स्त्री कोणत्याही जातीची, धर्माची असो…कोणत्याही शहरातली असो…तिच्यावर बलात्कार झालेला असो किंवा तिचा अपघात झालेला असो…तिची सामाजिक, प्रादेशिक आणि सांस्कृतिक ओळख कितीही वेगळी असो…ती रंगानं सावळी असो किंवा गोरी असो…या ‘ती’च्या, म्हणजेच समस्त स्त्रीच्या, संदर्भातल्या घटनांमध्ये/प्रकरणांमध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे तिच्या चारित्र्यावर लेबल लावण्याचा केला जात असलेला प्रयत्न.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी (ता. १७ जून) एक दुर्दैवी प्रकार घडला. कार चालवतानाचा व्हिडिओ बनवण्याच्या नादात तेवीसवर्षीय श्वेता सुरवसे ह्या तरुणीला जीव गमावावा लागला. ह्या अपघातात प्राणास मुकलेल्या श्वेताविषयीची माहिती सांगणारा परिचयवजा एक व्हिडिओ मी ‘मुंबई तक’वर तयार केला (लिंक Comment-box मध्ये). हा व्हिडिओ एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिलाय आणि शंभरहून अधिक लोकांनी व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. या कमेंट्समध्ये अनेकांकडून जे काही लिहिलं गेलं आहे ते नेहमीप्रमाणेच चारित्र्यावर शिंतोडे उडवणार आहे.
त्यातल्या काही कमेंट्स पाहा : –
– ‘कशाला गेली होती बाॅयफ्रेंडसोबत?’
– ‘श्वेता बॉयफ्रेंडबरोबर मजा मारायला गेली होती. असल्या (मुली) मेल्या तरी दुःख वाटत नाही.’
– ‘श्वेता एकटी बॉयफ्रेंडसोबत तिथं कशाला गेली होती?’
– ‘अतिस्वातंत्र्याचे दुष्परिणाम.’
पुण्यात गेल्या महिन्यात (ता. १९ मे) कल्याणीनगरमध्ये झालेल्या
कारच्या अपघातात टूव्हीलरवरील अश्विनी कोष्टा आणि अनीश अवधिया हे मृत्युुमुखी पडले. तेव्हाही अश्विनी आणि अनिश ‘फक्त मित्र (च)’ होते का’, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. जिवानिशी गेलेल्या अश्विनीकडं पाहताना ‘फक्त माणूस’ म्हणून आपण का पाहू शकत नाही? दोघांनाही आपला जीव गमावावा लागला ह्या निखळ वास्तवाकडं आपण तितक्याच निखळपणे कुठलीही शंका-कुशंका मनात न येऊ देता – पाहू शकत नाही का?
ऑफिसमध्येही एखादी महिला उच्च पदावर असली तर गृहीतच धरलं जातं की, तिचं मालकाशी किंवा तिच्या बॉसशी अफेअर असेल. ती यशस्वी असेल तर तिच्या ‘यशाचा शॉर्टकट’ म्हणून तिच्या त्या नात्याकडं पाहिलं जातं. (किंवा, ती नातं जोडण्यास राजी नसेल, इच्छुक नसेल तर बऱ्याचदा तिची प्रगती रोखली जाण्याचेही प्रकार काही ठिकाणी घडत असतात).
राजकारणातही अशीच स्थिती आहे. एखादी महिला किंवा तरुणी मोठ्या नेतेपदापर्यंत गेली असेल तर त्यापूर्वी ‘ती कुणासोबत तरी झोपूनच आली असेल (त्याशिवाय कशी एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलीय!)’ अशीच थेट चर्चा केली जाते. आणि, ही चर्चा फक्त पुरुषांकडून केली जाते असं नव्हे, तर स्त्रियाही अशा चर्चांमध्ये सहभागी होतात.
ह्यासंदर्भात अलीकडचंच एक उदाहरण देता येईल. शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाच्या अयोध्या पौळने लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान केला होता.
त्यावर शिंदे गटाच्या स्नेहल कांबळेने फेसबुक लाईव्ह करून ‘तिला छाती असेल तर तिची छाती दाबतील ना कोणी,’ अशी टीका पौळला उद्देशून केली होती. त्या लाईव्हवर ‘गोदरेजचं कपाट…सगळंच सपाट,’ अशा कमेंट्स काही पुरुषांनी केल्या होत्या. स्त्रीनंच स्त्रीच्या शरीराची लक्तरं उडवल्याचं हे उदाहरण आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईतील वसईत रोहित यादव या तरुणानं संशयातून आरती यादव या त्याच्या मैत्रिणीची अमानुष हत्या केली. लोखंडी पाना असंख्य वेळा तिच्या डोक्यात मारून त्यानं तिला दिवसाढवळ्या, भररस्त्यात संपवलं.
बहिणीवर बलात्कार झाला तर (किंवा वरील उदाहरणाप्रमाणे प्रेमप्रकरणातून तिचा कुणी खून केला तर) त्याचा राग येऊन बलात्काऱ्याचा खून भावानं किंवा बापानं केला अशा बातम्या कधी वाचनात येत नाहीत; पण मुलीनं प्रेमविवाह केला तर तिच्या भावानं, बापानं तिचा खून केल्याच्या बऱ्याच बातम्या वाचनात येतात.
पुरुष हा भित्रा आहे, तो बलात्काऱ्याला/खुन्याला भिडू शकत नाही; पण त्याच्यावर विश्वास असलेल्या आपल्या असहाय्य मुलीला, बहिणीला, मैत्रिणीला तो सहज संपवतो. (पुरुषाच्या ह्या ‘निवडक भित्रेपणा’चं आणि ‘निवडक शूरपणा’चं काय करायचं!)
इथं, ‘हिंसेला हिंसेनंच उत्तर द्यायला हवं’ अशी माझी अजिबातच भूमिका नाहीय…पण आहे हे असं आहे ह्याकडं निदान निर्देश तरी मी करू नये का?
ह्या सर्व घटना पाहून-ऐकून मन सुन्न होतं…विषादानं, संतापानं भरूनही येतं. वाटतं, ‘ती’च्याकडं आपण ‘केवळ माणूस’ म्हणून का पाहू शकत नाही? तसं पाहू शकलो तरच आपण स्वतःला माणूस म्हणवून घेऊ शकू. मग ती राजकारणातली ‘ती’ असो… ऑफिसमधल्या उच्च पदावर गेलेली ‘ती’ असो…अपघातात मृत्युमुखी पडलेली ‘ती’ असो किंवा भररस्त्यात खून होऊन जिवाला मुकलेली ‘ती’ असो…जोपर्यंत तिच्याकडं ‘निखळ माणूस’ म्हणून पाहिलं जाणार नाही तोपर्यंत तुमच्यातला तो टिपिकल ‘पुरुषीपणा’ संपूच शकत नाही. आणि, हा ‘पुरुषीपणा’ केवळ पुरुषातच असतो असं नाही, तो स्त्रीमध्येही असतो. ती एक ‘वृत्ती’ आहे. ती सगळ्यांच्यात असते. त्यामुळे हा ‘पुरुषीपणा’ जोपासण्यात घरातील स्त्रीपासून ते समाजातील तथाकथित संस्कृतिरक्षक स्त्रीपर्यंत कुणीही मागं नसतं.
(ता.क. : माझा पुरुषावर राग नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर हेसुद्धा पुरुषच होते आणि त्यांचा मी मनापासून आदर करते.)
– छाया काविरे
(chhayakavire02@gmail.com)


