‘ती’च्या मानसिक स्वातंत्र्याच काय?


रात्री उशिरापर्यंत ‘नदी का पहाड’ हा खेळ खेळत बसल्यामुळं मी दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा उठले; तेही आई ओरडल्यावर. आणि शाळेत जाण्यासाठी आवरायला लागले. आंघोळीला गेले आणि माझ्या कपड्यांना रक्त लागलंय हे बघून प्रचंड घाबरले. आरडाओरडा करू लागले. आजी पटकन उठून माझ्याजवळ आली. ‘काय झालं?’ असं आईनं लांबूनच विचारलं; पण आजीनं तिला माझ्या जवळूनच ओरडून काही सांगितलं नाही. आई आम्हा दोघींपाशी आल्यावर आजीनं तिला हळूच सांगितलं : “तिला पाळी आलीय!”

‘ती बाहेरून झालीय’, ‘तिचं डोकं मळलंय’ अशी सांकेतिक वाक्यं यासंदर्भात ऐकली की माझ्या प्रश्नांचा भडिमार आईवर सुरू व्हायचा. “आई, ‘बाहेरून झालीय’ म्हणजे काय? मी तर कालच केस धुतलेत; पण तरीही ‘हिचं डोकं मळलंय,’ असं आजी का म्हणाली? आता माझं डोकं रोज मळणार का?’ ‘आता पाळी रोज येणार का? माझं रोज रक्त वाहणार का?’अशा अनेक प्रश्नांचा गुंता माझ्या मनात होत असे. आजी-आई-काकूनं माझं खेळणं, मोठ्यानं हसणं, धावणं-पळणं ‘त्या’ दिवसानंतर बंद केलं. जुन्या बाजारातून आणलेला माझा आवडता फ्रॉकही घालायला मला मनाई करण्यात आली व  पंजाबी ड्रेस मला सक्तीचा करण्यात  आला. ओढणीसह! ‘आता तू ‘मोठी’ झाली आहेस,’ हे त्यांनीच मनोमन ठरवलं आणि ते माझ्यावर लादलंही. पाळीच्या त्या चार-पाच दिवसांत मी कुठं बसावं हेही ठरवण्यात आलं. घरातला एक कोपरा! ‘पाचव्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायची आणि मगच सर्व वस्तूंना स्पर्श करायचा,’ असं मला बजावण्यात आलं.

दर गुरुवारी काकूचा उपवास असायचा. तिला वाचता येत नसल्यानं ती मला देवीची पोथी वाचायला बसवायची; पण पाळी आल्यावर हा नित्यनेम बदलला. ‘पोथीला हात लावायचा नाही,’ असं आजीनं मला निक्षून सांगितलं. अशा वेळी प्रश्न पडायचा… ‘पाळी आल्यावर पोथीला हात लावायचा नाही; मग शाळेतल्या विज्ञान-गणिताच्या पुस्तकांना हात लावलेला चालतो का? आणि नसेल चालत तर, पाळीच्या पाच दिवसांत माझा अभ्यास कसा होणार? दर महिन्याला पाच दिवस शाळा बुडाली तर मी मोठी व्यक्ती कशी होणार?’ सुरुवातीला पाळीच्या काळात घरात उदबत्ती लावली की ‘देवाला चालत नाही,’ म्हणून आई ओरडायची; पण त्यावरही माझे प्रश्न तयारच असायचे : “देवाला जन्म देणारी एक बाईच असेल ना? देवालापण आई असेलच ना?” असे प्रश्न विचारल्यावर ‘बाईच्या जातीनं एवढं बोलायचं नसतं,’ असं सांगितलं जायचं पण, माझे प्रश्न कधी संपायचे-थांबायचे नाहीत.

मी सातवीत असतानाची गोष्ट. ‘आपल्याला प्रश्न का पडत नाहीत?’ या विषयावर  डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं व्याख्यान आमच्या शाळेत झालं होतं. व्याख्यान नक्कीच विचारप्रवृत्त करणारं होतं; पण मला वाटायचं, ‘नुसतेच प्रश्न पडूनही काय होणार ना?’ कारण, मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरंच मला तेव्हा मिळत नसायची. कदाचित, शतकानुशतकांपासून चालत आलेल्या सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पना घट्ट असण्याच्या काळात, विटाळाबद्दल ‘ब्र’ही काढायचा कुणी विचार करत नसतानाच्या वातावरणात देहाच्या मासिक पाळीवर निर्भीडपणे अभंग रचणाऱ्या व ‘देहात विटाळ असतो; मग देह कुणी निर्माण केला?’ असा प्रश्न अभंगातून विचारणाऱ्या संत सोयराबाई माझ्या सभोवतालच्या महिलांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. घरात व्यक्त व्हायला मिळत नाही म्हणून मी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे विषय मुद्दाम स्त्री स्वातंत्र्याशी निगडित निवडत असे आणि जिंकतही असे.

ग्रामीण भागात आजही अशा विषयांवर मोकळेपणानं बोलण्याचा प्रयत्न केला तर बायका ‘निर्लज्ज कुठली’ असा टॅग लावतात. बाई ही समाजाची जननी असते… पुरुषाइतकाच तिलाही जगण्याचा अधिकार असतो…तिच्या जननेंद्रियातून पाच दिवस होणारा रक्तस्राव अपवित्र नाही…ती केवळ ‘ती’ आहे म्हणून कुणाची गुलाम किंवा बांधील नाही, हे बाईलाच कळत नाही याला काय म्हणा‍वं? याच ‘ती’नं आपापल्या क्षेत्रात बुद्धीची, प्रज्ञेची, कर्तृत्वाची किती मोठी झेप घेतली होती याचे पुराणकाळातले-इतिहासातले किती तरी दाखले नावानिशी देता येतील. मात्र, असं असलं तरी मासिक पाळीच्या मानसिक गुलामगिरीतून ‘ती’ – आजच्या अत्याधुनिक काळातली ‘ती’ – पूर्णपणे मुक्त कधी होणार ? हा प्रश्न उरतोच.

एक बाई मला म्हणाली होती, ‘ग्रामीण भागात एका समाजात आजही स्त्रियांना प्रसूतीनंतर किंवा पाळीदरम्यान घराच्या बाहेर ठेवलं जातं, त्यापेक्षा आपलं तर बरंच आहे ना!’ म्हणजे, ते लोक या गोष्टी स्वीकारत नाहीत म्हणून, आपण जेवढं स्वीकारतोय तेवढंही खूप झालं, असं समजून, बदलासाठीचं पुढचं पाऊल टाकणंच आपण बंद करत असतो ! आणखी एक निरीक्षणातली बाब म्हणजे, पाळी आलेल्या बाईचा स्पर्शही चालत नाही असेही काही महाभाग आजच्या काळातसुद्धा आढळतात. ही तर दांभिकतेची हद्दच झाली म्हणायची.

सातपुड्याच्या सत्रासेन भागातील आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी एका वृत्तपत्रात काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. आदिवासी पाड्यावरच्या त्या बाईनं पाळीदरम्यान कापड म्हणून जुना ब्लाऊज वापरला होता. त्या ब्लाऊजला हूक होते. त्या हुकांवर गंज चढला होता. ब्लाऊजचं ते कापड हुकांसह वापरलं गेल्यामुळे धनुर्वात होऊन त्यातच तिचा मृत्यू झाला. हे का झालं? कारण, ती तिच्या मासिक पाळीसंदर्भातल्या आरोग्याबद्दल अनभिज्ञ होती. आसामच्या काही भागांत आजही, मुलींना पाळी यायला सुरुवात झाली की त्यांना शाळेत पाठवणं बंद केलं जातं. शिक्षण बंद झालं म्हणजे तिचा मानसिक, सामाजिक विकास खुंटतो. काही वर्षांनंतर समजा कुणी त्या मुलीला एखाद्या निर्णयाबद्दल विचारलं की, ‘तुझी काय इच्छा आहे? तुला काय वाटतंय?’ तर अशा वेळी ती भांबावून जाईल. तिला उत्तर तर सुचणार नाहीच; पण ‘माझी  काय नि कसली इच्छा असणार,’ असाच उलट प्रश्न तिला पडेल! कारण, ‘वैचारिक स्वातंत्र्य’ म्हणजे काय हेच तिला ठाऊक नसतं, मग ते कळणं, त्याचे लाभ कळणं दूरच राहिलं.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, आता स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर तरी ‘ती’नं ‘स्वतःच्या स्वातंत्र्या’साठी बंड करणं गरजेचं वाटतं. ‘बाईच्या जातीनं एवढं बोलायचं नसतं,’ असं सांगून ‘ती’चा आवाज अजून किती दिवस बंद केला जाणार? पुरुषसत्ताक मानसिकतेनं तयार केलेल्या तथाकथित चौकटीत ‘ती’ला किती दिवस अडकवून ठेवलं जाणार? परंपरेच्या नावाखाली ‘ती’च्यावर दडपण न टाकता ‘ती’ला ‘ती’च्या मनाप्रमाणे, ‘ती’च्या इच्छेनं जगू द्या. ‘ती’च्यावर बंधनं लादून ‘ती’चं स्वातंत्र्य हिरावून घेण्यापेक्षा ‘ती’चे छोटे-मोठे निर्णय ‘ती’लाच घेऊ द्या. प्रश्न मासिक पाळीच्या नावाखाली दडपल्या जाणाऱ्या ‘ती’च्या भावनांचा, ‘ती’च्या स्वातंत्र्याचा, ‘ती’च्या मनमुक्त जगण्याचा आहे…काळजीच्या नावाखाली पाच दिवस ‘वाळीत टाकल्या’ची वागणूक देण्याचा आहे…बदलत्या काळानुसार आता आधुनिक उपाययोजना, आधुनिक साधनसुविधा उपलब्ध आहेत. तेव्हा, ‘त्या’ दिवसांत ‘ती’नं कोपऱ्यात बसून राहावं अशी परिस्थिती आता नाही.

‘पाळीदरम्यान क्रिकेट खेळायला मी येत नाही, माझं पोट दुखतंय,’ असं मी भावाला सांगितलं तर स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या पुराणातल्या-इतिहासातल्या बुद्धिमान स्त्रियांची, वीरांगनांची, रणरागिणींची उदाहरणं देऊन तो मला म्हणतो, ‘कुठं त्या बुद्धिमान, शूर-वीर स्त्रिया आणि कुठं पाळी आली म्हणून तेच चार दिवस धरून बसणारी तू! चल ऊठ, तुला आज पहिली बॅटिंग देतो.’ त्याच्या या आश्वासक शब्दांमुळे, आधुनिक दृष्टिकोनामुळे माझ्यातला आत्मविश्वास वाढतो आणि मीच माझ्या अवतीभवती लादून घेतलेल्या चौकटी तोडून बाहेर पडू लागते…हे बाहेर पडणं केवळ माझ्यासाठी नसतं, तर समस्त ‘तीं’साठी असतं!

जेव्हा तिचं ‘ती’ असणं ती गृहीत धरू देत नाही तेव्हा या ‘चौकटी’ बिथरू लागतात! कारण, जेव्हा ‘ती’ समाजाला घाबरत नाही तेव्हा हा समाज ‘ती’ला घाबरतो. ‘ती’ला घाबरवण्याचे अनेकानेक सूक्ष्मातिसूक्ष्म मार्ग अवलंबतो. बारकाईनं विचार केला नाही तर ‘ती’ला या मार्गांचा कधी पत्ताही लागणार नाही! काट्यासारखं रुतणारं असं काही ना काही ‘ती’च्या प्रत्येक पावलागणिक असतंच असतं. वेगवेगळ्या रूपांत! हे जे रुतणं आहे, टोचणं आहे त्यावर वेळीच उपाय केल्यास  त्या क्षणी थोडंफार दुखतंहि. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते कुरूपात रूपांतरित होऊन तिथंच घर करतं आणि मधूनमधून धगधगत, ठसठसत राहतं! हे ‘कुरूप’ म्हणजे ‘ती’ची आपलीच माणसं असतात…कारण, ती ‘आपली’ असतात ना!

शेवटी, यावरही मात करून,  ते ठसठसणं-धगधगणं सहन करत ‘ती’ स्वतःला सिद्ध करत असतेच. कधी ढासळते, चुकते, पडते…परत उभी राहते; पण चालणं सोडत नाही.  ‘ती’ कितीही, काहीही झालं तरी स्वल्पविराम घेते; पण प्रश्न उपस्थित करण्याला, त्यांची उत्तरं शोधण्याला आणि जगण्याला ‘ती’ कधी पूर्णविराम देत नाही. कोणत्याही स्थितीविषयी ‘ती’ जेव्हा रोखठोक प्रश्न उपस्थित करते तेव्हा समाजाकडून ‘ती’च्यासंदर्भातही काही प्रश्न उपस्थित केले जातात…कारण, कुठल्याही व्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यावर ‘चारित्र्य’ नावाचं ‘विनोदी लेबल’ ‘ती’च्यावर चिकटवलं जातंच! अर्थात्, हेही तसं काही नवीन नाही. पुरुषी मानसिकतेला धरूनच आहे!
तरीही ‘ती’ निरंतर चालत राहते. अनेक ध्येयं सोबत घेऊन… मात्र, त्यात एक मुख्य ध्येय जे अटळ असतं. ते असतं ‘ती’च्या ‘स्वातंत्र्या’चं. ‘ती’ला ‘माणूस’ म्हणून जगता यावं यासाठीच्या ‘ती’च्या धडपडीचं! त्यासाठी ‘ती’ प्रत्येक क्षणी लढत असते…आणि ही लढाई अशीच सुरू असते आयुष्यभर!

‘ती’चं स्वतंत्र होणं नको असणारा एक गट समाजात सदैव असतो. ‘ती’ला नेहमीच अंधश्रद्धेत, कर्मकांडात गुंतवून ठेवू इच्छित असतो हा गट. संस्कृतीच्या, परंपरेच्या नावाखाली ‘ती’ला वेळोवेळी या गटाकडून समज दिली जाते : ‘बाईच्या जातीनं जास्त बोलायचं नसतं!’ सामाजिक काम करणारी माझी एक मैत्रीण चंचल ग्रामीण भागात सॅनिटरी पॅडचं वाटप करतानाचे तिचे अनुभव सांगताना म्हणते,  पॅड वाटत असतांना आजही ग्रामीण भागात स्त्रिया प्रश्न करतात, ‘हे काय ? बिस्किटचा पुडा आहे का?’ एकूण काय तर, आजही मासिक पाळीबद्दल जनजागृती नाही, म्हणजेच ‘ती’च्या आरोग्याबद्दल जागृती नाही. पाच दिवस वेगळं राहावं लागेल म्हणून खोट्या रूढी-परंपरांच्या नादात, डॉक्टरांचा सल्ला न घेता मासिक पाळी पुढं-मागं होण्यासाठी गोळ्या घेतल्या जातात. विशेषतः सणावारांच्या काळात तर हे हमखास घडताना दिसतं. असं केल्यामुळे आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतात, याचा विचार कोण करतो! 

‘ती’चा स्पर्श चालत नाही म्हणून पाच दिवस ‘ती’ला ‘वाळीत टाकण्या’पेक्षा, ‘ती’ला मानसिक बंधनात ठेवण्यापेक्षा, त्या दिवसात ‘ती’ला आरामाची गरज असते हे लक्षात घेऊन ‘ती’ला जपलं – बाकीचे दिवस जशी ‘ती’ सर्वांना जपत असते. तसं केलं तर…? पण, अनेक ठिकाणी घडतं उलटंच. ‘हे तर प्रत्येक महिन्याचं!’ अशा तुच्छ, उपेक्षित, तटस्थ नजरेनं ‘त्या’ दिवसांकडे पाहिलं जातं. थोडाफार अपवाद वगळता, पाळीसंदर्भातली एकूण मानसिकता सडकी-किडकी आहे…’मासिक पाळी ही मानसिक पाळी झाली आहे’. ‘त्या’ दिवसांत ‘ती’ला जास्त काम करावं लागू नये, ‘ती’ला शारीरिक आराम मिळावा हा खरा ‘ती’ला बाजूला बसवण्यामागचा उद्देश पूर्वीच्या काळात असायचा. मात्र, त्याचंच रूपांतर खुबीनं ‘विटाळा’त केलं गेलं. म्हणून, इथल्या चुकीच्या गोष्टींना न जुमानता आजच्या स्त्रियांनी स्वतःचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपत ‘स्वतःच्या स्वातंत्र्या’साठी लढलंच पाहिजे. या समाजव्यवस्थेला प्रश्न विचारलेच पाहिजेत! तळागाळातील प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःच्या अधिकारांबद्दल, स्वतःच्या मानसिक स्वातंत्र्याबद्दल निर्भीडपणे बोलू लागेल, तेव्हाच ‘ती’च्या या ‘स्वातंत्र्य’लढ्याला यश आलं असं म्हणता येईल.

-छाया काविरे
chhayakavire02@gmail.com

#when_women_get_freedom
#mental_cycle_or_menstrual_cycle
#period
#independence_day
#75_years_of_independence
#’ती’_च्या_स्वातंत्र्याच_काय_?

मेरी प्यारी अम्मी ❤️

ग्रामीण भागात वाढणाऱ्या मुलींवर घरगुती कामाचं compulsion च असतं; पण माझ्या आईनं मला कधीच ‘तू मुलगी आहेस म्हणून तुला घरातली कामं आलीच पाहिजेत,’ असं सांगितलं नाही. तिला शिक्षणाची आवड; पण पाठीमागं तीन लहान भावंडं असल्यामुळं त्यांच्या सांभाळासाठी आई शिकली नाही. मात्र, तिच्या तिन्ही भावंडांना तिनं २८-३० वर्षांपूर्वी शाळेत पाठवलं. तिच्या लहानपणीच तिचे बाबा – म्हणजे माझे नाना – गेले. मोक्कार दारू प्यायचे म्हणे. नेहमी दारूच्या नशेत असल्यामुळं एका नातलगाच्या मर्डरचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. नाना तुरुंगात गेला. आणि, नानी तिच्या चार लेकरांसह बेघर झाली. नानीच्या चार मुलांमधली थोरली लेक म्हणजे माझी आई. मेरी प्यारी अम्मी ❤️

धुळे जिल्ह्यातल्या शिरुड नावाच्या खेडेगावात आईचं ऊर्फ अनिताबाईचं बालपण गेलं. गावातल्या चौकात नानी चप्पल शिवायचं काम करायची. आणि, आई पेन पकडायच्या वयात कटरणी (चप्पल शिवायची सुई) पकडून चपला शिवायची. या माय-लेकींनी मिळून काबाडकष्टानं आपल्या नवऱ्याच्या आणि बापाच्या – म्हणजे माझ्या नानाच्या – बेलसाठी पैसे जमवले. जिल्ह्याच्या पोलीस ठाण्यात ते पैसे जाऊन दिले. पोलीस म्हणाले, ‘लवकरच त्याची सुटका होईल. तुम्ही जा आता.’ दिवस गेले; पण तुरुंगात गेलेला नाना परत आलाच नाही. तो बेपत्ता झाला. 

चार लेकरांची जबाबदारी नानीवर पडली. नानी चांभारी काम करायची. ती दिवसभर कामात bussy. त्यामुळं आई तिच्या भावंडांची देखरेख करायची. पुढं लहान वयात आईचं लग्न झालं. पुढच्या दोन वर्षांत तिला मी झाले. जेव्हापासून मला आठवतं, मी तिला कधीच निवांत जगताना पाहिलेलं नाही. आधी घरात गॅस नव्हता म्हणून जळण (लाकूडफाटा) आणण्यासाठी तिला लांब लांब जावं लागे. आई तो लाकूडफाटा डोक्यावर घेऊन यायची. दिवाळीत कापूस वेचायला जायची आणि वर्षभर शेतातली इतर कामं मिळतील तशी करायची. शेतात कामं नसली की ही पप्पाला चपला शिवण्यात मदत करायची. 

पुढं ‘बाटा’ वगैरेसारख्या कंपन्या आल्या आणि चांभाराच्या हातावरचं काम गेलं. रापी (चामडं कापायचं एक अवजार) निकामी झाली. मग आईनं किराणा दुकान टाकायचं ठरवलं. मात्र, काही दिवसांतच शेजाऱ्यापाजाऱ्यांनीही किराणा दुकान टाकलं. मग आई टेलरिंग काम करायला लागली. मात्र, घरातली परिस्थिती बिघडतच चालली होती. गावाकडं रोजगार नाही. आम्हा भावंडांच्या शिक्षणाचा खर्च सोसेना, म्हणून आम्ही काही नातलगांच्या मदतीनं मुंबईत स्थलांतरित झालो. आणि मग पुन्हा सुरू झाला आईचा दहा बाय दहाच्या खोलीतला संसार. 

मुंबईत आल्यावर आई धुण्या-भांड्याच्या कामाला जाऊ लागली. सकाळी दहा ते रात्री दहा असं तिचं शेड्युल पॅक असायचं. घरातली कामं बघत ती बाबाच्या खांद्याला खांदा लावून झटली. या सगळ्यात तिनं कधीच माझ्यावर कोणत्याच गोष्टीसाठी दबाव आणला नाही. ‘तुला जे आवडतंय ते कर. फक्त भविष्यात माझ्यासारखी वेळ तुझ्यावर येऊ नये यासाठी शिक’, असं ती म्हणायची. 

मध्यंतरी ती प्रचंड आजारी पडली होती. जवळपास दोन वर्षं. वातावरण बदलावं म्हणून आम्ही भावंडांनी आई-बाबांना पुण्यात शिफ्ट केलं. आई तब्येतीनं आता बरी असते; पण तिची हाडं झिजलीयेत काम करून करून. आयुष्यभर पडेल ती कामं करत आलीय ती. आयुष्यातल्या कठीण काळातही ती कधी डगमगली नाही. मुलगी म्हणजे तिची मैत्रीण म्हणून तिचं सोसणं मी ऐकत आणि बघत आलीय. ‘बाईचा संसारच तिच्यासाठी सगळं काही असतं’, असं ऐकत वाढलेली ती. आमच्यासाठी अनिताबाईनं बाबासोबत फार संघर्ष केलाय. 

शाळेत असताना आम्हाला वसंत बापट यांची एक कविता होती. हल्ली त्या कवितेल्या बाभूळझाडासारखीच भासते ती मला. ऋतू बदलत गेले. वाइटापेक्षाही वाईट दिवस येत गेले; पण ही जागची हलली नाही. अगदी खालील ओळींप्रमाणे : 

अस्सल लाकूड, भक्कम गाठ

ताठर कणा टणक पाठ

वारा खात गारा खात

बाभुळझाड उभेच आहे ।।१।।

देहा फुटले बारा फाटे

अंगावरचे पिकले काटे

आभाळात खुपसून बोटे

बाभुळझाड उभेच आहे ।।२।।

अंगावरची लवलव मिटली

माथ्यावरची हळद विटली

छाताडाची ढलपी फुटली

बाभुळझाड उभेच आहे।।३।।

जगले आहे, जगते आहे

काकुळतीने बघते आहे

खांद्यावरती सुतारांचे

घरटे घेउन उभेच आहे ।।४।।

टक टक टक टक

चिटर फटर चिटर फटर

सुतारपक्षी म्हातार्‍याला

सोलत आहे शोषत आहे ।।५।।

आठवते ते भलते आहे

उरात माझ्या सलते आहे

आत काही कळते आहे

आत फार जळते आहे ।।६।।

अस्स्ल लाकूड, भक्कम गाठ

ताठर कणा टणक पाठ

वारा खात गारा खात

बाभुळझाड उभेच आहे ।।७।।

Happy birthday ammi ❤️

– तुझीच सावली, 

छाया अनिता लक्ष्मण

अतिस्वातंत्र्याचे दुष्परिणाम…!Ohhhh Really?

स्त्री कोणत्याही जातीची, धर्माची असो…कोणत्याही शहरातली असो…तिच्यावर बलात्कार झालेला असो किंवा तिचा अपघात झालेला असो…तिची सामाजिक, प्रादेशिक आणि सांस्कृतिक ओळख कितीही वेगळी असो…ती रंगानं सावळी असो किंवा गोरी असो…या ‘ती’च्या, म्हणजेच समस्त स्त्रीच्या, संदर्भातल्या घटनांमध्ये/प्रकरणांमध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे तिच्या चारित्र्यावर लेबल लावण्याचा केला जात असलेला प्रयत्न.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी (ता. १७ जून) एक दुर्दैवी प्रकार घडला. कार चालवतानाचा व्हिडिओ बनवण्याच्या नादात तेवीसवर्षीय श्वेता सुरवसे ह्या तरुणीला जीव गमावावा लागला. ह्या अपघातात प्राणास मुकलेल्या श्वेताविषयीची माहिती सांगणारा परिचयवजा एक व्हिडिओ मी ‘मुंबई तक’वर तयार केला (लिंक Comment-box मध्ये). हा व्हिडिओ एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिलाय आणि शंभरहून अधिक लोकांनी व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. या कमेंट्समध्ये अनेकांकडून जे काही लिहिलं गेलं आहे ते नेहमीप्रमाणेच चारित्र्यावर शिंतोडे उडवणार आहे.

त्यातल्या काही कमेंट्स पाहा : –
– ‘कशाला गेली होती बाॅयफ्रेंडसोबत?’
– ‘श्वेता बॉयफ्रेंडबरोबर मजा मारायला गेली होती. असल्या (मुली) मेल्या तरी दुःख वाटत नाही.’
– ‘श्वेता एकटी बॉयफ्रेंडसोबत तिथं कशाला गेली होती?’
– ‘अतिस्वातंत्र्याचे दुष्परिणाम.’

पुण्यात गेल्या महिन्यात (ता. १९ मे) कल्याणीनगरमध्ये झालेल्या
कारच्या अपघातात टूव्हीलरवरील अश्विनी कोष्टा आणि अनीश अवधिया हे मृत्युुमुखी पडले. तेव्हाही अश्विनी आणि अनिश ‘फक्त मित्र (च)’ होते का’, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. जिवानिशी गेलेल्या अश्विनीकडं पाहताना ‘फक्त माणूस’ म्हणून आपण का पाहू शकत नाही? दोघांनाही आपला जीव गमावावा लागला ह्या निखळ वास्तवाकडं आपण तितक्याच निखळपणे कुठलीही शंका-कुशंका मनात न येऊ देता – पाहू शकत नाही का? 

ऑफिसमध्येही एखादी महिला उच्च पदावर असली तर गृहीतच धरलं जातं की, तिचं मालकाशी किंवा तिच्या बॉसशी अफेअर असेल. ती यशस्वी असेल तर तिच्या ‘यशाचा शॉर्टकट’ म्हणून तिच्या त्या नात्याकडं पाहिलं जातं. (किंवा, ती नातं जोडण्यास राजी नसेल, इच्छुक नसेल तर बऱ्याचदा तिची प्रगती रोखली जाण्याचेही प्रकार काही ठिकाणी घडत असतात).

राजकारणातही अशीच स्थिती आहे. एखादी महिला किंवा तरुणी मोठ्या नेतेपदापर्यंत गेली असेल तर त्यापूर्वी ‘ती कुणासोबत तरी झोपूनच आली असेल (त्याशिवाय कशी एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलीय!)’ अशीच थेट चर्चा केली जाते. आणि, ही चर्चा फक्त पुरुषांकडून केली जाते असं नव्हे, तर स्त्रियाही अशा चर्चांमध्ये सहभागी होतात.

ह्यासंदर्भात अलीकडचंच एक उदाहरण देता येईल. शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाच्या अयोध्या पौळने लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान केला होता.
त्यावर शिंदे गटाच्या स्नेहल कांबळेने फेसबुक लाईव्ह करून ‘तिला छाती असेल तर तिची छाती दाबतील ना कोणी,’ अशी टीका पौळला उद्देशून केली होती. त्या लाईव्हवर ‘गोदरेजचं कपाट…सगळंच सपाट,’ अशा कमेंट्स काही पुरुषांनी केल्या होत्या. स्त्रीनंच स्त्रीच्या शरीराची लक्तरं उडवल्याचं हे उदाहरण आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईतील वसईत रोहित यादव या तरुणानं संशयातून आरती यादव या त्याच्या मैत्रिणीची अमानुष हत्या केली. लोखंडी पाना असंख्य वेळा तिच्या डोक्यात मारून त्यानं तिला दिवसाढवळ्या, भररस्त्यात संपवलं. 

बहिणीवर बलात्कार झाला तर (किंवा वरील उदाहरणाप्रमाणे प्रेमप्रकरणातून तिचा कुणी खून केला तर) त्याचा राग येऊन बलात्काऱ्याचा खून भावानं किंवा बापानं केला अशा बातम्या कधी वाचनात येत नाहीत; पण मुलीनं प्रेमविवाह केला तर तिच्या भावानं, बापानं तिचा खून केल्याच्या बऱ्याच बातम्या वाचनात येतात.

पुरुष हा भित्रा आहे, तो बलात्काऱ्याला/खुन्याला भिडू शकत नाही; पण त्याच्यावर विश्वास असलेल्या आपल्या असहाय्य मुलीला, बहिणीला, मैत्रिणीला तो सहज संपवतो. (पुरुषाच्या ह्या ‘निवडक भित्रेपणा’चं आणि ‘निवडक शूरपणा’चं काय करायचं!)

इथं, ‘हिंसेला हिंसेनंच उत्तर द्यायला हवं’ अशी माझी अजिबातच भूमिका नाहीय…पण आहे हे असं आहे ह्याकडं निदान निर्देश तरी मी करू नये का?

ह्या सर्व घटना पाहून-ऐकून मन सुन्न होतं…विषादानं, संतापानं भरूनही येतं. वाटतं, ‘ती’च्याकडं आपण ‘केवळ माणूस’ म्हणून का पाहू शकत नाही? तसं पाहू शकलो तरच आपण स्वतःला माणूस म्हणवून घेऊ शकू. मग ती राजकारणातली ‘ती’ असो… ऑफिसमधल्या उच्च पदावर गेलेली ‘ती’ असो…अपघातात मृत्युमुखी पडलेली ‘ती’ असो किंवा भररस्त्यात खून होऊन जिवाला मुकलेली ‘ती’ असो…जोपर्यंत तिच्याकडं ‘निखळ माणूस’ म्हणून पाहिलं जाणार नाही तोपर्यंत तुमच्यातला तो टिपिकल ‘पुरुषीपणा’ संपूच शकत नाही. आणि, हा ‘पुरुषीपणा’ केवळ पुरुषातच असतो असं नाही, तो स्त्रीमध्येही असतो. ती एक ‘वृत्ती’ आहे. ती सगळ्यांच्यात असते. त्यामुळे हा ‘पुरुषीपणा’ जोपासण्यात घरातील स्त्रीपासून ते समाजातील तथाकथित संस्कृतिरक्षक स्त्रीपर्यंत कुणीही मागं नसतं.

(ता.क. : माझा पुरुषावर राग नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर हेसुद्धा पुरुषच होते आणि त्यांचा मी मनापासून आदर करते.)


– छाया काविरे
(chhayakavire02@gmail.com)

अतिस्वातंत्र्याचे दुष्परिणाम…!Ohhhh Really?

स्त्री कोणत्याही जातीची, धर्माची असो…कोणत्याही शहरातली असो…तिच्यावर बलात्कार झालेला असो किंवा तिचा अपघात झालेला असो…तिची सामाजिक, प्रादेशिक आणि सांस्कृतिक ओळख कितीही वेगळी असो…ती रंगानं सावळी असो किंवा गोरी असो…या ‘ती’च्या, म्हणजेच समस्त स्त्रीच्या, संदर्भातल्या घटनांमध्ये/प्रकरणांमध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे तिच्या चारित्र्यावर लेबल लावण्याचा केला जात असलेला प्रयत्न.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी (ता. १७ जून) एक दुर्दैवी प्रकार घडला. कार चालवतानाचा व्हिडिओ बनवण्याच्या नादात तेवीसवर्षीय श्वेता सुरवसे ह्या तरुणीला जीव गमावावा लागला. ह्या अपघातात प्राणास मुकलेल्या श्वेताविषयीची माहिती सांगणारा परिचयवजा एक व्हिडिओ मी ‘मुंबई तक’वर तयार केला (लिंक Comment-box मध्ये). हा व्हिडिओ एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिलाय आणि शंभरहून अधिक लोकांनी व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. या कमेंट्समध्ये अनेकांकडून जे काही लिहिलं गेलं आहे ते नेहमीप्रमाणेच चारित्र्यावर शिंतोडे उडवणार आहे.

त्यातल्या काही कमेंट्स पाहा : –
– ‘कशाला गेली होती बाॅयफ्रेंडसोबत?’
– ‘श्वेता बॉयफ्रेंडबरोबर मजा मारायला गेली होती. असल्या (मुली) मेल्या तरी दुःख वाटत नाही.’
– ‘श्वेता एकटी बॉयफ्रेंडसोबत तिथं कशाला गेली होती?’
– ‘अतिस्वातंत्र्याचे दुष्परिणाम.’

पुण्यात गेल्या महिन्यात (ता. १९ मे) कल्याणीनगरमध्ये झालेल्या
कारच्या अपघातात टूव्हीलरवरील अश्विनी कोष्टा आणि अनीश अवधिया हे मृत्युुमुखी पडले. तेव्हाही अश्विनी आणि अनिश ‘फक्त मित्र (च)’ होते का’, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. जिवानिशी गेलेल्या अश्विनीकडं पाहताना ‘फक्त माणूस’ म्हणून आपण का पाहू शकत नाही? दोघांनाही आपला जीव गमावावा लागला ह्या निखळ वास्तवाकडं आपण तितक्याच निखळपणे कुठलीही शंका-कुशंका मनात न येऊ देता – पाहू शकत नाही का? 

ऑफिसमध्येही एखादी महिला उच्च पदावर असली तर गृहीतच धरलं जातं की, तिचं मालकाशी किंवा तिच्या बॉसशी अफेअर असेल. ती यशस्वी असेल तर तिच्या ‘यशाचा शॉर्टकट’ म्हणून तिच्या त्या नात्याकडं पाहिलं जातं. (किंवा, ती नातं जोडण्यास राजी नसेल, इच्छुक नसेल तर बऱ्याचदा तिची प्रगती रोखली जाण्याचेही प्रकार काही ठिकाणी घडत असतात).

राजकारणातही अशीच स्थिती आहे. एखादी महिला किंवा तरुणी मोठ्या नेतेपदापर्यंत गेली असेल तर त्यापूर्वी ‘ती कुणासोबत तरी झोपूनच आली असेल (त्याशिवाय कशी एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलीय!)’ अशीच थेट चर्चा केली जाते. आणि, ही चर्चा फक्त पुरुषांकडून केली जाते असं नव्हे, तर स्त्रियाही अशा चर्चांमध्ये सहभागी होतात.

ह्यासंदर्भात अलीकडचंच एक उदाहरण देता येईल. शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाच्या अयोध्या पौळने लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान केला होता.
त्यावर शिंदे गटाच्या स्नेहल कांबळेने फेसबुक लाईव्ह करून ‘तिला छाती असेल तर तिची छाती दाबतील ना कोणी,’ अशी टीका पौळला उद्देशून केली होती. त्या लाईव्हवर ‘गोदरेजचं कपाट…सगळंच सपाट,’ अशा कमेंट्स काही पुरुषांनी केल्या होत्या. स्त्रीनंच स्त्रीच्या शरीराची लक्तरं उडवल्याचं हे उदाहरण आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईतील वसईत रोहित यादव या तरुणानं संशयातून आरती यादव या त्याच्या मैत्रिणीची अमानुष हत्या केली. लोखंडी पाना असंख्य वेळा तिच्या डोक्यात मारून त्यानं तिला दिवसाढवळ्या, भररस्त्यात संपवलं. 

बहिणीवर बलात्कार झाला तर (किंवा वरील उदाहरणाप्रमाणे प्रेमप्रकरणातून तिचा कुणी खून केला तर) त्याचा राग येऊन बलात्काऱ्याचा खून भावानं किंवा बापानं केला अशा बातम्या कधी वाचनात येत नाहीत; पण मुलीनं प्रेमविवाह केला तर तिच्या भावानं, बापानं तिचा खून केल्याच्या बऱ्याच बातम्या वाचनात येतात.

पुरुष हा भित्रा आहे, तो बलात्काऱ्याला/खुन्याला भिडू शकत नाही; पण त्याच्यावर विश्वास असलेल्या आपल्या असहाय्य मुलीला, बहिणीला, मैत्रिणीला तो सहज संपवतो. (पुरुषाच्या ह्या ‘निवडक भित्रेपणा’चं आणि ‘निवडक शूरपणा’चं काय करायचं!)

इथं, ‘हिंसेला हिंसेनंच उत्तर द्यायला हवं’ अशी माझी अजिबातच भूमिका नाहीय…पण आहे हे असं आहे ह्याकडं निदान निर्देश तरी मी करू नये का?

ह्या सर्व घटना पाहून-ऐकून मन सुन्न होतं…विषादानं, संतापानं भरूनही येतं. वाटतं, ‘ती’च्याकडं आपण ‘केवळ माणूस’ म्हणून का पाहू शकत नाही? तसं पाहू शकलो तरच आपण स्वतःला माणूस म्हणवून घेऊ शकू. मग ती राजकारणातली ‘ती’ असो… ऑफिसमधल्या उच्च पदावर गेलेली ‘ती’ असो…अपघातात मृत्युमुखी पडलेली ‘ती’ असो किंवा भररस्त्यात खून होऊन जिवाला मुकलेली ‘ती’ असो…जोपर्यंत तिच्याकडं ‘निखळ माणूस’ म्हणून पाहिलं जाणार नाही तोपर्यंत तुमच्यातला तो टिपिकल ‘पुरुषीपणा’ संपूच शकत नाही. आणि, हा ‘पुरुषीपणा’ केवळ पुरुषातच असतो असं नाही, तो स्त्रीमध्येही असतो. ती एक ‘वृत्ती’ आहे. ती सगळ्यांच्यात असते. त्यामुळे हा ‘पुरुषीपणा’ जोपासण्यात घरातील स्त्रीपासून ते समाजातील तथाकथित संस्कृतिरक्षक स्त्रीपर्यंत कुणीही मागं नसतं.

(ता.क. : माझा पुरुषावर राग नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर हेसुद्धा पुरुषच होते आणि त्यांचा मी मनापासून आदर करते.)


– छाया काविरे
(chhayakavire02@gmail.com)

हंपी : कथा आणि इतिहास सांगणाऱ्या दगडांचं शहर

हंपी

कर्नाटकातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या हंपीत जणू प्रत्येक दगडात इतिहास दडलाय! इथली प्राचीन मंदिरं आणि ऐतिहासिक ठिकाणं पुराणांची-इतिहासाची पानं उलगडायला भाग पाडतात. हंपीचा संबंध रामायणकाळाशी असल्याचं सांगितलं जातं. हनुमानाची आणि वालीचा भाऊ सुग्रीव यांची पहिली भेट इथंच झाली होती, अशी पौराणिक आख्यायिका आहे. ह्या परिसराशी संबंधित असलेल्या रामायणकाळातील अनेक आठवणी इथल्या लोकांकडून सांगितल्या जातात. 

हे नगर प्राचीन काळी किष्किंधा ह्या नावानं ओळखलं जाई. वालीचा मुलगा अंगद ह्याची ही तेव्हा राजधानी होती. पुढं काळाच्या आणि इतिहासाच्या ओघात ह्या शहराची नावं विजयनगर आणि नंतर हंपी अशी बदलत गेली. हंपी ही विजयनगर साम्राज्याची पहिली राजधानी होती. हंपीला लागूनच अनेगुंडी/अनागुंडी नावाचं गाव असून त्याच्याच परिसरात अंजनाद्री नावाचा पर्वत आहे. याच पर्वतावर हनुमानाचा जन्म झाल्याचं सांगितलं जातं. हनुमानाची आई अंजनी व हनुमान यांचं, तसंच भगवान रामाचं मंदिर ह्या पर्वतावर आहे. 

विजय विठ्ठल मंदिर

विजय विठ्ठल मंदिर हेही हंपीचं प्रमुख आकर्षण आहे. देवराय द्वितीय (सन १४२२ ते १४४६) याच्या काळात हे मंदिर बांधलं गेलं. हंपीतील स्थानिक लोक सांगतात त्यानुसार, ‘महाराष्ट्रात पंढरपूर येथील मंदिरात आज जी मूर्ती आहे ती इथल्याच मंदिरातून तिकडं स्थलांतरित करण्यात आली होती. त्यामुळेच ‘कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु’, ‘कानडा राजा पंढरीचा’ असे उल्लेख संतांच्या अभंगरचनांमधून आढळतात, तसंच ह्या समान धाग्यामुळं कर्नाटकातील हरिदास आणि महाराष्ट्रभरातील वारकरी आषाढी एकादशीला भक्तिभावानं पंढरपुरात येतात.’ 

कर्नाटकातीलच एक विख्यात संत पुरंदरदास या मंदिरात भजनं गात असत. या मंदिराच्या प्रांगणात भव्य असा दगडी रथ आहे. सध्या चलनात असलेल्या पन्नास रुपयांच्या मोरचुदी रंगाच्या नोटेवर जे चित्र आहे ते याच रथाचं आहे. 

चोरी केल्यास असा होता कायदा

हंपीतील स्थानिक लोक सांगतात त्यानुसार, ‘प्राचीन काळी या शहरातील लोक हिरे, मोती, रेशीम यांचा, तसंच घोड्यांचा व्यापार करत. असत. सुमारे शंभर किलोमीटरच्या परिघातलं हे ठिकाण प्राचीन काळी ह्या परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ मानलं जात असे. शनी-शिंगणापूरमध्ये घरांना आणि दुकानांना जसे दरवाजे नसायचे तसेच इथल्या बाजारपेठांमधील दुकानांनाही दरवाजे नसत. दुकान बंद करायच्या वेळी हिऱ्या-मोत्यांच्या थाळ्यांवर फक्त कापड पांघरलं जाई. ‘चोरी करणाऱ्याचे हात-पाय छाटले जावेत’ असं त्या काळी राजाचं फर्मान असायचं. त्यामुळं चोरी करायला लोक साहजिकच कचरत.

रोमसारखंच शहर

डोमिंगो पेस ह्या पोर्तुगीज प्रवाशानं विजयनगरला सन १५२० मध्ये भेट दिली होती. ‘क्रॉनिका डोस रैस द बिस्नागा’ (क्रॉनिकल ऑफ द किंग्ज् ऑफ विजयनगर) या शीर्षकाचा त्याचा प्रवासवर्णनपर ग्रंथ असून ‘विजयनगर हे रोमसारखंच मोठं, अतिशय सुंदर, तसंच जगातील सर्वोत्तम शहर आहे,’ असं मत त्यानं त्यात नोंदवून ठेवलं आहे. 

ऐतिहासिक हंपी

‘जगात हंपीइतकं दुसरं मोठं शहर नाही’ असं पंधराव्या शतकातला पर्शियन राजदूत अब्दुर रझाक ह्यानंही नमूद करून ठेवलं आहे. ‘हंपी हे तुंगभद्रा नदीकाठचं एक समृद्ध, श्रीमंत आणि भव्य शहर होतं. पर्शिया (इराण) आणि पोर्तुगाल येथील विविध व्यापारी आपला माल विकण्यासाठी इथल्या बाजारपेठांमध्ये येत असत,’ अशी नोंद पर्शियन आणि युरोपीय प्रवाशांनी, विशेषतः पोर्तुगीज प्रवाशांनी,  करून ठेवलेली आढळते. 

नंतरच्या काळात दक्षिणेतील मुस्लिम राजवटींनी एकत्र येऊन विजयनगर साम्राज्याचा पराभव केला. सन १५६५ मध्ये या राजवटींच्या एकत्रित सैन्यानं राजधानी हंपी जिंकली, लुटली आणि नष्ट केली. त्यानंतर हंपी हे शहर ‘भग्नावशेषा’त रूपांतरित झालं. 

‘विजयनगरची कथा ही विजय आणि विनाश ह्यांची शोकात्म कथा आहे,’ असं सार्थ वर्णन विख्यात अमेरिकी इतिहासकार विल ड्युरांट यांनी आपल्या ‘आवर ओरिएंटल हेरिटेज : द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन’ या ग्रंथात केलं आहे.

वर्तमानकाळातील हंपी

हंपीमध्ये सेंद्रिय शेतीतून केळीच्या बागा बहरल्या आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीला धक्का न लावता दगडांमध्ये इथं आजही शेती केली जाते. केरळ, तामिळनाडू, गुजरात अशा विविध राज्यांतील सांस्कृतिक उत्सवांचं चित्रण करणारी शिल्पं इथल्या वास्तूंमध्ये आहेत. सलोखा जपणारे अनेक राजे इथं होऊन गेल्याचं म्हटलं जातं. 

हंपीतील प्रवासादरम्यान मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट ही की, या शहरातील मूळचे लोक अतिशय आत्मीयतेनं आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. रिक्षाचालक, वयोवृद्ध मंडळी…असे सगळेजण आपल्या मोडक्यातोडक्या हिंदीत हंपीचा इतिहास आपल्याला सांगतात. 

– छाया काविरे

हंपी : कथा आणि इतिहास सांगणाऱ्या दगडांचं शहर

हंपी

कर्नाटकातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या हंपीत जणू प्रत्येक दगडात इतिहास दडलाय! इथली प्राचीन मंदिरं आणि ऐतिहासिक ठिकाणं पुराणांची-इतिहासाची पानं उलगडायला भाग पाडतात. हंपीचा संबंध रामायणकाळाशी असल्याचं सांगितलं जातं. हनुमानाची आणि वालीचा भाऊ सुग्रीव यांची पहिली भेट इथंच झाली होती, अशी पौराणिक आख्यायिका आहे. ह्या परिसराशी संबंधित असलेल्या रामायणकाळातील अनेक आठवणी इथल्या लोकांकडून सांगितल्या जातात. 

हे नगर प्राचीन काळी किष्किंधा ह्या नावानं ओळखलं जाई. वालीचा मुलगा अंगद ह्याची ही तेव्हा राजधानी होती. पुढं काळाच्या आणि इतिहासाच्या ओघात ह्या शहराची नावं विजयनगर आणि नंतर हंपी अशी बदलत गेली. हंपी ही विजयनगर साम्राज्याची पहिली राजधानी होती. हंपीला लागूनच अनेगुंडी/अनागुंडी नावाचं गाव असून त्याच्याच परिसरात अंजनाद्री नावाचा पर्वत आहे. याच पर्वतावर हनुमानाचा जन्म झाल्याचं सांगितलं जातं. हनुमानाची आई अंजनी व हनुमान यांचं, तसंच भगवान रामाचं मंदिर ह्या पर्वतावर आहे. 

विजय विठ्ठल मंदिर

विजय विठ्ठल मंदिर हेही हंपीचं प्रमुख आकर्षण आहे. देवराय द्वितीय (सन १४२२ ते १४४६) याच्या काळात हे मंदिर बांधलं गेलं. हंपीतील स्थानिक लोक सांगतात त्यानुसार, ‘महाराष्ट्रात पंढरपूर येथील मंदिरात आज जी मूर्ती आहे ती इथल्याच मंदिरातून तिकडं स्थलांतरित करण्यात आली होती. त्यामुळेच ‘कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु’, ‘कानडा राजा पंढरीचा’ असे उल्लेख संतांच्या अभंगरचनांमधून आढळतात, तसंच ह्या समान धाग्यामुळं कर्नाटकातील हरिदास आणि महाराष्ट्रभरातील वारकरी आषाढी एकादशीला भक्तिभावानं पंढरपुरात येतात.’ 

कर्नाटकातीलच एक विख्यात संत पुरंदरदास या मंदिरात भजनं गात असत. या मंदिराच्या प्रांगणात भव्य असा दगडी रथ आहे. सध्या चलनात असलेल्या पन्नास रुपयांच्या मोरचुदी रंगाच्या नोटेवर जे चित्र आहे ते याच रथाचं आहे. 

चोरी केल्यास असा होता कायदा

हंपीतील स्थानिक लोक सांगतात त्यानुसार, ‘प्राचीन काळी या शहरातील लोक हिरे, मोती, रेशीम यांचा, तसंच घोड्यांचा व्यापार करत. असत. सुमारे शंभर किलोमीटरच्या परिघातलं हे ठिकाण प्राचीन काळी ह्या परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ मानलं जात असे. शनी-शिंगणापूरमध्ये घरांना आणि दुकानांना जसे दरवाजे नसायचे तसेच इथल्या बाजारपेठांमधील दुकानांनाही दरवाजे नसत. दुकान बंद करायच्या वेळी हिऱ्या-मोत्यांच्या थाळ्यांवर फक्त कापड पांघरलं जाई. ‘चोरी करणाऱ्याचे हात-पाय छाटले जावेत’ असं त्या काळी राजाचं फर्मान असायचं. त्यामुळं चोरी करायला लोक साहजिकच कचरत.

रोमसारखंच शहर

डोमिंगो पेस ह्या पोर्तुगीज प्रवाशानं विजयनगरला सन १५२० मध्ये भेट दिली होती. ‘क्रॉनिका डोस रैस द बिस्नागा’ (क्रॉनिकल ऑफ द किंग्ज् ऑफ विजयनगर) या शीर्षकाचा त्याचा प्रवासवर्णनपर ग्रंथ असून ‘विजयनगर हे रोमसारखंच मोठं, अतिशय सुंदर, तसंच जगातील सर्वोत्तम शहर आहे,’ असं मत त्यानं त्यात नोंदवून ठेवलं आहे. 

ऐतिहासिक हंपी

‘जगात हंपीइतकं दुसरं मोठं शहर नाही’ असं पंधराव्या शतकातला पर्शियन राजदूत अब्दुर रझाक ह्यानंही नमूद करून ठेवलं आहे. ‘हंपी हे तुंगभद्रा नदीकाठचं एक समृद्ध, श्रीमंत आणि भव्य शहर होतं. पर्शिया (इराण) आणि पोर्तुगाल येथील विविध व्यापारी आपला माल विकण्यासाठी इथल्या बाजारपेठांमध्ये येत असत,’ अशी नोंद पर्शियन आणि युरोपीय प्रवाशांनी, विशेषतः पोर्तुगीज प्रवाशांनी,  करून ठेवलेली आढळते. 

नंतरच्या काळात दक्षिणेतील मुस्लिम राजवटींनी एकत्र येऊन विजयनगर साम्राज्याचा पराभव केला. सन १५६५ मध्ये या राजवटींच्या एकत्रित सैन्यानं राजधानी हंपी जिंकली, लुटली आणि नष्ट केली. त्यानंतर हंपी हे शहर ‘भग्नावशेषा’त रूपांतरित झालं. 

‘विजयनगरची कथा ही विजय आणि विनाश ह्यांची शोकात्म कथा आहे,’ असं सार्थ वर्णन विख्यात अमेरिकी इतिहासकार विल ड्युरांट यांनी आपल्या ‘आवर ओरिएंटल हेरिटेज : द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन’ या ग्रंथात केलं आहे.

वर्तमानकाळातील हंपी

हंपीमध्ये सेंद्रिय शेतीतून केळीच्या बागा बहरल्या आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीला धक्का न लावता दगडांमध्ये इथं आजही शेती केली जाते. केरळ, तामिळनाडू, गुजरात अशा विविध राज्यांतील सांस्कृतिक उत्सवांचं चित्रण करणारी शिल्पं इथल्या वास्तूंमध्ये आहेत. सलोखा जपणारे अनेक राजे इथं होऊन गेल्याचं म्हटलं जातं. 

हंपीतील प्रवासादरम्यान मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट ही की, या शहरातील मूळचे लोक अतिशय आत्मीयतेनं आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. रिक्षाचालक, वयोवृद्ध मंडळी…असे सगळेजण आपल्या मोडक्यातोडक्या हिंदीत हंपीचा इतिहास आपल्याला सांगतात. 

– छाया काविरे

चित्रपटांना शस्त्र बनवणारा लढवय्या ‘दक्षिण छारा’!

दडपलेल्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी तसेच समाज आणि व्यवस्थेवर प्रकाशझोत टाकण्यासाठी चित्रपट आणि रंगभूमी या दोन्ही कलांचा वापर करणारे दक्षिण छारा पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्र सेवा दल मध्यवर्ती कार्यालय पुणे येथे भेट देऊन विद्यार्थी व सेवादल कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि माझ्यासारखे अनेक विद्यार्थी जातीव्यवस्था, थिएटर, चित्रपट, सामाजिक माध्यमांमध्ये सुरू असलेले राजकारण अशा कित्येक विषयांवर बोलके झाले. मग सुरू झाली ती चर्चा राजकीय वातावरण तापवलेल्या “द काश्मीर फाईल्स” सारख्या चित्रपटांपासून तर सामाजिक सत्यता मांडणाऱ्या “समीर, जय भीम, झुंड” या चित्रपटापर्यंत..!

अहमदाबाद येथील सेवा दलाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दक्षिण छारा हे तथाकथित कलंकित छारा डिनोटिफाईड जमातीतील पहिले भारतीय फीचर चित्रपट निर्माते, पुरस्कार विजेते, नाटककार, लेखक व कार्यकर्ते आहेत. तसेच गुजरातमध्ये “बुधन थिएटर” हा ग्रुप देखील चालवतात. भारतातील वसाहतवादी राजवटीत “गुन्हेगार जमाती” म्हणून ओळखल्या गेलेल्या आणि अजूनही ऐतिहासिक कलंकाचा सामना करणाऱ्या भारतातील भटक्या विमुक्त जमातीसाठी संविधानिक हमी देण्यासाठी चित्रपट आणि थिएटर सक्रियतेच्या माध्यमातून दक्षिण छारा 24 वर्षांपासून अथक प्रयत्न करत आहेत. ते गुजरातमधील आदिवासींना स्वत:चा शोध घेऊन एक कलाकार म्हणून आदर मिळवण्यास मदत करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या कामगिरीने आदिवासी समुदाय ज्या समस्यांशी झगडत आहेत त्यांना दृश्यमानता आणण्यास मदत झाली आहे. त्यांच्या या कामगिरीमध्ये संवैधानिक हमींसाठीचा लढा अधिक ठळकपणे प्रकाशझोतात आला आहे.

“ब्रिटीश काळात १८७१ च्या गुन्हेगारी जमाती कायद्यांतर्गत मूळतः ‘गुन्हेगार जमाती’ म्हणून सूचीबद्ध केलेल्या शेकडो जमातींपैकीच छारा ही एक डिनोटिफाईड जमात आहे. १९५२ च्या गुन्हेगारी जमाती कायद्यान्वये अधिसूचना रद्द केली असली तरी लोकांचे या जमातीबद्दल अजूनही मत परिवर्तन पूर्णपणे झालेले दिसत नाही. त्यांच्यापैकी बरेच जण जन्मत: किंवा सवयीने गुन्हेगार म्हणूनच ओळखले जातात आणि समाजात आजही बहिष्कृत म्हणून जगतात”, असे दक्षिण छारा त्यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगाबद्दल बोलतांना व छारा समुदायाची आजही जनसामान्यात असलेली ओळख दाखवतांना म्हणाले. तसेच प्रा. डॉ. गणेश देवींच्या “पेंटेड वंर्डस” या पुस्तकातील “छिछियारी”, बिजोन भट्टाचार्य यांच्या जीवनातील “नब्बना” (सुनेहरी फसल आयेगी) प्रसंगांमुळे जन्माला आलेला राजकिय नारा आणि आताचा “अच्छे दिन..” हा नारा ह्यातली तफावत, असे अनेक संदर्भ विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी मांडले.

पारंपारिक चित्रपट आणि जाहिरातींना बगल देऊन उपेक्षित समाजातील प्रश्नांना चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न दक्षिण छारा करत आहेत. त्यांनी 46 हून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे, विविध महत्त्वाच्या आणि वादग्रस्त मुद्द्यांवर 84 डॉक्युमेंटरीस बनवल्या आहेत, सात थिएटर गट विकसित केले आहेत आणि उपेक्षित समाजातील 300 लोकांना थिएटरमध्ये प्रशिक्षण देखील दिले आहे.

बुधन थिएटर-
फेब्रुवारी 1998 मध्ये, भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील पुरुलिया जिल्ह्यात राहणाऱ्या बुधन साबरला पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. काही दिवसांनी बुधनचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांनी असा दावा केला की त्याने त्याच्या “गमछा” ने तुरुंगाच्या कोठडीत स्वतःला गळफास लावला, परंतु तपासात पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचे उघड झाले. या घटनेनंतर भारतीय साहित्य समीक्षक व भाषाशास्त्रज्ञ प्रा. गणेश देवी आणि प्रख्यात बंगाली लेखिका व कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांनी बुधन थिएटरची स्थापना केली आणि बुधन थिएटरचे पहिले नाटक दक्षिण छारा लिखित आणि दिग्दर्शित, ”बुधन बोलता है” याचे सादरिकरण केले गेले. त्यांच्यासाठी हे नाटक केवळ बुधनच्या निर्दोषतेबद्दल नव्हते, तर ते बुधनच्या म्हणजेच भारतातील डिनोटिफाईड ट्राइब्स (DNT) बद्दल पोलिसांच्या अमानवी वर्तनाबद्दल होते.

चित्रपट ”समीर”-
2008 मध्ये अहमदाबादमधील 21 बॉम्बस्फोटांची विनाशकारी दृश्ये कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी दक्षिण निघाले तेव्हा “समीर” या चित्रपटाचा जन्म झाला. चित्रपटाचे नाव आधी धुसर (राखाडी) असे होते. हे चित्रपट एका निर्दोष मुस्लिम अभियांत्रिकी विद्यार्थ्याबद्दल आहे, ज्याला दहशतवाद विरोधी पथकाने त्याच्या रूममेटचा शोध घेण्यास मदत करण्यासाठी ताब्यात घेतले, ज्याचा बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग असल्याचे मानले जाते. दहशतवाद हे मुख्यत्वे धर्माशी जोडले गेलेले आहे पण, या चित्रपटात दक्षिण, अर्थव्यवस्थेचा आणि हिंसाचाराचा संबंध पाहतात आणि ”समीर” या चित्रपटातून “अर्थव्यवस्था खाली आल्यावर दहशतवादाच्या घटना नेहमी का वाढतात?” असा प्रश्न समाज आणि राज्य या दोघांसमोर उपस्थित करून सेन्सॉर बोर्डाचे घरटे त्यांनी ढवळून काढले.

छारा असे चित्रपट का बनवतात?
चिपको आणि नर्मदा बचाव आंदोलन यांसारख्या चळवळींच्या व्यापक धारणांसह, अडचणींमध्ये वेढलेल्या आदिवासींची प्रतिमा दाखवण्यासाठी, त्यांच्या जंगलांचे आणि पवित्र पर्वतांचे संरक्षण करण्यासाठी ते लढत आहेत. आदिवासी लोकांचे जमीन, जंगल आणि पाण्यासाठी अथक संघर्ष आहेत. पण आज ही आपल्यापैकी किती जणांच्या मनात त्यांचे अजूनही एक ठराविकच चित्र आहे. दक्षिण छारांसारखे दिग्दर्शक दमदार चित्रपट बनवून आदिवासींच्या संघर्षांबद्दलची आपली समज वाढवण्यास मदत करतात.

दक्षिण छारा यांच्या कलात्मक आणि सामाजिक कामगिरीसाठी मिळालेले प्रतिष्ठित पुरस्कार-
• “द लास्ट मॅन” चित्रपटासाठी केरळच्या आंतरराष्ट्रीय माहितीपट लघुपट महोत्सवात “केरळ राज्य पुरस्कार-२०२१” प्राप्त.
• जानेवारी २०२२ मध्ये “बुधन पॉडकास्ट” साठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार” प्राप्त.
• “द लास्ट मॅन” चित्रपटासाठी जानेवारी २०२२ मध्ये पिकासो आइन्स्टाईन बुद्ध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ”सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक” आणि “सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार” प्राप्त.
• राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकारद्वारे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार, “Mahatma Gandhi Biannual Award for creative writing (2012-13)” “बुधन बोलता है” या नाटकासाठी प्राप्त.


ह्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सेवा दल साथी प्रमोद मुजुमदार, अभ्यासिका समन्वयक व पूर्णवेळ कार्यकर्ते निलेश निंबाळकर, पुणे शहर सेवा दल मंडळ सदस्य राकेश नेवासकर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष कबीर पळशीकर, पुणे शहर राज्य मंडळ सदस्य ममता परेड, मध्यवर्ती कार्यालयातील सेवा दल साथी, अभ्यासिकेतील व वसतिगृहातील सेवा दल साथी तसेच छात्र भारतीचे विद्यार्थी उपस्थित होते.

-छाया काविरे
9022535608.

देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे शैक्षणिक योगदान

‘शेतकर्‍याचा आसूड’ या ग्रंथात महात्मा जोतीराव फुले लिहितात :

विद्येविना मती गेली।
मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।।
इतके अनर्थ एका अविद्येने केले!

जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणाच्या संदर्भात मांडलेला हा मूलभूत विचार समोर येतो. महाराष्ट्राने हा विचार गेली अनेक वर्षे जोपासला आणि वाढवला. यामुळेच अगदी दुर्गम भागातदेखील शिक्षणाचा प्रसार झालेला आहे. शिक्षण म्हटले की आपल्या डोळ्यांपुढे साधारणतः दोन प्रकारचे शिक्षण येते. पहिले म्हणजे, शाळा-महाविद्यालयांमधून दिले जाणारे जीवनोपयोगी शिक्षण आणि दुसरे म्हणजे, आयुष्याच्या शाळेतून मिळालेले जगण्याविषयीचे अनुभवसिद्ध शिक्षण. या दोन्ही प्रकारच्या शिक्षणांसंदर्भात महाराष्ट्राची परंपरा समृद्ध आहे. देशाच्या जडणघडणीत या दोन्ही प्रकारातील व्यक्तिमत्त्वांनी अतिशय मोलाचे योगदान दिलेले आहे.

पहिल्या प्रकारच्या शिक्षणाचा पाया घालणाऱ्या समाजसुधारकांची, विचारवंतांची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. दुसऱ्या प्रकारचे शिक्षण दिले ते संतकवींनी-कवयित्रींनी. आपल्या ओव्या-अभंगांमधून त्यांनी सर्वसामान्य माणसाचे आत्मिक उन्नयन केले. तेव्हा, अशा या विचारसंपन्न महाराष्ट्राचे देशाच्या शैक्षणिक जडणघडणीत मोठे योगदान राहिल्यास नवल नाही. आधुनिक शिक्षणासंदर्भात सांगायचे तर महाराष्ट्राच्या प्रत्येकच भागात – मग तो पश्चिम/दक्षिण महाराष्ट्र असो की मराठवाडा-विदर्भ-खानदेश- कोकण असो मोठमोठे शिक्षणमहर्षी होऊन गेले आहेत.
देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे शैक्षणिक योगदान काय याचा विचार साधारणतः तीन टप्प्यांमध्ये करावा लागतो. स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्योत्तर काळ आणि जागतिकीकरणानंतरचा काळ असे हे तीन टप्पे. प्रत्येक टप्प्यावर समाजसुधारकांनी, शिक्षणतज्ज्ञांनी मूलभूत स्वरूपाचे योगदान दिलेले आहे. जे महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या समाजजीवनावर खोल परिणाम करणारे ठरले.

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले-सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहूमहाराज, लोकमान्य टिळक, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान अनन्यसाधारण म्हणावे लागते. कर्मवीर भाऊराव पाटील, मामासाहेब जगदाळे, बापूजी साळुंखे यांसारख्या असंख्य शिक्षणमहर्षींनी यानंतर शिक्षणाची ही मशाल सतत पेटती ठेवली.

जागतिकीकरणाच्या थोडासा मागचा-पुढचा काळ लक्षात घेता उद्योग-विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधन-संगणक अशा विविध क्षेत्रातल्या महाराष्ट्रीय व्यक्तींनी देशाच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. वसंत गोवारीकर ही काही प्रातिनिधिक नावे उदाहरणादाखल पुरेशी ठरावीत. या तीन टप्प्यांचा हा ढोबळ परामर्श घेतल्यानंतर आता शिक्षणक्षेत्रातील थोर व्यक्तिमत्त्वांचा ओझरता परिचय करून देत समग्र आढाव्याकडे यथाशक्य वळू या…

महाराष्ट्रातील संत भारताचे गुरू
महाराष्ट्रातील विविध संतांनी अनुभवसिद्ध चिंतन-मंथनातून केवळ आपल्या भारतालाच नव्हे तर, संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण दिली. संतवाङ्मयातून मांडल्या गेलेल्या तत्त्वज्ञानाचा आज जगभरात अभ्यास केला जातो. संत ज्ञानेश्वरमहाराजांनी मानवजातीचे हित सांगितले. संत एकनाथमहाराजांनी सर्वसामान्यांना व्यवहारात चोख राहण्याचा आदर्श घालून दिला. संत रामदासांनी लोकशिक्षणाचे धडे दिले. आवश्यक तेवढे धन जरूर मिळवावे; पण ते सन्मार्गानेच मिळवावे, ही आजच्या परिस्थितीत आवश्यक अशी शिकवण संत तुकाराममहाराजांनी दिली. राष्ट्रीय चारित्र्य कसे असायला हवे ते तुकडोजीमहाराज, गाडगेमहाराज या राष्ट्रसंतांनी आपल्या आचार-विचारांतून सांगितले. महाराष्ट्रातील या संतांनी कोणताही भेदभाव न करता आपली शिकवण सर्वांना दिली.

ब्रिटिशांचे भारतात आगमन
सोळाव्या शतकात भारतात ब्रिटिशांचे आगमन झाले. त्यांनी येथील शिक्षणपद्धती आमूलाग्र बदलून टाकली. सन १८१८ मध्ये मराठ्यांचे साम्राज्य अस्तंगत पावले व महाराष्ट्रासह भारतात ब्रिटिश राजवट खऱ्या अर्थाने सुरू झाली. सन १८२१ मध्ये पुण्यात संस्कृत पाठशाळेची, तर त्यामागोमाग मुंबईत ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना मुंबईचे गव्हर्नर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी केली. सन १८२३ मध्ये मुंबईत ‘एल्फिन्स्टन कॉलेज’ व १८३५ मध्ये ‘कोलकाता मेडिकल कॉलेज’ या महाविद्यालयांची स्थापना झाली. ब्रिटिश राजवटीत सुरू झालेला शिक्षणाचा हा प्रवास भारतात आधुनिक शिक्षणपद्धती रुजवण्यात महत्त्वाचा ठरला.

…आणि दलितांसाठी शिक्षणाची दारे उघडली
महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात समाजसुधारकांची/शिक्षणतज्ज्ञांची एक मोठी फळी होऊन गेली. त्यांत बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महात्मा जोतीराव फुले, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, गोपाळ गणेश आगरकर हे आघाडीचे समाजसुधारक होते. संपूर्ण भारतात दलितांच्या शिक्षणाची जी व्यवस्था होती ती महाराष्ट्रातही होती; मात्र, दलितांच्या सर्व चळवळी या प्रामुख्याने महाराष्ट्रात उभ्या राहिल्या.

महात्मा फुले यांनी सन १८५२ मध्ये महार-मांग यांच्या मुलांसाठी सुरू केलेली शाळा म्हणजे दलितांच्या शैक्षणिक इतिहासाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे पाऊल. यापूर्वी, म्हणजे सन १८२१ मध्ये, एल्फिन्स्टन यांनी पुण्यात विश्रामबागवाड्यात संस्कृत पाठशाळा सुरू केली होती. मात्र, त्या शाळेत फक्त ब्राह्मण मुलांना प्रवेश होता. यावरून स्पष्ट होते की, अस्पृश्यांना शिक्षण देऊन उच्चवर्णीयांचा रोष ओढवून घेण्याची लॉर्ड एल्फिन्स्टन यांची तयारी नव्हती.

दलितांना शिक्षण न देण्याची ब्रिटिश राज्यकर्त्यांची ही धोरणे लक्षात आल्यावर फुले यांनी दलितांसाठी शाळा सुरू करून समाजात शिक्षणाच्या क्रांतीचे पहिले पाऊल टाकले. याच दृष्टीने सन १८८३ मध्ये आणखी एक मूलभूत विचार फुले यांनी ‘हंटर आयोगा’पुढे मांडला.

तत्कालीन ब्रिटिश शिक्षणतज्ज्ञ थॉमस बॅबिंग्टन मेकॉले यांचे म्हणणे होते की, ‘शिक्षणाचा प्रसार उच्च जातींतील लोकांमधून खालच्या जातींतील लोकांकडे असायला हवा,’ तर फुले यांचे म्हणणे होते की, ‘शिक्षणाचा प्रसार खालून वर जायला हवा. कारण, भारतासारख्या समाजरचनेत उच्चवर्णीयांकडून अस्पृश्य वर्गाकडे शिक्षणाचा प्रवाह येऊच शकत नाही. परिणामी, अस्पृश्य आणि बहुजन समाज समान शिक्षणापासून वंचित राहतील.’ शूद्रातिशूद्रांच्या गुलामगिरीचे, दुःखाचे कारण अविद्या हे आहे असे फुले नेहमी सांगत असत.

महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांचे आयुष्य बदलण्याच्या कामी राजर्षी शाहूमहाराजांनी घेतलेल्या शिक्षणातील ऐतिहासिक निर्णयांची भूमिका महत्त्वाची आहे. शाहूमहाराजांनी प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक मोफत आणि सक्तीचे करण्याचा कायदा सन १९१६ मध्ये संमत केला. प्राथमिक शिक्षणाबरोबरच त्यांनी उच्च माध्यमिक व तंत्रशिक्षणाला महत्त्व दिले. लष्करी शिक्षणासाठी ‘इन्फन्ट्री स्कूल’ही त्यांनी सुरू केले.

सन १९०१ मध्ये शाहूमहाराजांनी विविध जातींच्या विद्यार्थ्यांसाठी जातीनिहाय वसतिगृहे स्थापन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी त्यांनीच शिष्यवृत्ती देऊन आपल्या चळवळीचा वारसा त्यांना दिला. भारतीय समाजव्यवस्थेत विषमता असल्याने शिक्षणात आरक्षणाची गरज असल्याचे शाहूमहाराजांनी ओळखले. देशात आरक्षण देणारे पहिले संस्थानिक ते ठरले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संवैधानिक तरतुदी करून त्याला देशभरात कायदेशीर स्वरूप दिले.

‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,’ असे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून ठेवलेले आहे. कनिष्ठ जातींतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी ता. २० जुलै १९२४ रोजी त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थेची, तसेच ता. १४ जून १९२८ रोजी ‘दलित शिक्षणसंस्थे’ची, तर ता. ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने सन १९४६ मध्ये मुंबईत ‘सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय’, सन १९५० मध्ये औरंगाबाद येथे ‘मिलिंद महाविद्यालय’, सन १९५३ मध्ये मुंबईत ‘सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय’, तर सन १९५६ मध्ये मुंबईत ‘सिद्धार्थ विधी महाविद्यालय’ सर्व समाजांसाठी सुरू करण्यात आले.

सयाजीराव गायकवाड यांनी सन १८७५ मध्ये स्वतंत्र शिक्षण विभागाची स्थापना केली. अस्पृश्यांना व आदिवासींना सरकारी खर्चाने मोफत प्राथमिक शिक्षण आणि वसतिगृह मिळावे यासंदर्भात जगात पहिल्यांदा हुकूम काढला तो गायकवाड यांनीच.

ह्याशिवाय रयत शिक्षण संस्थे’चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, श्रद्धानंद छात्रालय व श्रीशिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक पंजाबराव देशमुख, महाराष्ट्र विद्यालय सुरू करणारे शिक्षणमहर्षी मामासाहेब जगदाळे आदींचे योगदान अनन्यसाधारण आहे.

तर, देशाच्या प्रगतीत शिक्षणाचे नेमके स्थान काय आहे हे लोकमान्य टिळकांनी बारकाईने अभ्यासले व ‘स्वदेशी’ व ‘राष्ट्रीय शिक्षण’ या विषयांकडे देशाचे लक्ष वेधले. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी टिळक-आगरकर आणि महादेव बल्लाळ नामजोशी यांच्या सहकार्याने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.

स्त्रीशिक्षण
भारतीय स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. जोतीरावांच्या मनातील स्त्रीशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. ता. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून या दांपत्याने शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या कठीण कार्यात त्यांना फातिमा शेख यांची साथ मिळाली. शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई म्हणतात :

‘विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून।
तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन।’

सन १८९९ मध्ये पुण्यातील हिंगणे येथे स्त्रीशिक्षणासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सन १९१६ मध्ये महिला विद्यापीठ स्थापन केले. या महिला विद्यापीठाचे नामांतर पुढे ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ (एसएनडीटी) असे झाले. भारतातील अशा प्रकारचे हे एकमेव विद्यापीठ आहे.

ब्रिटिश शिक्षण पद्धतीत दोष; महाराष्ट्रातून विरोध
ब्रिटिशांच्या राजवटीला बळकटी आणणारी शिक्षणपद्धती देशात स्थिर होत असतानाच असंतोष निर्माण झाला. प्रचलित शिक्षणाचा एकांगीपणा, व्यवसायिक शिक्षणाचा अभाव, सर्वसामान्यांची शिक्षणाबद्दल उदासीनता आणि स्त्रीशिक्षणाकडे दुर्लक्ष असे अनेक दोष समोर येऊ लागले. लोकहितवादी, फुले, रानडे, चिपळूणकर, टिळक आणि आगरकर यांनी तत्कालीन सरकारी शिक्षणपद्धतीमधील दोषांवर हल्ला चढवायला सुरुवात केली. त्यातून राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीचा जन्म झाला. महात्मा गांधीजींनी १९२१ मध्ये सुरू केलेल्या असहकार चळवळीमुळे राष्ट्रीय शिक्षणाला चालना मिळाली. नंतरच्या काळात ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांनी अंगणवाड्या, बालशिक्षण, आदिवासींसाठी मातृभाषेतून शिक्षण असे अभिनव प्रयोग शिक्षणक्षेत्रात केले.

आशियातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था ‘रयत’ची स्थापना
सन १९२४ मध्ये ‘स्वावलंबनातून शिक्षण’ या ध्येयाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. भाऊरावांनी दुधगाव (जि. सांगली) येथे ‘दुधगाव विद्यार्थी आश्रम’ नावाचे वसतिगृह सुरू केले. त्यामुळे ग्रामीण भागांतील मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. अशाच प्रकारची वसतिगृहे सातारा जिल्ह्यातील नेले व काले या ठिकाणी सुरू झाली. आज या संस्थेमध्ये ४५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

स्वयंसेवी संस्थांची सुरुवात
मिशनऱ्यांनी चालवलेल्या शाळा ही महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांची सुरुवात होती. सन १८५० च्या सुमारास अशा शाळांमधून धार्मिक शिक्षण देण्याचा प्रघात होता. ही बाब स्वतंत्र वृत्तीच्या लोकांना आवडली नाही. या देशातील लोकही इंग्लिश भाषेतून शिक्षण देऊ शकतात, अशा निश्चयाने सन १८६० पासून पुण्यात खासगी शिक्षणसंस्थांचे काम सुरू झाले. सध्या अस्तित्वात असलेल्या शिक्षणसंस्थापैकी अशा प्रकारची पहिली संस्था म्हणजे त्या वेळची ‘पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन असोसिएशन’. या संस्थेचे पुढे ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ असे नामकरण झाले. पुण्यातील भावे स्कूल, गरवारे महाविद्यालय या याच संस्थेच्या शाखा होत्या. ही संस्था वामन प्रभाकर भावे यांनी सन १८६० मध्ये स्थापन केली.

विविध माध्यमांच्या शाळा
महाराष्ट्रामध्ये इंग्लिश आणि मराठी या माध्यमांच्या शाळांव्यतिरिक्त मुंबई शहरात, ठाणे जिल्ह्यात, तसेच विदर्भातील काही भागांत मराठीबरोबरच गुजराती माध्यमाच्या शाळाही आहेत, तर कोल्हापूर, सांगली, मुंबई, पुणे येथे कन्नड माध्यमाच्याही काही शाळा आहेत. मुसलमान वस्ती असलेल्या ठिकाणी उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत.

मतिमंद मुलांचे शिक्षण
स्वातंत्र्योत्तर काळात व्यावसायिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण, मतिमंद मुलांचे शिक्षण, प्रौढशिक्षण अशा शिक्षणाच्या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. मतिमंद, मूकबधिर, अपंग, अंध इत्यादींच्या शिक्षणासाठी काही वेगळे करायला हवे, ही जाणीव निर्माण झाली आणि मुंबईत हाजी अली, पुण्यात कामायनी शाळा, रुईया मूकबधिर विद्यालय या मतिमंद मुलांसाठीच्या शिक्षणसंस्था सुरू झाल्या.

राज्यातील प्रमुख विद्यापीठे
मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, मराठवाडा आणि एसएनडीटी अशी सहा प्रमुख विद्यापीठे राज्यात आहेत. याशिवाय राहुरी, अकोला, परभणी, दापोली येथे कृषी विद्यापीठे आहेत. पुणे येथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ही एक स्वतंत्र संस्था आहे, तसेच आयआयटी (पवई), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (चेंबूर) अशाही विद्यापीठसदृश मान्यता असलेल्या संस्था महाराष्ट्रात आहेत. कला, शास्त्र आणि वाणिज्य हे विषय शिकवणारी जवळजवळ ४०० महाविद्यालये महाराष्ट्रात आहेत.

अभियांत्रिकी, वैद्यक, कृषी, व्यवस्थापन, कायदा इत्यादी अनेक प्रकारच्या व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संस्था महाराष्ट्रात असून, राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उच्च आहे. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी शेतीसुधारणांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
*
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF)-२०२३’ म्हणजेच, देशभरातील शैक्षणिक संस्थांचे व विद्यापीठांचे रँकिंग जारी करण्यात आले. त्यानुसार देशातील इंजिनिअरिंग शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई आयआयटीचा तिसरा क्रमांक लागतो, तर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये मुंबई आयआयटी चौथ्या क्रमांकावर आहे. देशातील दंतमहाविद्यालयांच्या यादीमध्ये पुण्याचे डी. वाय. पाटील विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
*
सन १९५८ मध्ये स्थापन झालेली ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे’ ही देशातील प्रमुख अभियांत्रिकी संस्थांपैकी एक आहे. ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ आणि ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ यांसारख्या प्रतिष्ठित संस्था मुंबईत आहेत. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूर’ आणि ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई’ यांसारख्या संस्थांनी शिक्षणात राज्याचे महत्त्व राखले आहे.
*
गेल्या काही वर्षांत, महाराष्ट्र सरकारने दर्जेदार शिक्षणात प्रवेश वाढवण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम आणि धोरणे हाती घेतली. आयटी-आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणारी ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड’ (MKCL) हे त्याचेच उदाहरणे होय.
*
अलीकडच्या काळात शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया मानली जाते. त्यादृष्टीने शिक्षणाचा अभ्यास करणारी व संशोधन करणारी पुण्यातील ‘विद्याभारती’सारखी संस्था अशा प्रकारची भारतातील एकमेव संस्था आहे. वेगवेगळ्या विद्याशाखांतर्गत शिक्षणशास्त्रात पीएच.डीसाठी मार्गदर्शन करणे, कृतिरूप संशोधनाचे काम हाती घेणे अशी विविध कामे ही संस्था करते.
*
लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर सन १८५७ मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. सन १८८३ मध्ये स्त्रियांना सर्व पदव्यांसाठी प्रवेश देणारे हे भारतातील पहिले विद्यापीठ होते. या विद्यापीठातून शिकलेल्या अनेकांनी जगाच्या पाठीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. होमी भाभा, न्या. एम. सी. छागला, महंमद अली जीना, फिरोजशहा मेहता, स्वातंत्र्यवीर सावरकर, यांच्यापासून ते लालकृष्ण अडवानी यांच्यापर्यंत अनेकांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेतले.
*
आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात विविध क्षेत्रांत आपण यशस्वी मजल मारली आहे. ‘चांद्रयान-३’ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लवकरच उतरेल. चंद्राच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. देशपातळीवरील ह्या प्रगतीमध्ये महाराष्ट्रातील असंख्य शिक्षणतज्ज्ञांचे, विद्वानांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे.
*
शिक्षणक्षेत्रासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेली विद्यमान काळातील काही महाराष्ट्रीय उदाहरणे : अमेरिकेतील आरोग्य, देखभाल, तंत्रज्ञान व उपाययोजना या क्षेत्रात काम करणाऱ्या ELLKAY या कोट्यवधींची उलाढाल असलेल्या कंपनीचे अध्यक्ष अजय कापरे हे महाराष्ट्रीय आहेत. आंतरराष्ट्रीय ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळवणारे शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी ‘एकलव्य फाउंडेशन’च्या माध्यमातून उपलब्ध करून देणारे राजू केंद्रे, रस्त्यावरील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे या उद्देशाने ‘दादाची शाळा’ सुरू करणारा एकवीसवर्षीय अभिजित पोखर्णीकर…हे सगळे जण महाराष्ट्रीय आहेत. याशिवाय, शैक्षणिक प्रश्नांवर काम करणाऱ्या विद्यार्थी संघटनाही महाराष्ट्रात आहे.
*
एकूण काय तर, मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिक्षणामुळे सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक प्रगल्भता निर्माण होते. काळाची पावले थेटपणे ओळखता येतात. काळासोबत धावत असताना काळाच्या पलीकडचीही स्थिती-परिस्थिती समजून घेण्यासाठी उपयोग होतो तो शिक्षणाचाच.

महात्मा फुले यांच्याच शब्दांत सांगायचे तर, विद्येमुळे मती अधिकाधिक कार्यक्षम होते व पुढचे अनेक अनर्थ टळतात. असे अनर्थ कसे टाळता येतील हे महाराष्ट्राने खूप आधीपासूनच ओळखले आहे व स्वतःच्या सर्वांगीण विकासाबरोबरच देशाच्या जडणघडणीतही आपले अमूल्य असे शैक्षणिक योगदान दिले आहे.

0X0X0

नाव : छाया काविरे (९०२२५३५६०८)
महाविद्यालय : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
पत्ता : सिंहगड रोड, पुणे

मुलांचं जीवन सार्थकी लावणारी ‘सार्थक’ संस्था

(पुणे जिल्ह्यातल्या सासवडजवळ असलेल्या ‘सार्थक सेवा संघा’च्या बाल-आश्रमाला रविवारी ‘मदत वेल्फेअर ट्रस्ट’च्या टीमसोबत भेट दिली. पूर्ण दिवस तिथल्या मुलांबरोबर घालवल्यावर समजून घेतलेला त्यांचा हा प्रवास…)

तुमच्याकडे सगळ्या सोई-सुविधा असतानाही तुम्हाला जगण्याचा कंटाळा आलाय…? नवीन काहीतरी शिकण्याचं स्पिरिट तुमच्यात नाहीय…? की तुम्हाला एनर्जेटिक वाटत नाहीय…? मग तर तुम्ही ‘सार्थक सेवा संघा’च्या बाल-आश्रमाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

पुण्याहून ४५ किलोमीटरवर असलेल्या या आश्रमात रस्त्यावर जन्मलेली, फुगे-पेन-पेन्सिल-खेळणी विकत वाढलेली ९४ मुलं-मुली तुम्हाला भेटतील. तीन वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते वीस वर्षांच्या नवतरुणापर्यंतच्या वयोगटातील ही मुलं-मुली आहेत. समाजात स्वतःला सिद्ध करण्यासाठी, जातीचा आणि चोरीचा स्वतःवरील टॅग दूर करण्यासाठी ही पोरं लढत आहेत. आणि, या सगळ्यात त्यांचे पालक म्हणून भूमिका निभावत आहेत अनिल कुडिया.

रस्त्यावरील मुलांचं आणि त्यांच्या माता-भगिनींचं अनेक स्तरांवर शोषण होत असतं. कारण, रस्त्यावरची ‘वस्तू’ आपल्यासाठी सार्वजनिक असते ना! या मुलांचं शोषण थांबवण्यासाठी आणि त्यांनाही माणसासारखं जगता यावं यासाठी सन २००९ मध्ये ‘सार्थक सेवा संघा’च्या बाल-आश्रमाची आंबळे या गावी (तालुका : पुरंदर, जिल्हा : पुणे) स्थापना झाली.

कुडिया सांगतात, “मुलांना संस्थेत आणणं तर सोप असतं; पण खरं चॅलेंज असतं ते या मुलांना टिकवून ठेवणं…त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करणं, त्यांना भाषेचं ज्ञान देणं. लमाण, फासेपारधी अशा समाजांतून येणाऱ्या या मुलांना शिक्षण घेताना भाषेची प्रचंड अडचण येते. आणि, या सगळ्यात महत्त्वाचं टास्क म्हणजे या मुला-मुलींमधील कला ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव देणं. या मुलांच्या जन्माचीही बऱ्याचदा नोंद नसते, त्यामुळे त्यांची डाॅक्युमेंट्स तयार करून घेण्यातही अडचण येते.”

कुडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याचदा या मुलांचे पालक येऊन मुलांना परत घेऊन जातात. कारण, फुगे-पेन-पेन्सिल-खेळणी वगैरे विकून ही मुलं त्यांना दिवसाला अडीचशे-तीनशे रुपये कमावून देत असतात. या मुलांना संस्थेत परत आणण्याच्या प्रक्रियेत चीप लेबर्सकडून काही अडचणी जाणीवपूर्वक निर्माण केल्या जातात. कारण, या मुलांना संस्थेत परत नेल्यास या समाजकंटकांचे काही तोटे होणार असतात. ‘काय को लेके जा रे’, ‘ये थोडी बदलनेवाले है’, ‘क्या होनेवाला है’, ‘तुम अपना टाईम बरबाद कर रहे हो’ अशा प्रकारची नकारात्मक वाक्ये ऐकवून हे समाजकंटक अडथळे आणत राहतात. त्यांच्याकडून या मुलांना व्यसनांची सवय लावली जाते. कारण, शुद्धीवर नसलेल्या, सतत कसल्या तरी तारेत राहणाऱ्या कुठल्याही व्यसनाधीन माणसाचं शोषण करणं त्यामुळे सोपं होतं. थोडेफार पैसे देऊन या मुलांकडून छोटे-मोठे गुन्हे करून घेतले जातात.

या मुलांना बऱ्याचदा शाळेतही शिक्षकांकडून भेदभावाची वागणूक दिली जाते. शिकवताना या मुलांना इतर मुलांपासून वेगळ बसवणं, जेवण घेण्यासाठी वेगळ्या रांगेत उभं करणं, शाळेत पुस्तकवाटप केलं जात असताना त्यांना डावलणं किंवा कुणाची साधी चप्पलही चोरीला गेली तर याच मुलांवर आळ घेणं…असे अनेक प्रकार या मुलांच्या बाबतीत केले जात असल्याची माहिती कुडिया देतात. अशा अनेक प्रश्नांना, अडचणींना सामोरं जात जात ही मुलं आज वाढत आहेत.

‘सार्थक सेवा संघा’च्या बाल-आश्रमातील ही मुलं शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त रोज आपल्या आवडीनुसार टेबल टेनिस, क्रिकेट आणि फुटबॉल खेळतात. यातील अनेकांनी त्या त्या खेळात प्रावीण्य मिळवत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे.

या मुलांना भेटल्यावर त्यांच्या टपोऱ्या डोळ्यांमध्ये एक उत्तम खेळाडू, डॉक्टर, वकील, फॅशन डिझायनर, गायक आणि या सगळ्यांचे ‘पप्पा’ अनिल कुडिया यांच्यासारखा समाजसेवक व्हायची स्वप्नं तुम्हाला दिसतील…

‘जयंती’

“ता. १४ एप्रिल…डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. जयंतीच्या निमित्तानं शहरात ठिकठिकाणी रॅलीज् निघाल्या होत्या. अशातच एक दाम्पत्य आपल्या दोन लहान मुलांसोबत बाईकनं निघालं होतं. रॅलीमुळे ट्रॅफिक जाम झालेलं होतं. त्यातून पुढं जाण्यासाठी कुठून तरी वाट मिळेल म्हणून बाईक चालवणारी व्यक्ती इकडं तिकडं बघत होती. तितक्यात एक वयस्कर व्यक्ती नशेच्या अवस्थेत बेधुंद होऊन गाडीजवळ आली. दुचाकीस्वार दाम्पत्याला काही कळण्याच्या आतच त्या बेधुंद व्यक्तीनं बाईकची किल्ली काढली आणि दूर गर्दीत फेकून दिली. आणि पुढं…

‘उई माँ उई माँ उई माँ
उई उई उई उई छुई मुई छुई मुई
ओ मोरे साजन तोहे भूख लगे तो…’

या गाण्यावर डुलत ती व्यक्ती गर्दीत गायब झाली. गाडीवरची ती व्यक्ती, त्या व्यक्तीची पत्नी व मुलं भयभीत झाली… पुढं काय झालं मला माहीत नाही. कारण, त्या गर्दीतून मीही मार्ग काढत पुढं निघत होतो…” ऑफिसमधील एक सहकारी मागील वर्षीचा त्याचा अनुभव सांगत होता. “आज घरी जाताना खूप ट्रॅफिक लागेल म्हणून थोडं लवकर निघू या,” असं मी म्हणाले. आणि, चर्चा सुरू झाली ‘जयंती’ची.

एक सहकारी म्हणाली : “रात्री डीजेच्या आवाजानं घरातील वस्तूही व्हायब्रेट होत होत्या.” “डीजेच्या आवाजानं रात्री उशिरापर्यंत झोपू शकलो नाही. पार डोकं उठलं…वैताग आला!” असं दुसरा सहकारी म्हणाला.

मला प्रश्न पडला, “ज्या बाबासाहेबांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्याच बाबासाहेबांच्या जयंतीला आपण कधी कधी असे पशुवत् का वागतो? खरं तर पशूही असं कधी वागत नाहीत. मग आपल्यात असला कसला संचार होत असतो ह्या दिवशी?”

आपल्या समाजबांधवांना, वंचितांना सदैव स्वाभिमानानं जगता यावं…कधीही लाचार म्हणून जगण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये…समाजबांधवांनी साक्षर व्हावं…सुशिक्षित व्हावं म्हणून वंदनीय बाबासाहेबांनी आपलं सारं आयुष्य समर्पित केलं. समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेतलं. विदेशातील नोकरी नाकारली…न्यायालयात न्यायाधीश होणं नाकारलं…घरात ऐशोआरामात जगणं नाकारलं…त्याच बाबासाहेबांच्या जयंतीला आज आपण काय करतोय?

मी असं अजिबात म्हणत नाहीय की सरसकट सगळीकडेच अशीच जयंती साजरी होते. काही ठिकाणी अत्यंत शांततापूर्णसुद्धा जयंती साजरी केली जाते. हे मी मुळीच नाकारत नाही. पण अशा पद्धतीचं प्रमाण किती आहे? आणि कमी आहे तर का कमी आहे? यावर विचार व्हायला हवा.

‘अश्विनी ये ना…दिलाची राणी गं…ये ना प्रिये’, ‘अगं बाय अगं बाय… अगं बाय’, ‘काळी मैना लागली बोलायला’, अशा गाण्यांवर आपले बांधव मद्यधुंद होऊन बाबासाहेबांच्या नावानं स्वतःची इज्जत चव्हाट्यावर मांडतात, तेव्हा हे सुध्दा पूर्णपणे नाकारून चालणार नाही.

एक सहकारी बोलता बोलता आज बोलून गेला : “डेंजर असतात हे लोक, यांच्या नादाला लागून उपयोग नाय…”

हे लोक??

`हे लोक म्हणजे काय? बाबासाहेबांनी तर आपल्याला प्रेमाचा संदेशही दिलाय ना? मग आपल्याबद्दल काही लोकांच्या मनात डेंजर असतात हे लोक असा विचार का येऊन गेला? ह्या लोकांच्या नादी लागून उपयोग नाही, असं काही लोकांना का वाटून गेलं? आपल्या वागण्यामुळं कुणाला असा धाक का वाटावा? अशी दहशत का वाटावी? या सगळ्या प्रश्नांचा विचार व्हायलाच हवा.

बाबासाहेबांची जयंती असो की शिवजयंती असो, दरवर्षी कान आणि डोकं सुन्न करणारे डीजे, ट्रॅफिकमुळे ब्लॉक झालेले रस्ते, आवाजानं डोकं उठणार म्हणून त्या दिवसापुरते दुसऱ्या गावी गेलेले परिसरातील काही आजारी लोक…हे सगळं काय आहे? यावर आपण कधी विचार करणार आहोत की नाही?

याविषयी एका मित्राला समजावण्याचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर आलं : आम्ही बाबासाहेबांची जयंती वर्षभर वाचून आणि एक दिवस नाचूनच साजरी करणार!अरे, पण तुम्ही खरंच बाबासाहेब वाचले असते तर निदान त्यांच्या जयंतीच्या दिवशी तरी असे मद्यधुंद होऊन नाचला नसतात…बेहोष होऊन कोणी फुटपाथवर अस लोळत पडल नसतं. बाबासाहेब हे महामानव समजून घेण्यासाठी आहेत. त्यांच्या जयंतीला लोकांना त्रास व्हावा, असे बाबासाहेब कधीच नव्हते आणि नसतील. विचार करा, आज जर बाबासाहेब हयात असते तर…? आपल्या लेकरांना अशा अवस्थेत बघून त्यांना किती त्रास झाला असता, याची काही कल्पना?

महामानवांच्या शिकवणुकीला हरताळ फासत आहोत आपण! बाबासाहेबांनी आपल्याला डोक्यावर घेतलं आणि आपण त्यांच्याच नावानं लावलेल्या डीजेनं लोकांचं डोकं उठवतोय. कदाचित्, माझ हे लिखाण वाचल्यावर मला बाटलेली आंबेडकरवादीही म्हणायला काहीजण कचरणार नाहीत. ‘इतर जयंतींच्या कार्यक्रमातदेखील डीजे असतात. ट्रॅफिक ब्लॉक होतं…त्यापेक्षा तर हे कमीच आहे ना?’, असाही प्रश्न कुणी उपस्थित करतील…पण हे म्हणजे काहीजण मोठा गुन्हा/चूक करत असतील तर त्यांच्या तुलनेत आम्ही हा छोटा गुन्हा/चुका करत आहोत, असं म्हणण्यासारखंच आहे हे, असं मला नेहमीच वाटत आलंय.

हाच मुद्दा आणखी एका उदाहरणासह सांगते…एखादा सत्ताधारी स्वतःच्या चुकांविषयी स्पष्टीकरण देताना विरोधी पक्षाच्या किंवा पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या चुकांचा पाढा वाचून दाखवतो…अगदी तसंच झालं ना हे? मोठा गुन्हा…छोटा गुन्हा या युक्तिवादात काहीच अर्थ नाहीय.

मी हे सगळं जे मांडलं आहे त्यावर विचार व्हावा, त्यामागची माझी पोटतिडीक समजून घेतली जावी इतकीच अपेक्षा…

-छाया काविरे (chhayakavire02@gmail.com)

#jayanti #jaybhim #drbabasahebambedkar