद झालेली असते अशाच केवळ घटना आहेत. मात्र, याशिवाय ग्रामीण भागात आदिवासी/बहुजन समाजातल्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची किती तरी प्रकरणं पोलीस-ठाण्यापर्यंत जातच नाहीत! कारण काय? तर ‘बदनामी होईल’ ही संबंधित मुली-महिलांना, त्यांच्या नातलगांना वाटणारी भीती. ह्या भीतीपोटी प्रकरण पोलीस-ठाण्यापर्यंत जातच नाही.
‘नॅशनल क्राइम रेकाॅर्ड्स ब्यूरो’च्या (एनसीआरबी – NCRB) अहवालानुसार, महिलांवर बलात्कार करून त्यांना मारून टाकण्याचं प्रमाण महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे.
महिलांविषयीच्या महाराष्ट्रातील गुन्ह्यांपैकी ९४ टक्के खटले प्रलंबित असल्याची माहिती या अहवालात आहे.
अहवालानुसार, महाराष्ट्रात रोज साहून जास्त महिलांवर बलात्कार होत असून त्यातील केवळ १३.७ टक्के प्रकरणांमध्येच आरोपींना शिक्षा होते.
महिलांवरील अत्याचाराच्या रोज १०८ घटना
एनसीआरबीच्या अहवालानुसार, सन २०२१ मध्ये महाराष्ट्रात महिलांच्या विरोधात दररोज १०८ गुन्हे घडले. या गुन्ह्यांची पोलीस-ठाण्यात नोंद झाली. राज्यात एकूण गुन्ह्यांत महिलांवरील गुन्ह्यांचं प्रमाण ६६ टक्के आहे. आरोपपत्र दाखल केलं जाण्याचं प्रमाण ८२ टक्के आहे. सन २०२१ मध्ये ‘इंडियन पीनल कोड’च्या (आयपीसी) विविध कलमांतर्गत महाराष्ट्रात महिलांविरुद्ध एकूण ३९ हजार ५२६ गुन्हे नोंदवण्यात आले.
सन २०१८ मध्ये ३५ हजार ४९७, सन २०१९ मध्ये ३७ हजार १४४ आणि सन २०२० मध्ये ३१ हजार ९५४ प्रकरणं नोंदवण्यात आली.
महाराष्ट्रातलं ‘खैरलांजी’, ‘कोपर्डी’, तसंच दिल्लीतलं ‘निर्भया’ अशा कित्येक प्रकरणांना न्याय मिळायला अनेक वर्षं जावी लागली. बलात्काऱ्यांच्या विरोधात तब्बल २० वर्षं लढा देणाऱ्या बिल्किस बानोचा शेवटी न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला.
जून २०२० च्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात रोहे तालुक्यात १४ वर्षांच्या मुलीवर गावातल्याच २२ वर्षांच्या तरुणानं बलात्कार केला व नंतर गळा आवळून तिची हत्या केली. तिचा मृतदेह गावाबाहेरच्या टेकडीवर टाकून देण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तरुणानं गुन्हा तर कबूल केला; पण चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया अजूनही सुरू आहे, तर याच गावात नोव्हेंबर २०२१ मध्ये दिवाळीच्या आधीच्या दिवशी पाच वर्षांच्या एका चिमुरडीवर ३५ वर्षांच्या नराधमानं बलात्कार केला होता.