मोहल्ला ग्रंथालय चालविणारी औरंगाबादची मरियम मिर्झा

कोरोना काळात गल्ली-मोहल्ल्यातील मुलांसाठी स्वतः च्या पुस्तकांपासून औरंगाबादच्या बायजीपुरा गल्ली येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या नावाने एका मुलीने बालवाचनालय सुरू केले. एकीकडे दिवसेंदिवस मुलं वाचनापासून लांब जात असताना मुलांना पुन्हा पुस्तकांच्या जगात नेण्यासाठी ‘पैसा वाचवा, पुस्तक वाचा’ असे म्हणत ग्रंथालयाचे साकडे घालणारी ही १४ वर्षीय मुलगी आहे मरियम मिर्झा.

-छाया काविरे

मरियम सध्या औरंगाबादच्या इकरा उर्दू गर्ल्स हायस्कूल येथे शिकत आहे. मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी तीने मोहल्ला बालवाचनालय अभियानाची सुरवात केली. तीच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची दखल घेत तीला नुकतेच ‘अमेरिकन फेडरेशन ऑफ मुस्लिम्स ऑफ इंडियन ओरिजिन (एएफएमआय) यूएसए आणि कॅनडा’ यांच्या वतीने ‘विशेष सामाजिक पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. दिल्ली नगर निगम सिवेक सेंटरच्या दीनानाथ सभागृहामध्ये आयोजित ३३ व्या आंतरराष्ट्रीय वार्षिक समारोहात दिल्लीचे माजी राज्यपाल लेफ्टनंट जनरल नजीब जंग यांच्या हस्ते तीला पुरस्कार प्रदान करण्यात आले.

विद्यार्थ्यांना वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल? यासाठी तिचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पुस्तकांची आवड निर्माण व्हावी यासाठी काही वेळा विद्यार्थ्यांना मोफत गल्ले वाटप केले जातात, ज्यामध्ये मुले पैसे गोळा करतात आणि या पैशातून त्यांच्या आवडीची पुस्तके खरेदी करतात. तर, कधी ‘घर घर किताब, हर घर में किताब’ या मोहिमेअंतर्गत परिसरात अभ्यासासाठी पुस्तके देखील वाटली जातात. शहरातील विविध गल्ली मोहल्ला व झोपडपट्टीतील गरीब व कामगारांच्या मुलांसाठी ‘रीड अॅण्ड लीड फाउंडेशन’च्या सहकार्याने व ‘फेडरेशन ऑफ ऑल मायनॉरिटी एज्युकेशनल ऑर्गनायझेशन’च्या मार्गदर्शनाने तीने दीड वर्षात ३० बालवाचनालये सुरू केली आहेत.

मरियमचे वडील मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांचे पुस्तकांचे दुकान आहे. त्यामुळे लहानपणापासूनच ती पुस्तकांच्या सहवासात आहे. मरयम इ. ५ वीच्या वर्गात असताना तिने एका ग्रंथालयाला भेट दिली. त्यावेळेस मित्र शेरखान पठाण याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ग्रंथालय सुरु करण्याची कल्पना तिच्या बालमनात आली आणि तिने तिच्या वडिलांकडे हट्ट सुरू केला. तिचे वडील लगेच तयार झाले. त्यावेळेस तिच्याकडे फक्त १५० पुस्तके होती तिच्या वडिलांनी तिला अजून १५० पुस्तके दिली आणि अशा ३०० पुस्तकापासून सुरू झाले ‘बालग्रंथालय’.

ग्रंथालय सुरू करताना तिला अनेक अडचणी आल्या. नवीन पुस्तके खरेदी करायला पैसे नहोते, ग्रंथालय सुरू करायला जागाही नहोती. शिवाय, जागा भाड्याने घ्यायची कुवतही नहोती. मात्र, या सर्व प्रश्नांवर मरियमने मात करत जागा व पुस्तकही मिळवली. तिच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी तिला जागा आणि पुस्तकही दिली. घरातील रिकाम्या खोल्या, ओटा, इतकंच काय तिच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे तिला ग्रंथालयासाठी मशिदीतदेखील जागा मिळाली. आता तिच्या तीस ग्रंथालयात दोन हजार पेक्षाही जास्त पुस्तके आहेत. तिची शाळा सुटली की ती ग्रंथालयाला भेट देते व दिवसभराचा आढावा घेते. बालग्रंथालय चालवायला तिचे वडील तिला मदत करतात.

आताची पिढी वाचत नाही हे मरयमच्या वडीलांना मान्य नाही. ते म्हणतात, ‘‘बरेच पालक बाजारात जाऊन मुलांसाठी पुस्तके खरेदी करत नाहीत. पालक म्हणून आपण त्यांच्या हातात कधी पुस्तक देणार नसाल तर मुलं वाचत नाही हा त्यांच्यावर आरोपही लावायला नको. शहरांमध्ये अनेक ग्रंथालये आहेत पण ते फक्त तरुण आणि प्रौढांसाठी. आपल्याकडे बालग्रंथालय ही संकल्पना या आधी साकारण्यात आली नाही. बऱ्याच ग्रंथालयात तर मुलांना प्रवेशही नसतो.’’ तिच्या मैत्रिणींनासुद्धा तिचे कौतुक वाटते. त्यांना शाळेतल्या ग्रंथालयांऐवजी मरियमच्या ग्रंथालयातील पुस्तके जास्त आवडतात. तिच्या शालेय मैत्रिणी म्हणतात, ‘‘इथे आम्हाला नावनोंदणी करणे किंवा ओळखपत्र दाखवणे बंधनकारक नाही. पूर्ण शाळेला तिच्यावर गर्व आहे.’’ शहरातील या ग्रंथालय चळवळीची माहिती आता अनेकांना होत आहे. अनेक दात्यांनी तिला स्वतः हून मदतही केली आहे. ही चळवळ फक्त औरंगाबाद किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता त्याचा विस्तार देशभर व्हावा, असे मरियमला वाटते.

मरियमचा छोटासा प्रयत्न तिचे मोठे विचार दर्शवितात. गरजेचे नाही की समाजासाठी काहीतरी करायला खूप पैसे हवे. काहीतरी करायची जिद्द असेल तर आपोआप रस्ते खुले होत जातात.

– इम्तियाज जलील, खासदार.

ग्रंथालयाचे वैशिष्ट्य
ग्रंथालयाला कधीही कुलूप लावले जात नाही. मुलं येतात, पुस्तकं घेतात आणि वाचून झाली की प्रामाणिकपणे जागेवर परत आणून ठेवतात. पुस्तकं चोरीला गेली तरी तिला वाईट वाटत नाही कारण ज्ञानाची भूक असणारेच पुस्तकांची चोरी करतात, असं ती म्हणते. हजारो मुलांना या बालग्रंथालयाचा फायदा होत आहे. मुलं म्हणतात, ‘‘इथे आम्हाला शाळेच्या पुस्तकांव्यतिरिक्त महापुरुषांच्या जीवनकथा, विज्ञानाच्या गोष्टी, थोरांच्या गोष्टी, कॉमिक्स वाचायला मिळतात. त्यामुळे वाचायची आवड निर्माण होते व सवयही लागते. आतापर्यंत दोन हजारपेक्षा जास्त मुलांना या ग्रंथालयाचा फायदा झाला आहे.

धर्मापलीकडची ‘डोळस’ प्रेमकहाणी

रज्जाक आणि वृषाली यांचा प्रेरणादायी प्रवास

नाशिकमध्ये असे एक जोडपे आहे, ज्याने धर्माच्या भिंती तर ओलांडल्याच शिवाय शारीरिक व्यंगावर मात करून आपले नवे व्यासपीठ तयार केले आहे. दृष्टिहीन असलेली, काव्यातून आणि निवेदनातून आपले दुःख विसरणारी वृषाली गुजराथी आणि निवेदनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करत भ्रमंती करणारे रज्जाक शेख… या दोघांच्या प्रेमाची गुंफण घालणारी संघर्षमय कथा…

– छाया काविरे

वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत सर्वसामान्य मुलींप्रमाणे हुंदडणारी-बागडणारी वृषाली अचानक एके दिवशी दृष्टिहीन झाली आणि तिच्या जीवनात काळोख पसरला… रेटिनल पिग्मेंटोसा या आजाराने तिला अंधत्व आले. मात्र, पुढे आपले काय होणार, याची चिंता न करत बसता समोर आलेल्या संकटांना तोंड द्यायचे आणि लढत राहायचे, असा निर्धार त्या कुमारवयीन मुलीने केला. नाशिकमधील ‘केटीएचएम महाविद्यालया’त सन २००० मध्ये हिंदी विषयात बीएचे शिक्षण घेत असताना परीक्षेसाठी तिला ‘रायटर’ म्हणून मदत हवी होती. त्या वेळी रज्जाक शेख या तरुणाने तिला मदत केली.

रज्जाकचे अक्षर सुंदर होते, लिहिण्याचा वेग चांगला होता, त्यामुळे वृषालीही आत्मविश्वासाने त्याला उत्तरे डिक्टेट करू शकली. ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर त्या दोघांचा खूप दिवस संपर्क आला नाही… पण ज्योती गजभिये यांनी नाशिकमध्ये स्थापन केलेल्या ‘हिंदी साहित्य मंच’मुळे त्यांचा पुन्हा संपर्क येऊ लागला. हिंदी साहित्य, कविता यांची वृषाली आणि रज्जाक दोघांनाही आवड असल्याने ते ‘हिंदी मंच’च्या निमित्ताने भेटू लागले, बोलू लागले, अनेक विषयांवर त्यांच्यात चर्चा रंगू लागल्या. परीक्षेच्या निमित्ताने आधी ओळख झालेलीच होती. ‘हिंदी मंच’च्या निमित्ताने ती ओळख दृढ होत गेली आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. अनेक गोष्टींमध्ये दोघांचे एकमत असायचे. दोघांची मते जुळायची. मग विचारही जुळू लागले आणि मनेही. दोघांचीही मते, विचार जुळतात हे त्या दोघांपेक्षा त्यांच्यासोबत कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांना अधिक जाणवायचे. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवात झाली एका नव्या प्रवासाला.

वृषालीने आपल्या प्रेमाबद्दल घरी सांगितले. दोघांच्याही घरी वादळाला उधाण आले. सुरुवातीला तिच्या घरी हे मान्य झाले नाही. तिच्या वडिलांना तिची काळजी वाटत होती. तिच्या अंधत्वाविषयी सुरुवातीला दया आणि नंतर तिटकारा असे तर होणार नाही ना, ही चिंता त्यांना एक वडील म्हणून साहजिकच सतावत होती. त्यातच रज्जाक मुस्लिम, तर वृषाली ही गुजराथी. धर्माचाही प्रश्न होताच…

एकदा वृषाली रज्जाकला तिच्या अंधत्वाविषयी शंकित मनाने बोलली, तेव्हा रज्जाकने दिलेले उत्तर अंतर्मुख करून जाणारे होते. तो तिला म्हणाला : “मला दोन डोळे आहेत, ते आपल्या दोघांसाठी पुरेसे आहेत. इथून पुढे तू माझ्या डोळ्यांनी जग बघशील.”

घरच्यांच्या विरोधाला न जुमानता दोघांनीही ‘हिंदू- मुस्लिम’ हे समीकरण जुळवून आणले. ते दोघे ता. २७ जुलै २००७ रोजी विवाहबद्ध झाले. आयुष्यातल्या एका नव्या इनिंगला सुरुवात झाली. घरच्यांचा किंवा नातेवाइकांचा कुठलाच आधार नसताना त्यांची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे.

वृषालीचा दृष्टिदोष, रज्जाकची बेरोजगारी आणि समाजाची उपेक्षा अशा अडचणींचा सामना करून या जोडीने हसतमुखाने परिस्थितीशी दोन करत तिच्यावर मात केली आहे. एकमेकांना वाटणाऱ्या आंतरिक जिव्हाळ्याने या दोन जिवांना जाती-धर्माच्या, विरोधाच्या व उपेक्षेच्या भिंती पाडून एकत्र आणले आहे. घरच्यांचा सुरुवातीला असलेला विरोधही आता मावळला आहे. त्यांची दोघांची भरारी पाहून तेसुद्धा आता खूश आहेत.

पुढे दोघांनी एकमेकांच्या सोबतीने आपल्या आवडीच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी ‘मिरॅकल’ नावाची कंपनी स्थापन केली. आकाशवाणीचे आणि सरकारी योजनांचे माहितीपट, जाहिराती करण्यास सुरुवात केली. बेरोजगार असलेल्या रज्जाकला वृषालीच्या रूपाने मोठा आधार मिळाला. दरम्यान, अनेक चढ-उतार, अडचणी त्या दोघांना विळख्यात घेण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, दृष्टिहीन वृषाली रज्जाकला मानसिक आधार देत राहिली.

कविवर्य कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे : ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला!

अशी अनंत ध्येयासक्ती बाळगून आज वृषालीचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंदवले गेले आहे. आणि, ती भारताची पहिली अंध महिला रेडिओ स्टार झाली आहे. अंध असूनही कोणत्या जाहिरातीला कसा आवाज सूट होईल, सुयोग्य होईल याचा अंदाज घेऊन वृषाली आपला आवाज वापरत असते. ती कविता तर करतेच; शिवाय, चांगले गायनही करते. बाहेरचा इतका व्याप असूनही वृषाली घरात सर्वसामान्य गृहिणीसारखीच वावरते. घरात वयोवृद्ध सासूबाईंची सेवा असो, घरातली साफसफाई असो, ही सगळी कामे ती कुशलतेने करते.

मुख्य म्हणजे, अंध असूनही गॅसवर सराईतपणे स्वयंपाक करण्यात तिचा हातखंडा आहे. रज्जाकही सामाजिक संस्थांसाठी डॉक्युमेंट्रीज् करण्यात व्यग्र असतो. या कामाबरोबरच सामाजिक कामातही तो अग्रेसर असतो. मेधा पाटकर यांच्यासमवेत ‘नर्मदा बचाव आंदोलना’तही तो सक्रिय होता. आलेल्या संकटांना परिस्थितीला न डगमगता, हसत हसत तोंड देत खरोखरच त्यांच्याकडून एखाद्याने सुखाचा मंत्र घ्यावा, असे हे जोडपे आहे. वृषाली-रज्जाक ह्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. रायमा तिचं नाव.

वृषाली आणि रज्जाक आज ज्या ध्येयापर्यंत पोहोचले आहेत तिथपर्यंत जाणारा प्रवास अत्यंत चढ-उतारांचा, खाचखळग्यांचा, परीक्षा पाहणारा तर होताच; पण खूपदा प्रोत्साहित करणाराही होता. ‘मिरॅकल मस्ती’, ‘मिरॅकल मसाला’ या कार्यक्रमांदरम्यानच्या आठवणीमध्ये रमताना रज्जाक सांगतात : “२८ डिसेंबर २००७ रोजी सुरू झालेला ‘मिरॅकल मस्ती’ हा दर शुक्रवारी प्रसारित होणारा १५ मिनिटांचा कार्यक्रम. मी ‘राही’ या नावाने आणि वृषाली ‘दिशा’ या नावाने श्रोत्यांना भेटायचो. यादरम्यान एकदा वृषाली खूप आजारी पडली. तिला दवाखान्यात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितली. शुक्रवार जवळ येऊ लागला तसतशी वृषालीची तगमग वाढू लागली. श्रोत्यांसोबतची ॲटॅचमेंट तिला बेचैन करू लागली. तिने विचार केला : ‘शो मस्ट गो ऑन एअर’. मग सुरू झाली डॉक्टरांची मनधरणी. डॉक्टर परिचित असले तरी त्यांना तिच्या प्रकृतीची काळजी जास्त असणे स्वाभाविकच होते; पण शेवटी डॉक्टरांना राजी करण्यात वृषाली यशस्वी झाली. डॉक्टरांनी अत्यंत नाखुशीनेच दिलेली एक-दीड तासाची परवानगी घेऊन रिक्षाने आम्ही स्टुडिओ गाठला. तिथे वृषालीने आरामखुर्चीवर पडूनच अत्यंत प्रभावशाली सादरीकरण केले. शो एअरवर गेला. संपला.

नेहमीप्रमाणे श्रोत्यांच्या फोन कॉल्सचा पाऊस सुरू झाला. एकीकडे वृषालीच्या डोळ्यांतून घळघळा वाहणाऱ्या अश्रुधारांतून श्रोत्यांवरचे प्रेम व्यक्त होत होते आणि सोबत सुरू होता असंख्य चाहत्यांसोबत सुखसंवाद. त्यात आजाराची जाणीव कुठल्या कुठे पळून गेली.”

रज्जाक म्हणतो : “एवढे नक्की आहे की, ही वाटचाल सोपी नव्हती. ‘अपंग-सदृढ’, ‘आंतरधर्मीय’ अशी विशेषणे या लग्नाला लाभलेली असल्याने अनेक हितचिंतकांनी ‘सुखाने नांदा’ हा आशीर्वाद मनापासून दिला, तसेच दोघांकडच्या काही हितशत्रूंनी ‘पाहू किती दिवस जमतंय’, असं म्हणून नाकही मुरडले. मात्र, गेल्या २७ जुलैला लग्नाचा सातवा वाढदिवस मित्रमंडळींसमवेत मोठ्या उत्साहात साजरा केला. या सहजीवनाचा आनंद आम्ही निरंतर घेत आहोत. हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवसही आम्ही आमच्या श्रोत्या-मित्रांसोबतच साजरा केला होता.”

तर, वृषाली म्हणते : “रज्जाकने लिहिलेल्या प्रायोजनमूलक हिंदीच्या पेपरमध्ये ‘जाहिरात तयार करा’, असा एक प्रश्न होता. मी एका केशतेलाची जाहिरात रज्जाकला डिक्टेट करून तयार केली आणि आज आमच्या ‘मिरॅकल ॲड एजन्सी’च्या माध्यमातून आम्ही जाहिरातीच तयार करत आहोत. आज रेडिओच्या ‘मिरॅकल मस्ती’, ‘मिरॅकल मसाला’, ‘ज्ञानरंगोली’, ‘फैशन धमाका’, ‘मैत्री तुमची-आमची’ अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठा ‘मिरॅकल-परिवार’ लाभला आहे. लग्नाआधी मी, आकाशवाणीचा निवेदक असलेल्या रज्जाकची फॅन होते. (त्याच्या अनेक कार्यक्रमांचे ऑडिओ कॅसेट्समध्ये मी रेकॉर्डिंग करून ठेवलेय). आणि, आज आम्हा दोघांचे मिळून असंख्य फॅन आहेत.”

पत्रिकेच्या अंधश्रद्धेबाबत भाष्य करताना ते दोघेही म्हणतात : “आमचे पत्रिकेबाहेरचे अनेक गुण जुळले. काव्य, वृत्तनिवेदन, सामाजिक कार्य अशा अनेक गोष्टींत आम्हा दोघांनाही समान रस आहे. काही स्वतंत्र गुणही आहेत.” रज्जाकबाबत व स्वतःबाबत वृषाली म्हणते : “तो एक उत्कृष्ट डॉक्युमेंट्री-मेकर आहे, कॅमेरामन आहे, चित्रकार आहे, पत्रकार आहे; तर मी गायिका, संगीतकार, कॉपीरायटर इत्यादी…”

एखाद्या फिल्मी स्टोरीसारखे ह्या दोघांचे जीवन वाटत असले तरी चित्रपटातल्यासारखे यात खोटे काहीही नाही. दिसत नसल्याने स्वयंपाकाच्या वेळेस बोटाला कापणे- चिरणे, चटके बसणे हे जितके खरे, तितकीच रज्जाकने त्यावर घातलेली प्रेमाची फुंकरही खरी असते. किचनमध्ये रज्जाकची वृषालीला आणि घराबाहेर वृषालीची रज्जाकला मदत असते. त्यांचा जवळपास प्रत्येक निर्णय परस्परसहमतीने होतो. जीवनात खूप गमतीजमती घडतात. निराश करणारे प्रसंगही येतात; पण अशा वेळी वृषाली तिच्या मनाला स्वतःच्याच शब्दांनी आधार देते. ‘जश्न’ या तिच्या कवितेत तिने म्हटल्याप्रमाणे :

जिंदगीभर गम से आँखे चुराते ही रहे हम
लाख मुश्किलें आने पर भी मुस्कुराते ही रहे हम
हारना तो हम ने जिंदगी में सीखा ही नही कभी
बरबादियों का भी जश्न मनाते ही रहे हम।

खचलेल्यांना स्फूर्ती देणारे ‘प्रा. डॉ. आजम शेख’

घरातील आर्थिक परिस्थिती हालाकीची. एका संस्थेच्या कमवा व शिका योजनेच्या माध्यमातून हॉटेलमध्ये वेटरचे काम करत त्याने सुवर्णपदक मिळवत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पुढे एका शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पीएचडी पदवी पूर्ण करण्यासाठी त्याने तैवान गाठले. पीएचडीनंतर त्याला जपान येथे नोकरीही मिळाली. परंतु, आपल्या देशातील आपल्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करता यावी यासाठी त्याने पुन्हा महाराष्ट्रात येऊन काही समविचारी व्यक्तींसोबत मुळशी तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी काम सुरु केले. ही कथा आहे नव्याने घडणाऱ्या विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणाऱ्या प्रा. डॉ. आजम शेख यांची.छाया काविरे

– छाया काविरे

आजम हे मूळ दौंड तालुक्यातील मलठण येथील असून वडीलांच्या नोकरीनिमित्त ते मुळशी तालुक्यातील भरे या गावी स्थायिक झाले. सध्या ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे एम. आय. टी. कनिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक म्हणून काम करतात. त्यांचे शिक्षण बीएससी (केमिस्ट्री), एमएससी (ऑरगॅनिक केमिस्ट्री), पीएचडी (ऑरगॅनिक केमिस्ट्री, तैवान), पोस्ट-डॉक (ऑरगॅनिक केमिस्ट्री, जपान) झालेले आहे. लहानपणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आल्यामुळे अनेक समाजोपयोगी कामांमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली. सामाजिक क्षेत्रामध्ये निःस्पृहपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सहवास त्यांना लाभला व यातूनच सामाजिक कामाची आवड निर्माण झाली.

‘शिक्षण व संस्कार’ या विषयात १९९५ पासून आजम काम करीत आहेत. त्यांच्या या कामामुळे अनेक युवक युवती शिक्षित झाले असून ते आज स्वत:च्या पायांवर उभे आहेत. तर, त्यातील काही विद्यार्थ्यांनी परदेशातून शिक्षण पूर्ण केले असून स्वत:ला समाजकार्यात झोकून दिले आहे. तरुणांना घडवणे या त्यांच्या कामाच्या मूळ उद्देशाला अनुरूप असे उपक्रम ते राबवत असतात. शिवचरित्र कथामाला हा त्या पैकीच एक उपक्रम. २००८-०९ सालापासून हा उपक्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला जातो.

अनुभव सांगताना आजम म्हणतात, ‘‘मी प्रथम स्व कष्टाच्या निधीतून मदत दिली आणि त्यानंतर इतरांना आवाहन केले. हे पाहून आवाहनाला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि देणग्यांचा ओघच सुरु झाला. देश विदेशातल्या अनेक परिचित व अपरिचित व्यक्तींनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे उत्स्फुर्त प्रतिसाद दिला तो अनपेक्षित होता. सर्वसाधारणपणे देणगीदाराला स्वतःचे नाव छापून यावे असे वाटते तर, काही देणगीदारांना स्वतःचा नामोल्लेख सुध्द्ध नको, अशी उद्दात सूचना देतात. प्रत्येकजण जमेल तशी मदत करतात. कधी कामाच्या स्वरूपात, कधी वेळेच्या स्वरूपात, कधी वस्तूच्या स्वरूपात तर, कधी आर्थिक स्वरूपात. त्याचबरोबर, शाळेत लागणारे शैक्षणिक साहित्य, ग्रंथालयात लागणारी पुस्तके, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कपडे, आठवड्यातून किंवा महिन्यातून थोडा वेळ काढून संस्थेच्या सेवा प्रकल्पांना भेट देऊन प्रत्यक्ष मदत, अशा स्वरूपात कित्येकजण या कामाशी जोडलेले आहेत. देणग्यांचा अनपेक्षित ओघ आणि प्रसिद्धी परान्मुखता या दोन्ही गोष्टींमुळे माझा उत्साह वाढला तर, दुसरीकडे लोकांनी टाकलेल्या विश्वासामुळे दडपण देखील येते.”

ते पुढे म्हणतात, ‘‘विकास म्हणजे केवळ पैसे खर्च करून गावात रस्ते, हॉस्पिटल, शाळा वगैरे केवळ दान दिल्यासारखे बांधून देणे नव्हे. विकास म्हणजे व्यक्ती किंवा समूहाला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवणे. एखाद्या छोट्या रोपट्यावर सावली येत असेल तर ती सावली दूर करून त्याला स्वच्छ ऊन मिळू देणे आणि त्याला वाढू देणे म्हणजे त्याचा विकास होय. सावली बाजूला न करता केवळ खर्चिक रासायनिक खते देत राहणे म्हणजे विकास नव्हे. अशाप्रकारे संस्कार आणि विकासाचे व्यापक अर्थ या कामामुळे मला उमजले.’’

भटके विमुक्त व पारधी समाजासाठी काम करणारे गिरीश प्रभुणे, राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेचे अनिल व्यास हे सामाजिक क्षेत्रात आजम यांचे आदर्श आहेत. शासनाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करताना आजम सांगतात, ‘‘सामाजिक काम करत असताना शक्यतो आम्ही शासनाची मदत मिळेल किंवा ती मिळाली तरच आपल्याला काम करता येईल हा दृष्टिकोन न ठेवता, लोकसहभाग कसा जास्तीत जास्त वाढेल याकडे लक्ष देत असतो. आपल्या कामाचा जास्तीत जास्त गरजूंना लाभ मिळावा हेच लक्ष्य ठेवले तर काम चिरंतन राहते, यावरच आम्ही विश्वास ठेवतो. ‘राष्ट्रीय सर्वांगिण ग्रामविकास संस्था’ व ‘श्री प्रतिष्ठान’ या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील सुतारवाडी येथे आयटीआयचा अभ्यासक्रम शिकवला जातो. शासनाला मदत करायची असेल तर, या आयटीआयमध्ये अजून काही तंत्रकौशल्याचे कोर्सेस सुरू करण्यासाठी मदत करावी.’’ ‘राष्ट्रीय सर्वांगिण ग्रामविकास संस्था’ व ‘श्री प्रतिष्ठान’ यांच्या माध्यमातून आजम विविध उपक्रम राबवीत असतात. त्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

नेमकी काय आहे ‘एक मूठ धान्य’ योजना ?
वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या माध्यमातून `एक मूठ धान्य’ योजना चालवली जाते. पुण्यातील कोथरूड भागातील ६०-७० कुटुंबे या योजनेसाठी मदत करतात. घरातील स्वयंपाकासाठी जे अन्न काढले जाते त्यातून हे कुटुंबीय रोज एका पिशवीमध्ये एक मूठ धान्य वेगळे काढतात. महिन्याच्या शेवटी ते धान्य एकत्र करून वसतिगृहात पाठविण्याची व्यवस्था केली जाते. गेल्या १५ वर्षांपासून ही मदत अखंड सुरु आहे.

महिलांच्या स्वावलंबनासाठी विना तारण बचतगट
ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी व्हाव्यात, या उद्देशाने महिलांचे गट गावागावात संघटित केले आहेत. सुमारे ६५ बचतगटांची बांधणी करून अंदाजे ७०० महिलांचे संघटन उभे केले आहे. महिन्यातून एकदा या गटांची बैठक होते. त्यामध्ये बचतीची रक्कम गोळा केली जाते आणि गरजू महिलांना कर्जाचे वाटप करण्यात येते. याशिवाय महिलांना शिवणकाम करणे, पापड, लोणचे बनवणे इ. कामांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे व्यवसाय करायला संधी उपलब्ध होते. त्याद्वारे काही महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकल्या आहेत. गरीब महिलांना कोणतेही तारण न ठेवता कर्ज दिले जाते. त्याचबरोबर, महिला बचत गटांमार्फत अहिल्याबाई होळकर जयंती आणि महिला दिन असे कार्यक्रम दरवर्षी साजरे होतात.

हिंमत शाळा
ग्रामीण भागात अनेक कारणांनी शिक्षण अर्धवट सोडले जाते आणि दुर्दैवाने तरुण मुले गुन्हेगारीकडे किंवा व्यसनांकडे वळतात. पालकही त्या बाबतीत अतिशय हतबल असतात. यासाठी खास नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्यात आली. हिंमत सोडलेल्या मुलांना नवी उमेद देणारी शाळा म्हणून या शाळेचे नाव ‘हिंमत शाळा’ असे आहे. सुरुवातीच्या काळात कार्यकर्ते गावागावात जाऊन अशी नापास झालेली किंवा शाळा सोडलेली मुले व मुली शोधून त्यांच्या घरी पालकांशी संवाद साधून त्यांना शाळेत आणले जात असे. दूरच्या गावातील विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व जेवणाची सुद्धा सोय केली जाते. आता अशी गरजू मुले आपणहून शाळेत प्रवेश घेतात. शाळेत त्यांचा अभ्यास करून घेऊन त्यांची दहावीच्या परीक्षेची तयारी करून घेतली जाते. सुमारे २५ मुले दरवर्षी या शाळेत शिक्षण घेतात. त्यापैकी ७० ते ८० टक्के विद्यार्थी यशस्वी होतात. त्यांच्या आयुष्याला त्यामुळे एक नवी दिशा मिळते. मुले खऱ्या अर्थाने मार्गी लागतात. नुसताच शालेय अभ्यासक्रम न शिकवता मुलांना काही व्यवसाय मार्गदर्शन सुद्धा दिले जाते. उदा. मोबाईल रीपेयरिंग, नर्सरी इ.

इतर समाजोपयोगी उपक्रम
उसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी फिरती शाळा चालविणे, नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून औषधांचे वाटप करणे, त्याचबरोबर मोबाईल रिपेअरिंग, तबला वादन, नृत्य, ब्युटी पार्लर, रोपवाटिका असे प्रशिक्षण वर्गसुद्धा गरजेनुसार चालवले जातात. आजपर्यंत मोबाईल रिपेयरिंग कोर्स केलेल्या तिघांनी स्वतः चे व्यवसाय सुरु केले आहे. तर, एक तरुण रोपवाटिका चालवून आर्थिकदृष्ट्या स्वतः च्या पायावर उभा आहे. सुट्टीमध्ये शालेय विद्यार्थ्यासाठी तीन दिवसांची शिबिरे घेऊन व्यक्तिमत्व विकासासाठी काही उपक्रम राबवले जातात.

Where is भिडेवाडा?

शैक्षणिक क्रांतीचा…मुक्तीचा ‘Landmark’ कुठाय?

राजकीय हस्तक्षेप, अर्थकारण, तारीख पे तारीख, आश्वासने, बदलत जाणाऱ्या भूमिका, सातत्यपूर्ण आंदोलने, मोर्चे, वारंवार स्थापन केल्या जाऊनही निराशाच पदरी पडलेल्या समित्या आणि इतर अनेक छोट्या-मोठ्या घटनांत शेवटची घटका मोजणारी वास्तू म्हणजे भिडेवाडा अर्थात् मुलींची भारतातील पहिली शाळा…हा भिडेवाडा आज ‘Where is भिडेवाडा’ या लघुपटातून सर्वदूर पोहोचत आहे.

– छाया काविरे

विशेष म्हणजे, शिक्षणाशी संबंधित असलेला हा भिडेवाडा ‘विद्येच्या माहेरघरा’च्या अर्थात् पुण्यनगरीच्या मध्यवर्ती भागात, अती गजबजत्या-झगमगत्या परिसरातच आहे ! …आणि तरीही, बहुसंख्य नागरिकांवर हे विचारण्याची दुर्दैवी वेळ येत आहे की : ‘व्हेअर इज भिडेवाडा? शैक्षणिक क्रांतीचा, मुक्तीचा तो Landmark कुठाय?’

हेच दाहक वास्तव ‘Where is भिडेवाडा?’ या लघुपटाद्वारे परिणामकारकपणे चित्रबद्ध करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, ‘जोवर भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक होत नाही, जोवर तिथे इमारत उभी राहत नाही तोवर ही लढाई अविरत सुरूच राहील,’ असे या लघुपटातून ठणकावून सांगण्यात आले आहे.

पुण्यातील तरुण हृदयमानव अशोक याने या लघुपटाचे लेखन-दिग्दर्शन केले असून,’ एवढे ऐतिहासिक महत्त्व असलेला भिडेवाडा नेमका आहे तरी कुठे?’ हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण करून त्यांना विचार करायला त्याने भाग पाडले आहे.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात ता. १ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा सुरू करून ‘चूल आणि मूल’ या शतकानुशतकांच्या मानसिकतेतून, रूढी-परंपरेच्या जाचातून स्त्रियांना खऱ्या अर्थाने मुक्त केले. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या ना त्या कारणाने या वास्तूचे राष्ट्रीय स्मारक होऊ शकलेले नाही.

भिडेवाड्यात पुन्हा नव्याने शाळा सुरू करण्याचे आश्वासन नुकतेच दिले गेले आहे, हे खरे असले तरीही अशा आश्वासनांचा संथगतीचा इतिहास नजरेआड करता येत नाही. हा संथगतीचा कारभार अस्वस्थ करून टाकणारा आहे. या एकूणच स्थितीचा अभ्यास करून समाजातल्या शेवटच्या घटकाला ‘भिडेवाडा’ या वास्तूचं भीषण वास्तव आणि अंतर्गत छक्के-पंजे कळावेत, या वास्तूची आजची स्थिती माहीत व्हावी, जर असं झालं तरच यासंदर्भातील जन-आंदोलनाला मोठं स्वरूप येऊ शकेल, अशी भूमिका या लघुपटाच्या निर्मितीमागे आहे.

‘राष्ट्रीय स्मारकांचे जतन करणे’ हे राज्यघटनेतील कलम प्राधान्याने लक्षात घेऊन भिडेवाड्यासंदर्भात लघुपटाद्वारे लोकचळवळ उभी करण्याचा तरुणांनी केलेला हा प्रयत्न भिडेवाड्याची व्यथा तर मांडतोच मांडतो; पण त्याच्यासंदर्भातील विविध प्रश्नांची उकलही करतो. एकूणच, भिडेवाड्याची कथा आणि व्यथा मांडत असतानाच, दुटप्पी भूमिका घेणाऱ्या समाजातील प्रवृत्तींवरही हा लघुपट कोरडे ओढतो. प्रतिमांचा-प्रतीकांचा सुयोग्य वापर, स्थितीची भीषणता मांडणारे पार्श्वसंगीत, बोलक्या फ्रेम्स, विचार करायला लावणारे प्रगल्भ संवाद, विषयाची खोली या घटकांमुळे ‘Where is भिडेवाडा..?’ प्रेक्षकांना अंतर्मुख करून जातो.

एकीकडे लोकचळवळ उभी करण्यासाठी एकजूट बांधलेल्या तरुणाईची संघर्षमय धडपड, तर दुसरीकडे भिडेवाड्यात भाषण करण्याचे स्वप्न घेऊन भिडेवाड्याचा शोध घेणाऱ्या विद्यार्थिनी व शिक्षक यांची वणवण काळीज पिळवटून टाकते.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी (ता. तीन जानेवारी) गेल्या महिन्यात हा लघुपट YouTube वर प्रदर्शित झाला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच शाळा-विविध संस्था-बचतगट इत्यादी ठिकाणी हजारोंच्या संख्येत लोकांनी तो पाहिला. हा ओघ अजूनही कायम आहे.

लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, सामाजिक भान जपण्याची त्यांच्या ठाई असलेली भावना किती तीव्र आहे, याचे दर्शन या कृतीतून घडते. जिज्ञासूंना हा लघुपट YouTube वर पाहता येईल. तरुणाईच्या विशेष सहभागातून तयार झालेली ही कलाकृती लोकांपर्यंत झपाट्याने पोहोचत आहे.

या लघुपटात हृदयमानव अशोक, स्वाती कडू, संजली गायकवाड यांच्या मुख्य भूमिका आहेत. अन्य महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत आकाश पवार, अमोल घाटविसावे, महेश होनमाने, शीतल भंडारे, अर्चना मोहिते, मयूरी मोरे, रोहित जगताप, ओम कदम, तन्वी जगताप यांनी. कलाकार नवखे असले तरी नवखेपणा कुठेही जाणवणार नाही इतका त्यांचा अभिनय नैसर्गिक वठला आहे.

लोकशाहीर संभाजी भगत, ऐश्वर्या पवार, बाबासाहेब आटखिळे यांनी गायलेले, आकाश पवार यांनी संगीत दिलेले, हृदयमानव अशोक याने लिहिलेले “साऊ तुला गं सलामी’ हे फुले-दाम्पत्याचे समरण करणारे आणि भिडेवाड्याची भीषणता दर्शवणारे गाणे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

लघुपटातील पाहुण्या कलाकारांचीही दखल घ्यायला हवी.
या विविध भूमिका वठवल्या आहेत अशोक सूर्यवंशी, बाबासाहेब सौदागर, सत्यभामा सौंदरमल, बाळासाहेब कदम, शीतल यशोधरा, अनिता कासार, सतीश इंदापूरकर, स्वाती पाटील, रंजना कांबळे, डॉ. नंदकिशोर दामोधरे, ज्ञानेश्वर बोरुडे महाराज, रामहरी वरकले, डॉ स्वप्नील घाटगे यांनी.

लघुपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच कथा-पटकथा- संवाद-गीतलेखन अशी पंचकोनी जबाबदारी हृदयमानव अशोक यानेच सांभाळली आहे. डॉ. नंदकिशोर दामोधरे हे या लघुपटाचे निर्माते असून, अमोल घाटविसावे हे कार्यकारी निर्माते आहेत, तर छायांकन केलं आहे प्रशांत कांबळे यांनी.

“भिडेवाडा नेमका कुठे आहे हे आजही बहुतांश लोकांना माहीत नाही, ही शोकान्तिका आहे. इतकी महत्त्वाची वास्तू शोधावी लागतेय! या पार्श्वभूमीवर, व्हिडि-ओव्हिज्युअलच्या माध्यमातून ही वास्तू समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावी असे वाटले व हा लघुपट तयार केला.
‘आम्हाला भिडेवाडा माहीत नव्हता, लघुपटामुळे माहीत झाला,’ अशी प्रांजळ कबुली बहुतांश लोकांनी काॅमेंट्स, फोन, मेसेजच्या माध्यमातून दिली. हा लढा मोठे स्वरूप घेईल यात शंका नाही. हे कार्य शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही या पिढीची जबाबदारी आहे. कारण, आजची अवस्था ही शेवटची अवस्था आहे. हे आत्ता जपले नाही तर येणारी पिढी ‘मुलींची देशातील पहिली शाळा’ या वस्तुस्थितीपासून अनभिज्ञ राहील.”हृदयमानव अशोक

– हृदयमानव अशोक

संविधानातील शंभर कलमं तोंडपाठ असलेली नाशिकची इकरा

संविधानातील शंभर कलमांची माहिती तोंडपाठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील येवले येथील १० वर्षीय इकरा नाज अजहर शहा हिची ही कथा. इकरा ही इकरा अरबी मदरसा व इंग्लिश मीडियम स्कूल येथे इ. ८ विच्या वर्गात शिकते.

– छाया काविरे.

“तुला संविधानाचाच अभ्यास करावा असे का वाटले ?” असा सवाल केल्यावर इकरा म्हणते, “माझ्या वडिलांसोबत मी एकदा बातम्या बघत असताना न्यूज चॅनेलवर ‘एनआरसी’ व ‘सिएए’ ही शब्द वाचली आणि वडिलांना विचारले, ‘एनआरसी’ व ‘सिएए’ म्हणजे काय ?, तेव्हा ते म्हणाले, या प्रश्नाचे सखोल उत्तर मिळवायचे असेल तर तू संविधानाचा अभ्यास कर. त्यानंतर मी संविधानाचा अभ्यास सुरु केला आणि हळूहळू त्या अभ्यासात माझा रस वाढू लागला.” इकराला गायन, वाचन, भाषण तसेच, पथनाट्य सादर करण्याची आवड आहे.

इकराचे वडील अजहर शाह हे इकरा अरबी मदरसाचे संस्थापक आहेत. त्यांना पूर्वीपासूनच लिखाण व वाचनाची आवड आहे. त्यांच्यामुळेच इकराला अवांतर वाचनाचीदेखील आवड लागली. इकरा म्हणते, “संविधानामुळेच आपल्याला हक्क व अधिकार मिळाले आहेत. त्यामुळेच आज आपण आपले मत व विचार मांडू शकतो. त्याचबरोबर मुलींच्या स्वप्नांना बळ देण्याचे कामही संविधानाने केले आहे.” इ. २ रीच्या वर्गात शिकणारी ८ वर्षीय जीकरा (इकराची लहान बहिण) हिला देखील कविता लिहिण्याची व गाण्याची आवड आहे.

एकदा इकराचे वडील तिला राष्ट्र सेवा दलाच्यावतीने आयोजित ‘संविधान मैदान’ या कार्यक्रमासाठी नाशिक येथील हुतात्मा स्मारक येथे घेऊन गेले. या उपक्रमांतर्गत सेवा दलाचे कार्यकर्ते अर्जुन कोकाटे व शरद शेजवळ हे दर शुक्रवारी महात्मा फुलेंचे अखंड, वामनदादा कर्डक यांच्या कविता गात. त्या कविता, प्रार्थना आणि अखंड यांच्याकडे ती फार आकर्षित झाली आणि आपणही आपल्या देशासाठी, समाजासाठी काहीतरी लिहावे, असे तिला वाटू लागले. तिने कविता लिहिण्यास सुरवात केली. २६ जानेवारी २०२३ रोजी एका कार्यक्रमात सादर केलेल्या इकराच्या पहिल्या कवितेतील काही ओळी पुढीलप्रमाणे.

“सबसे प्यारा हिंदोस्ता हमारा…
देश है निराला… हरीयालीसे भरा देश है हमारा…
भारत में रहते है लोग प्यारे प्यारे…
इस देश में है कई सितारे…
भारत में निकलता प्यारा सूरज है…
इस देश में वीर जवान रहते है…
सबसे प्यारा हिंदोस्ता हमारा है !”

इकरा म्हणते,“संविधानाचा पूर्ण अभ्यास करून संविधानाने बहाल केलेला प्रत्येक घटक मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल. राज्यघटनेला घरा-घरापर्यंत पोहोचवणे, हि आपली सर्वांची जबाबदारी आहे. भारतीय संविधानाबाबत लोकांमध्ये अनेक भ्रम आहेत ते दूर करण्यासाठी मी प्रयत्नशील असेल. तसेच, अनुच्छेद क्रमांक २५ मध्ये धर्म स्वातंत्र्याचे अधिकार व अनुच्छेद क्रमांक ३० मध्ये अल्पसंख्याकांना जे अधिकार देण्यात आले आहेत त्याबद्दल जागरूकता निर्माण करेल. संविधान हा विषय प्रत्येक शाळेत बालवयातच शिकवला जावा, असे मला वाटते.”

तर, इकराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? असा सवाल केल्यावर इकराची आई रेशमा शाह म्हणाल्या, “मला ईकराकडून एकच अपेक्षा आहे कि,तिने राष्ट्राच्या एकता व एकात्मतेसाठी आपले योगदान द्यावे. संविधानाचे पूर्ण अभ्यास करून तळागाळापर्यंत त्याचा प्रसार करावा. तसेच, विशेष करून महिलांना त्यांचे अधिकार व कर्तव्य यांच्याबद्दल मार्गदर्शन करावे. भविष्यात एक संविधान अभ्यासक म्हणून तिचे नाव व्हावे. स्त्री जीवन जगताना तिला तिच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य याचे पूर्ण भान असावे. मुस्लिम समाजामध्ये काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी ज्या अंधश्रद्धा पसरवतात त्याचा विरोध करून संविधानाला अनुसरून असलेले धार्मिक हक्क मुस्लिम महिलांना मिळवून द्यायला हवे.”

तर, “समाजामध्ये संविधान घराघरांत पोहोचविण्याचे काम इकराने करावे. कारण जनजागृतीची आपल्या समाजाला फार गरज आहे. संविधान माणसाला माणसासारखे जगण्याची प्रेरणा देतो. त्याचबरोबर, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या समाजात अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आहे. या संस्कृतीत माझ्या दोघी मुली संविधानाला अनुसरून जनजागृतीचे काम करतील, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. विशेष करून मुस्लीम समाजात संविधानाची मुळे रुजविण्यासाठी त्यांना आम्ही हिंदीमध्येही प्रशिक्षण देत आहोत,” असे अजहर शाह म्हणाले.

इकराने २६ नोव्हेबर संविधान दिनानिमित्त संविधानावरदेखील कविता लिहिली आहे. त्यातील काही ओळी पुढीलप्रमाणे.

“संविधान… संविधान… तुमने दिये सारे अधिकार…
तुम्ही पर चलता है सारा हिंदुस्थान…!”

सौदी अरेबियाची ऐतिहासिक वाटचाल

रायना बर्नावी ठरणार सौदी अरेबियाची ‘पहिली महिला-अंतराळवीर’

सौदी अरेबियात २०१७ पासून अनेक पुरोगामी पावले उचलली गेली. त्यातलेच एक म्हणजे, सौदी अरेबिया आता एका महिलेला अंतराळमोहिमेवर पाठवणार आहे. देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत असून, २०२३ च्या अखेरपर्यंत ही महिला-अंतराळवीर अवकाशात झेपावेल. ‘कठोर पुराणमतवादी’ ही सौदीची प्रतिमा पुसून टाकण्याचा प्रयत्न युवराज महंमद बिन सलमान हे विविध सुधारणांच्या माध्यमांतून करत आहेत. त्यातले हे एक महत्त्वपूर्ण ‘अंतराळपाऊल’ ठरणार आहे. एकेकाळी ज्या देशात महिला पुरुषाशिवाय घराबाहेर पडू शकत नव्हत्या, गाडी चालवण्याचाही अधिकार त्यांना नव्हता, त्याच देशात आता एक महिला अंतराळवीर होणार आहे…या सगळ्या प्रवासाचा हा आढावा.

– छाया काविरे

अरेबिया या द्वीपकल्पात कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन हे देश आहेत. मात्र, या सर्व देशांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा देश आहे तो सौदी अरेबिया. इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्का आणि मदिना यांच्या या देशाला मुस्लिम समाजात फार महत्त्वाचे स्थान आहे. कारण, इस्लामचे प्रवर्तक महंमद पैगंबर यांचा जन्म याच प्रदेशात झाला. त्यामुळे जगभरातील मुस्लिम हजसाठी तेथे भेट देतात. संपूर्ण इस्लामचे उगमस्थान सौदी अरेबिया आहे असे म्हटले जाते. सौदीचे सरकार पूर्णपणे राजेशाही स्वरूपाचे असून तेथे शरिया कायदा (मुस्लिम धर्मग्रंथ कुराण आणि त्यांच्या धर्मगुरूंनी वेळोवेळी काढलेले फतवे यांचा मिळून तयार झालेला कायदा) चालतो. रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी.

राजा, मंत्रिपरिषद आणि हुकूमशाही शासनावर देखरेख करणाऱ्या देशातील पारंपरिक अभिजात वर्ग यांच्यात सल्लामसलत करून सौदी अरेबिया येथे राजकीय निर्णय घेतले जातात. हा देश ‘जी२०’ त सहभागी असलेला एकमेव अरब देश आहे. सौदी अरेबियाला ‘मुस्लिम जगाचा नेता’ असेही मानले जाते. येथील अर्थव्यवस्था जगातील अठराव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

ता. तीन मार्च १९३८ रोजी पेट्रोलियमचा शोध लागला आणि पूर्व प्रांतात इतर अनेक शोध लागले. या सगळ्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सौदी अरेबिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल-उत्पादक आणि जगातील सर्वात मोठा तेल-निर्यातदार देश आहे. मात्र, तेलाच्या जोरावर महत्त्वपूर्ण ठरलेल्या या देशात तेलाचा शोध लागला तरी कसा?

…आणि एके दिवशी विहिरीला तेलाचा पाझर फुटला
अब्दुल अजीज़ बिन सौदच्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रदेशांवर ता. २० मे १९२७ रोजी ब्रिटनने राजवट मान्य केली. पुढे ता. २३ सप्टेंबर १९३२ रोजी शाह अब्दुल अजीज़ बिन सौद यांनी हिजाज आणि नज्द या प्रदेशांचे नाव बदलून ‘अल्-मुमलीकत-अल्-अरेबिया-अल्-सौदिया’ (आताचे सौदी अरेबिया) ठेवले. नव्याने स्थापन केलेले राज्य शाह अब्दुल अजीज़ बिन अब्दुल रहमान अल् सौद यांनी इस्लामिक स्वरूपात पुढे आणायचा प्रयत्न केला. यादरम्यान सौदीमध्ये तेलाचे साठे असल्याचे निष्पन्न झाले. हे तेल काढण्यासाठी १९३३ मध्ये ‘कॅलिफोर्निया पेट्रोलियम कंपनी’शी करार झाला. मात्र, तेलाचे साठे शोधण्यात १९३८ पर्यंत कंपनीला यश आले नाही. अखेर निराश होऊन कंपनीने परत निघायचे ठरवले. आणि इतक्यात, सौदीच्या एका विहिरीला पाझर फुटला आणि त्यातून तेल बाहेर येऊ लागले. या तेलाचा लोंढा इतका मोठा होता की तज्ज्ञमंडळी ते दृश्य पाहून आश्चर्यचकित झाली. ही घटना संपूर्ण अरब द्वीपकल्पाच्या दृष्टीने एखाद्या चमत्कारासारखी होती. आणि, येथूनच नवे ऐतिहासिक पर्व सुरू झाले. तेलाचा शोध लागल्यानंतर सौदी अरेबियाला आर्थिक स्थैर्य मिळाले.

अतिशय उच्च मानवी विकास निर्देशांक असलेला देश म्हणून सौदी अरेबियात विद्यापीठाचे मोफत शिक्षण व सार्वत्रिक आरोग्यसेवा विनामूल्य प्रदान केली जाते. महिलांविषयीचे अनेक प्रतिगामी कायदे अलीकडच्या काळापर्यंत तेथे प्रचलित होते. महिलांवर अनेक बंधने असल्यामुळे जगभरातून सौदी अरेबियावर कायम टीका होत होती. मात्र, २०१७ पासून हे चित्र पालटू लागले. बत्तीसवर्षीय महंमद बिन सलमान हे सौदी अरेबियाच्या युवराजपदी आले आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी महिलांसाठी पुरोगामी पावले उचलायला सुरुवात केली. त्याचबरोबर देश विविध मैफलींसाठी खुला करण्यात आला, तसेच पर्यटन आणि मनोरंजन-उद्योगालाही प्राधान्य देण्यात आले. याअंतर्गत सुमारे दोन हजार ‘सिनेमा-हॉल’ सुरू करण्यात आले आहेत. विविध व्यवसाय आपल्याकडे कसे आकर्षित होतील यासाठी सौदी अरेबिया सध्या प्रयत्नशील आहे.

महिला सशक्तीकरणासाठी नवीन पावले
तेथे महिलांना सक्षम करण्यासाठी आणि सार्वजनिक जीवनात सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सौदी अरेबियाचे मनुष्यबळविकास मंत्री अहमद अल् राजी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘मागील वर्षी राज्याच्या एकूण श्रमक्षेत्रात महिलांचा वाटा ३७ टक्के राहिला आहे, तर २०१८ मध्ये इतिहासात पहिल्यांदाच महिलांना गाडी चालवण्याची परवानगी देण्यात आली होती.’

सौदी अरेबियात महिलांच्या सशक्तीकरणाची मोहीम आखण्यात आली असून पुरुष गार्डशिवाय प्रवासाची आणि पासपोर्टसाठी अर्ज करण्याची परवानगी तेथील महिलांना दिली गेली आहे. राजे सलमान यांच्या उपस्थितीत दोन महिला राजदूत शपथ घेणार आहेत, तर याआधीच तीन महिला राजदूत सरकारदरबारी सेवेत आहेत. सन २०१९ मध्ये युवराज्ञी रिमा बिंत बंदर या सौदी अरेबियाच्या इतिहासातील पहिल्या महिला राजदूत ठरल्या. सौदी अरेबियाच्या अमेरिकेतल्या राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.

३२ महिला चालवणार रेल्वे
सौदी अरेबियात रेल्वेचालकांची तुकडी २०२३ मधील हज यात्रेत सहभागी होणार असून ते हाय स्पीड ट्रेनिंगमध्ये भाग घेणार आहेत. रेल्वे चालवणाऱ्या सर्व चालक महिलाच असून त्यांची संख्या ३२ असेल. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सौदी अरेबियन रेल्वेने हाय स्पीड ट्रेनच्या चालक महिलांची निवड केली होती.

पहिल्यांदाच अंतराळमोहिमेवर जाणार महिला
इतिहासात पहिल्यांदाच सौदी अरेबिया आपली पहिली महिला-अंतराळवीर या वर्षाच्या अखेरीस अंतराळमोहिमेवर पाठवणार आहे. रायना बर्नावी असे तिचे नाव आहे. रायना SpaceX च्या Falcon 9 रॉकेटमधून अंतराळात उड्डाण करेल. तिच्यासोबत सौदी अरेबियातील फायटर जेट पायलट अली अल्-कर्नी हे असतील. अंतराळात उड्डाण करणारे ते सौदी अरेबियाचे दुसरे नागरिक ठरतील.

रायना बर्नावी कोण आहे?
तेहतीस वर्षांची रायना बर्नावी ही बायोमेडिकल संशोधक आहे. रायनाने न्यूझीलंडच्या ओटागो विद्यापीठातून बायोमेडिकल सायन्सेसमध्ये (ReGD) पदवीचे, तर रियाधच्या ‘अल्फैसल विद्यापीठा’तून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. रायनाला कर्करोगाच्या स्टेम सेल संशोधनाचा नऊ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. रायना जेव्हा अंतराळात उड्डाण करेल तेव्हा ती ‘पहिली महिला मुस्लिम अंतराळवीर’ ठरून इतिहास घडवेल. तथापि, ती अंतराळात जाणारी पहिली मुस्लिम महिला ठरणार नाही. कारण, इराणी-अमेरिकी वंशाची अनुशेह अन्सारी ही अंतराळात गेलेली पहिली मुस्लिम महिला होती. सन २००६ मध्ये अनुशेहने अंतराळ-पर्यटक म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावरून उड्डाण केले होते. अंतराळमोहिमेबाबत सौदी अरेबिया आता शेजारच्या संयुक्त अरब अमिरातीच्या पंक्तीत जाऊन बसेल. सन २०१९ मध्ये संयुक्त अरब अमिरातीने आपल्या नागरिकांना अंतराळात पाठवले होते व असे करणारा तो पहिला अरब देश ठरला होता.

‘सौदी अरेबिया स्पेस प्रोग्रॅम’ कसा आहे?
सौदीची ही अंतराळमोहीम ‘सौदी ह्यूमन स्पेसफ्लाइट प्रोग्रॅम’ आणि अमेरिकेतील खासगी स्पेसफ्लाइट कंपनी Axiom यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे. युवराज महंद बिन सलमान अल् सौद यांच्या ‘व्हिजन २०३०’ चा एक भाग म्हणून सौदी स्पेस कमिशन (SSC) अंतर्गत सौदी ह्यूमन स्पेसफ्लाइट प्रोग्रॅमची स्थापना करण्यात आली आहे.

देशातील पहिली अंध रेडिओ-जॉकी डॉ. वृषाली शेख!

सामाजिक क्रांतीची स्वप्नं पाहतेय दृष्टीहीन वृषाली!

आनंद हा जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
गाण्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा
झिजून स्वतःच चंदनापरी दुसऱ्यास मधुगंध द्यावा

प्रा. राजेश निकम यांच्या या कवितेल्या ओळींप्रमाणेच एका अंध तरुणीची कहाणी आहे. नाशिक येथील या तरुणीची लढाई आदर्शवत् तर आहेच; पण प्रेरणादायीही आहे. संगीत, कला, कविता, शिक्षण, समाजसेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या या तरुणीला भविष्यात सामाजिक क्रांतीसाठी झोकून द्यायचे आहे. गेल्या काही वर्षांत विविध उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न ती करत आहे. आयुष्यातील संकटांची मालिका भेदून स्वतःचे कुटुंब सावरत तिने सामाजिक कार्याचा ठसा उमटवलाय. या तरुणीचं नाव आहे डॉ. वृषाली शेख. तिचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती देशातील पहिली अंध रेडिओ-जॉकी आहे. प्रत्यक्ष भेटीत तिचा हा सगळा प्रवास जाणून घेता आला, त्याविषयी…

– छाया काविरे (chhayakavire.awaz@gmail.com)

वृषाली ही नाशिक येथील लेखापरीक्षक मधुकर गुजराथी यांची मुलगी. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत तिची दृष्टी इतर सर्वसामान्यांसारखीच होती. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी ती डोळ्यांनी व्यवस्थित पाहू शकत असे. त्यांचा आनंद उपभोगू शकत असे; पण बाराव्या वर्षानंतर हळूहळू दिसणे कमी होऊ लागले आणि सोळाव्या वर्षापर्यंत तिला पूर्ण अंधत्व आले.

ज्या डोळ्यांनी आजवर अनेक रंग पाहिले त्याच डोळ्यांसमोर दाटलेला अंधकार वृषालीला उद्ध्वस्त करणारा होता…पण आता आपल्याला आयुष्यभर या अंधत्वाच्या साथीनेच जगायचेय, हे वास्तव स्वीकारत वृषालीने मन खंबीर केले. दहावीला असताना दिसणे अधिक अंधूक होत गेले; पण तिने जिद्द सोडली नाही. बालपणापासूनच तिला गायन, वक्तृत्व, काव्यलेखन यांत गती होती. आवड होती. शाळेत असताना काव्यलेखन असो की जाहिरातींचे मसुदालेखन असो, वृषाली ते अगदी सहजतेने करायची. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, सायखेडा येथे माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी वृषालीने नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात प्रवेश घेतला.

बारावीपर्यंत तिने स्वत:च पेपर लिहिले; पण त्यानंतर तिला लेखनिकाची गरज भासली. शिक्षण घेताना आलेल्या अनेक अडचणींना ती धैर्याने सामोरी गेली. जिद्द व परिश्रमांच्या जोरावर हिंदी विषयाची पदवी घेतल्यानंतर तिने केंद्र सरकारची स्कॉलरशिप मिळवली व उत्तर महाराष्ट्रातून एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारी ती पहिली अंध महिला ठरली.

शैक्षणिक परीक्षांमध्ये यश मिळवले तरी समाजाची परीक्षा अजून बाकी होती! आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठीची धडपड सुरू असतानाच वृषालीची ओळख झाली डॉ. रज्जाक शेख यांच्याशी. महाविद्यालयात असताना वृषालीची उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी आलेल्या रज्जाक या युवकाशी झालेल्या ओळखीचे रूपांतर पुढे ‘मैत्री’त, नंतर ‘स्नेहा’त आणि पुढे ‘जीवनसाथीदारा’त झाले.

शिक्षण, संगीत, संगणक अशा विविध क्षेत्रांत वृषालीच्या रूपाने एक अंध व्यक्ती चौफेर कर्तृत्व गाजवत आहे. ‘आकाशवाणी’सारख्या अत्यंत आव्हानात्मक व आगळ्यावेगळ्या क्षेत्रात वृषाली हिने घेतलेली कर्तृत्वभरारी ही दृष्टिहीनांबरोबरच दृष्टी असलेल्यांनाही ‘डोळस’ प्रेरणा देणारी आहे. या सगळ्या प्रवासात साथ देणाऱ्या रज्जाक यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय वृषालीनं घेतला. या आंतरधर्मीय विवाहाला दोघांच्याही घरून कडाडून विरोध झाला; परंतु अनेक डोळस माणसांपेक्षाही अधिक प्रभावीपणे काम करणारे वृषाली आणि रज्जाक हे दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले…खंबीर राहिले.

रज्जाक यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतरही वृषालीने सामाजिक कार्य सुरूच ठेवले. रेल्वे स्टेशनवरील अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी व व्यसनमुक्तीसाठी तिने तळमळीने काम केले, त्याचबरोबर अंधश्रद्धानिर्मूलन, महिलांमध्ये कायदेविषयक जागृती ही कामेही ती नाशिकमध्ये करते.

काहीतरी नवीन करण्याची वृषाली हिला इच्छा होती. या जिद्दीतूनच पती रज्जाक यांच्यासमवेत तिनं ‘मिरॅकल’ या अॅडव्हर्टायझिंग एजन्सीची स्थापना केली. मात्र, हा प्रवासही तितकासा सोपा नव्हता. या क्षेत्रातील प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करताना आपले अंधपण कामाच्या आड येऊ न देण्याचा वृषाली हिला सतत प्रयत्न करावा लागत होता. या घरच्या अॅड एजन्सीमध्ये ती स्क्रिप्ट-रायटिंग, व्हॉइसओव्हर, क्लायंट सर्व्हिसिंग अशी कामे करू लागली.

आकाशवाणीसाठीही विविध स्वरूपाचे कार्यक्रम तयार करायलाही वृषालीने सुरुवात केली. सुरुवातीला तिचे अंधत्व तिच्या कामाच्या आड आले; परंतु तिच्या आवाजातील गोडवा आणि कल्पनाशक्ती यांमुळे अनेकांनी जाहिरातीसाठी तिच्याकडे संपर्क केला. पुढे देशातील पहिली अंध रेडिओ-जॉकी हा मानही वृषालीने मिळवला. वृषाली सांगते : नाशिक आकाशवाणीवर माझ्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व त्यातून हजारो श्रोत्यांशी माझे आपुलकीचे नाते जुळले.

काव्यलेखनाबरोबरच अभिनय व गायन हे छंदही तिने जोपासले आहेत. काव्यलेखनाच्या व वक्तृत्वाच्या विविध स्पर्धांमध्ये तिला बक्षिसे मिळाली आहेत. संगीतक्षेत्रातील प्रवेशिका माध्यम परीक्षाही तिने पूर्ण केली आहे. गिटार, पेटी, बुलबुलतरंग ही वाद्ये ती उत्तमप्रकारे वाजवते. अष्टपैलू असणाऱ्या वृषाली हिला सामाजिक कार्याचीही आवड आहे. स्वतःच्या वाढदिवशी ती विविध संस्थांना भेट देऊन या संस्थांना छोटया भेटवस्तू देते व वाढदिवस साजरा करते. ब्रेल भाषेत स्टेनोग्राफीचा अभ्यासक्रम, तसेच टेलिफोन-ऑपरेटरचा अभ्यासक्रमही तिने पूर्ण केला आहे.

समाजात अंधांबद्दल जागरूकता कमी असल्यामुळे लोक मदत करत नाहीत, अशी खंत वृषाली व्यक्त करते व अंध बांधवांनीही स्वतःला कमी न लेखू नये आणि समाजाकडून खूप अपेक्षाही बाळगू नयेत असा सल्लाही ती देते.

हेलन केलर, पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचारांचा माझ्या आयुष्यावर प्रभाव आहे. याशिवाय आई-वडील, बहीण अंजली, पती रज्जाक, तसेच विलास देशमुख आणि इतर मित्र-मैत्रिणींचाही माझी वाटचाल सुकर होण्यामध्ये मोठा वाटा आहे, अशी कृतज्ञता वृषाली व्यक्त करते.

गेल्या अनेक वर्षांपासून वृषाली आणि रज्जाक ‘मिरॅकल’च्या माध्यमातून काम करत आहेत. एकमेकांच्या धर्मांचा आदर राखत आपल्या कामाला अधिक महत्त्व देऊन त्यांनी या क्षेत्रात आपले वेगळे स्थान आज निर्माण केले आहे. वृषालीची सादरीकरणाची पद्धत आणि तिचा आवाज ऐकून तिला अनेक श्रोते भेटायला येतात. हा अनुभव सांगताना वृषाली म्हणते : ‘‘डोळस माणसांपेक्षाही तुम्ही अधिक गुणवत्तापूर्ण काम करता, या श्रोत्यांच्या उद्गारांनी सगळ्या कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटते.”

‘‘अंधत्वाचे कारण पुढे करून आजवर कोणतेही काम मिळवलेले नाही,” हे सांगताना वृषालीच्या आवाजातून स्वतःच्या कामाविषयीचा सार्थ आत्मविश्वास झळकत असतो. याच आत्मविश्वासाच्या सुरात वृषाली पुढे सांगते : आयुष्यात खचून जाण्याचे तर अनेक प्रसंग आले; पण काहीतरी वेगळं करून दाखवण्याच्या जिद्दीने आजवरचा प्रवास मी मोठ्या धीराने केला. ही तर प्रवासाची सुरुवात आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

देवाने एखादा अवयव कमी दिला तर किंवा काही कारणाने एखाद्या इंद्रियाची शक्ती काही कारणाने कमी झाली तर त्याची जागा भरून काढण्यासाठी तो दुसरी शक्ती देतो, असे म्हणतात; मात्र, ही शक्ती ओळखून तिचा योग्य तो उपयोग केला तरच तुमच्या जीवनाचे सार्थक होते. अंध असतानाही आपल्या अंतर्मनाचा आवाज साक्षी ठेवून आणि अंतःचक्षूंची शक्ती ओळखून वृषालीने हे कसब साधले आहे.

वृषालीला कविता खूप आवडतात, ती काव्यलेखन करते हा उल्लेख वर आला आहेच. शिवाय, वृषाली कविसंमेलनांचेही आयोजन करते. कविता हा तिचा आणि तिच्या मित्रपरिवाराचा मोठाच विरंगुळा आहे. आकाशवाणीवरील ‘गुरुकृपा दहावी अभ्यासमाला’ या २००६ मधील कार्यक्रमामुळे वृषालीच्या व्यावसायिक जीवनाच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. त्यानंतर तिने ‘मिरॅकल मस्ती’, ‘मिरॅकल मसाला’, ‘ज्ञानरंगोली’, ‘मैत्री तुमची आमची’, ‘शतायू होऊ या’, ‘कायद्याचा आधार’, ‘जपू या पर्यावरण’, ‘गुलदस्ता-ए-गजल’… अशा एकापेक्षा एक सरस नि सुश्राव्य कार्यक्रमांद्वारे ‘दिशा’, ‘ज्योती’ या टोपणनावांनी रसिकश्रोत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. आजही असंख्य श्रोते तिच्याशी प्रत्यक्ष, तसेच दूरध्वनीद्वारे जोडले गेले आहेत. तिच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेणाऱ्या श्रोत्यांच्या मेळाव्याचेही दर दिवाळीत ‘स्नेहदीपावली’ या नावाने आयोजन करण्यात येते.

अत्यंत चटपटीत निवेदनशैली हे वृषालीचे वैशिष्ट्य. त्यामुळे ती आणि तिचे कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय ठरले. उपजतच असलेली दांडगी स्मरणशक्ती व संवादकौशल्य यांचा सुयोग्य वापर करून तिने ‘आकाशवाणी’च्या क्षेत्रात देदीप्यमान यश प्राप्त केले आहे. हिंदी-मराठी ध्वनिचित्रफितींना, माहितीपटांना, दृक्श्राव्य/ जाहिरातींना वृषाली आपला मधुर आवाज देत असते.

‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून दखल
वृषाली हिच्या कामगिरीची दखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली आहे. ‘लिम्का’च्या अंकात तिचे नाव नोंदवले गेल्याने तिची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. वाट्याला आलेले अंधत्वाचे दुःख अगदी सहज झुगारत, डोळसाला लाजवेल, ‘डोळस’ दृष्टी देईल, अशा पद्धतीने प्रचंड धेयासक्तीच्या नि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळाव घेतलेले शिक्षण, नंतर मिळवलेली ‘विद्यावाचस्पती’ (डॉक्टरेट) ही पदवी अशी वृषाली यांची नेत्रदीपक शैक्षणिक कामगिरी आहे.

याशिवाय, आपल्या मधुर आवाजाने रोज सकाळी ‘गुड मॉर्निंग नाशिक’ द्वारे नाशिककरांना अन् पंचक्रोशीतील श्रोत्यांना रिझविणाऱ्या वृषाली यांची ‘आवाज’ हीच खरी ओळख आहे. याच आपल्या अनोख्या ओळखीने तिने ‘लिम्का’चा ‘पहिली अंध महिला रेडिओस्टार’ हा मान पटकावला व तिची ओळख संपूर्ण देशाला झाली.

वृषाली हिला आजवरच्या कामाबद्दल विविध स्तरांवरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यातले काही पुरस्कार पुढीलप्रमाणे :

  • ‘आयेशा जागतिक कर्तृत्ववान अंध महिला पुरस्कार’
  • ‘कल्पनेपलीकडचे मि. अँड मिसेस पुरस्कार’
  • ‘राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार’
  • ‘सर्वधर्मसमभाव प्रतिष्ठान’चा पुरस्कार
  • ‘समाजप्रबोधन’ पुरस्कार

वृषालीच्या जीवनार चित्रपट निघणार!
हैदराबादचे चित्रपटदिग्दर्शक पी. सी. आदित्य विक्रम हे नाशिक येथे एका कार्यक्रमानिमित्त मुक्कामी असताना त्यांना वृषालीच्या कामाची माहिती मिळाली. अंध असूनही जाहिरात, गायन, निवेदन, काव्यलेखन या सर्व बाबी ती एकाच वेळी करते याचे त्यांना कौतुक वाटले. अपंग नृत्यांगना सुधा चंद्रन यांच्यावर ‘नाचे मयूरी’ हा चित्रपट पूर्वी निघाला होता. त्याच धर्तीवर वृषालीच्याही जीवनावर संपूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याची घोषणा त्यांनी केली. अंध असूनही एक मुलगी किती मोठी झेप घेऊ शकते, याचा आदर्श भारतीयांसमोर ठेवला जावा, यासाठीच या चित्रपटाची निर्मिती असेल, असे पी. आदित्य यांनी म्हटले आहे.

पंधरा भाषांमध्ये गाणारी चिमुकली रायमा

‘चिल्ड्रन्स बुक ऑफ रेकॉर्ड्स’ व ‘इंडिया बुक रेकॉर्ड’मध्ये नोंद

तिचे वय आहे अवघे पाच वर्षे. या वयात मुले आपली मातृभाषाही नीट बोलू शकत नाहीत. मात्र, तिने मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत, गुजराती, कोंकणी, भोजपुरी, इंग्लिश, इंडोनेशियन, तमिळ, मल्याळम, राजस्थानी अशा १५ भाषांमध्ये लता मंगेशकरांची गाणी गायली आहेत; किंबहुना गात आहे. नेमकी ही चिमुकली आहे तरी कोण? जाणून घेऊ या नाशिकची बालगायिका रायमा शेख ऊर्फ पिहू हिच्याविषयी…

– छाया काविरे

‘आपल्या गोड आवाजात अस्खलितपणे गाणारी भारतातली सर्वात लहान बालगायिका’ हा विक्रम रायमा शेख हिच्या नावावर ‘चिल्ड्रेन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंदवला गेला आहे. त्याचबरोबर, तिच्या या विलक्षण क्षमतेची दखल सुप्रसिद्ध ‘इंडिया बुक रेकॉर्ड’नेसुद्धा घेतली आहे. आई वृषाली आणि वडील रज्जाक यांच्या प्रोत्साहनामुळे रायमाची ही गानकला बहरत गेली. रायमा पन्नासहून अधिक गाणी कुठेही न अडखळता अस्खलितपणे गाते. स्वतः गायिका असलेली तिची आई वृषाली ह्या तिच्या मार्गदर्शक आहेत.

‘जिंदगी प्यार का गीत है…’, ‘ये समा, समा है ये प्यार का…’ (हिंदी), ‘विठ्ठल तो आला आला…’ (मराठी), ‘माजे राणी माजे मोगा…’ (कोंकणी), ‘बेकस पे करम कीजिये… (उर्दू), ‘श्रीरामचंद्र कृपालु भज…’ (संस्कृत), ‘वैष्णव जन तो तेणे कहिये जो…'(गुजराती), ‘ए चंदामामा…’, ‘आरे आव पारे आव…’ (भोजपुरी), ‘यू नीडेड मी…’ (इंग्लिश), ‘दी तेपी पान्ताय…’ (इंडोनेशियन), ‘आरारो आरारो नीवेरो नन्वेरो…’ (तमिळ), ‘कदली कन्कदली चेंकदली…’ (मल्याळम), ‘थाने काई काई बोल सुणावा म्हारा सांवरा गिरधारी…’ (राजस्थानी), अशी लतादीदींनी – अर्थात लता मंगेशकर ह्यांनी – अजरामर केलेली विविध गाणी रायमा अत्यंत आत्मविश्वासाने व ताला-सुरात गाते.

विशेष म्हणजे, स्वतः वृषाली यांच्याही नावावर गाण्याविषयीचे विविध विक्रम आहेत, त्याही ‘रेकॉर्डधारक’ आहेत. ‘जगातील पहिली अंध रेडिओ अँकर’ म्हणून त्यांची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’सह ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, ‘ॲसेट बुक ऑफ रेकॉर्ड्स’ अशा विविध ‘रेकॉर्ड बुक्स’मध्ये वृषाली यांच्या विक्रमांची नोंद झालेली आहे. तर, वडील रज्जाक यांची ‘मिरॅकल ॲड एजन्सी’ या नावाची इलेक्ट्रॉनिक (Audio & Audio-visual) जाहिरात-कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून ते रेडिओसाठी आणि टीव्हीसाठी जाहिराती तयार करतात व प्रसारित करतात. याशिवाय, लघुचित्रपट व चित्रफितीही ते तयार करतात.

रायमाला गाण्याची मनापासून आवड आहे आणि त्यातही लता मंगेशकर यांचीच बहुतांश गाणी ती गाते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तिच्या आईप्रमाणेच तीही लतादीदींची मोठी चाहती आहे. ती गाते तर निव्वळ पाठांतर करून गाते असे नव्हे तर, त्या गाण्याचा आत्मा आपल्या गाण्याच्या शैलीतून, देहबोलीतून रसिकांपुढे मांडण्याचा तिचा पूर्ण प्रयत्न असतो. त्यामुळे संबंधित भाषेचा गंधही नसलेल्या श्रोत्यालासुद्धा ते गीत बऱ्याच अंशी समजू लागते. अर्थात्, ती प्रत्येक भाषेतील गीत हे मातृभाषेतीलच गीत गात असल्याच्या सहजतेने व त्याच भाषेच्या उच्चारशैलीत (टोन) गाते. तिच्या या तोंडपाठ असलेल्या गाण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ‘विविधभाषक गायिका’ होण्याच्या रायमाच्या या प्रक्रियेत वृषाली यांचा मोठा हातभार आहे. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीप्रमाणेच आपल्या मुलीचे गुण, ती पाळण्यात असतानाच, हेरून त्यांना पैलू पाडण्याचे कठीण कार्य वृषाली यांनी पार पाडले आहे.

रायमाचे आई-वडील म्हणतात : “रायमाने एक अत्यंत चांगली व्यक्ती व्हावे. जीवनाचा भरपूर आनंद लुटावा. इतरांना प्रेरणा मिळेल असे जीवन जगावे. तसेच, परमेश्वराने दिलेल्या देणगीचा उपयोग करून तिने एक उत्कृष्ट गायिका व्हावे.”

रायमा आणि आई वृषाली दोघीही आता पुढचा टप्पा गाठायच्या तयारीला लागल्या आहेत. रायमा ‘रवींद्रनाथ विद्यालया’त सीनिअर केजीत शिकत असून अभ्यासातही तिला खूप गती आहे. अशा चिमुकल्या रायमाच्या आवाजाला आणि कौशल्याला ‘आवाज मराठी’चा सलाम!

रायमाला मिळालेले पुरस्कार व तिच्या नावावरचे विक्रम :
 ‘पंधरा भाषांमध्ये गाणारी
जगातली सर्वात लहान (पाचवर्षीय) गायिका,’ म्हणून २०२२ मध्ये ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद.
 ‘चिल्ड्रेन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद.
 आमदार सीमा हिरे यांच्यातर्फे गायक व संगीतकार शंकर महादेवन, मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते २५ डिसेंबर २०२२ रोजी ‘खानदेशरत्न’ हा मानाचा पुरस्कार.
 ‘रवींद्रनाथ टागोर शिक्षण संस्थे’तर्फे सन्मानचिन्ह, तसेच अनेक ठिकाणी सांगीतिक कार्यक्रमांमध्ये गौरव.
 ‘नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशन’तर्फे (NDOA) सन्मानचिन्ह देऊन गौरव.

वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच रायमाने गायला सुरुवात केली. अनेक कार्यक्रमांमध्ये सुरेल गायन करून ती रसिकांची मने जिंकत असते. रायमा सोशल मीडियावरही अत्यंत प्रसिद्ध असून, तिने गायिलेल्या गाण्यांची झलक ‘न्यू मिरॅकल प्राॅडक्शन’ या चॅनेलच्या https://youtu.be/-nK5Dl2FVsE या यूट्यूब लिंकवर पाहायला मिळेल.

रायमाला अभ्यासाबरोबरच अभिनयाचीही आवड असल्याने तिने शॉर्ट फिल्म्समध्येही अभिनय केला आहे. तिने अभिनय केलेल्या शॉर्टफिल्म्स पुढीलप्रमाणे :
१) मैया मुझे माखन दो ना (https://youtu.be/ZEc8wyDLiuM)
२) मला तूच पाहिजे (https://youtu.be/YZrnhtjMiqk)
३) दर्शन दे रे (https://www.youtube.com/watch?v=UqsJszK6dxo)
४) करो ना लव (https://www.youtube.com/watch?v=yMCVYEGZdm8)

‘डोंगरी के सब भाय शबानाताईसे डरते…!’

कहाणी डोंगरीच्या पहिल्या महिला पोलीस सुप्रीटेंडन्टची…

Caption – शबाना शेख. ‘नगर जिल्ह्यातील पहिल्या महिला पोलिस-अधिकारी’ (सीनिअर सुप्रीटेंडन्ट)… हा मान त्यांच्याकडे जातो. आज त्या मुंबईच्या डोंगरी भागात कार्यरत आहेत. ‘आवाज मराठी’च्या सर्व वाचकांसाठी महिलादिनानिमित्त त्यांच्यावरचा हा खास लेख. थेट डोंगरी इथं जाऊन शबाना यांच्याशी बातचीत करून लिहिलेला…

ती नऊ भावंडांमधील सर्वात थोरली बहीण. तिच्या घरात महिलांना रेडिओ लावायची किंवा ऐकायची परवानगी नव्हतीच; शिवाय, वृत्तपत्रं वाचायलासुद्धा विरोध होता. शिक्षण घेणारी तिच्या पिढीतील ती पहिली मुस्लिम महिला. तिला सलवार-कमीज घालायची सवय. पुण्यात फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर रनिंग करताना सलवार-कमीज घालून, ओढणी बांधून ती धावत असे. ही कथा कोणत्याही चित्रपटातील किवा पुस्तकातील नाही; तर, ही कथा आहे मुंबईतील डोंगरी येथील महिलेची…

-छाया काविरे (chhayakavire02@gmail.com)

डोंगरी हा भाग अंडरवर्ल्ड आणि दहशतवाद यांसाठी कायमच बदनाम राहिला आहे. तिथंच ‘पहिली महिला पोलिस अधिकारी’ (सीनिअर सुप्रीटेंडन्ट) म्हणून कार्यरत आहेत शबाना शेख. त्यांचाच हा प्रवास…

शबाना यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील एका मोठ्या संयुक्त कुटुंबात झाला. त्या सात बहिणी आणि दोन भाऊ. त्यांच्या गावात त्या काळी मुलींना शिक्षण देणं जवळजवळ निषिद्ध होतं. तथापि, त्यांच्या आई-वडिलांचा मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा होता. त्यांनी आपल्या सर्व मुला-मुलींना शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. शबाना म्हणतात : “आम्ही सलग सात बहिणी, म्हणून आजी-आजोबा यांना वाटायचं की, घरात वंशाचा दिवा असायला हवा. त्यामुळे सात बहिणींनंतर दोन भाऊ झाले; पण माझ्या आई-वडिलांनी कधीच आमच्यात भेदभाव केला नाही. मी जेव्हा कॉलेजमध्ये जायला सुरुवात केली तेव्हा अकोल्यामध्ये मी कोणत्याच मुस्लिम मुलीला कॉलेजला जाताना पाहिलं नाही. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. त्यानंतर मला पोस्टग्रॅज्युएशन करायचं होतं; पण गावात पोस्टग्रॅज्युएशनची सोय-सुविधा नव्हती. तेव्हाची सामाजिक परिस्थितीही शिक्षणाला अजिबात अनुकूल नव्हती. त्यातच बाहेरगावी जाऊन शिक्षण घेण्याच्या माझ्या इच्छेला वडिलांनी नकार दर्शवला..त्यामुळे एक्स्टर्नलमधूनच मी एमएला प्रवेश घेतला.”

शबाना पुढं म्हणतात : “आम्हा मुलींना बाहेर कुणाशी बोलायलाही परवानगी नव्हती. कॉलेजला जातानाही गप्पपणे कॉलेजला जायचं आणि कॉलेज संपलं की गप्पपणेच परत घरी यायचं. मुलांशी बोलणं वर्ज्य होतं. तेव्हा निवडणुकीसाठी मुलं मतं मागायला घरी यायची तेव्हा आम्ही आमच्या माडीवर जाऊन बसायचो. कारण, मुलांशी बोललेलं घरात चालत नसे. मग मतं मागायला आलेल्या त्या मुलांशी वडीलच बोलायचे आणि त्यांना सांगायचे, ‘ठीकय! आमच्या मुलीला सांगतो, तुम्हाला मत द्या म्हणून.’ त्या वेळी जीएसच्या निवडणुका असायच्या.”

“प्रवास सोपा नव्हताच. त्या वेळी डीएड, एमए आणि बीएड हेच कोर्स केले जात; पण मला त्यांत रस नव्हता. त्या वेळी स्पर्धा परीक्षांची खूप माहिती नव्हती; पण शिक्षणाच्या प्रचंड आवडीमुळे मी माहिती मिळवण्यासाठी धडपडत असे. एमएचं प्रथम वर्ष सुरू असतानाच मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. आपण काहीतरी वेगळं करावं म्हणून मी हे क्षेत्र निवडलं. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे ‘मुली अमुक करू शकतात’ किंवा ‘तमुक करू शकत नाहीत’, अशी चर्चा व्हायची. ही चर्चा समाजाकडून नव्हे तर, फॅमिली मेंबर्सकडूनच व्हायची; पण आमच्या वडिलांचा शिक्षणाबद्दल पॉझिटिव्ह ॲप्रोच होता. मात्र, घरातील वातावरण तसं नाही हे सातत्यानं जाणवायचं. म्हणून कुठं तरी वाटायचं की, याला वाचा फोडायला हवी. ‘आम्हीही काही कमी नाही,’ हे दाखवून द्यावं असं मनात कुठं तरी होतं. त्या वेळी आतासारखी सहज माहिती उपलब्ध होत नसे. जाहिराती आल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी मी रोज वृत्तपत्रे चाळत असे. परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन मिळावं यासाठी माझी धडपड असल्यामुळे कॅप्टन अविनाश कोल्हटकर सर माझ्या संपर्कात आले. ते स्पर्धा परीक्षांचे क्लास चालवत असत. त्या वेळी पंधरा पैशांचं पोस्टकार्ड असायचं. जाहिरातीसंदर्भात किंवा अभ्यासासंदर्भात मी सरांना पोस्टकार्ड पाठवत असे…” शबाना त्यांचा प्रवास उलगडत राहतात.

पुढं सरांनी शबाना यांना खूप सहकार्य केलं. त्यांच्या पत्राला सरांचं उत्तर यायचं : “शबाना, जाहिरात आली की मी तुला नक्की कळवेन.’ आणि अखेर, जाहिरात आली आणि सरांचं शबाना यांने तसं पत्रही आलं.

शबाना आठवणींमध्ये रमताना सांगतात : “मी माझ्या अब्बूंना सांगितलं होतं, ‘मला पुढील शिक्षणासाठी पुण्यात राहायचं आहे. अब्बू खूप रागावले. माझ्या शिक्षणाला त्यांचा कधी विरोध नव्हताच; पण मला घरापासून लांब राहावं लागेल, असुरक्षित वाटेल या काळजीपोटी तो त्यांचा राग होता व त्यामुळे ते परवानगी देत नव्हते. अब्बूंचं मन मी वळवत होते; पण ते काही तयार होत नव्हते. मात्र, मला इतर मुलींसारखं बंदिस्त न राहता असं काही करायचं होतं की, ज्यामुळे माझ्या अब्बूंना माझा अभिमान वाटेल. मी हे पाऊल उचललं तर इतर अनेक मुलींच्या शिक्षणातील अडथळे कमी होतील असंही मला वाटायचं”

दिवसा पुस्तकांसोबत पाहिलेली स्वप्नं शबाना यांना रात्री झोपू देत नसत. म्हणून अखेर त्या त्यांच्या अब्बूंना निर्धारपूर्वक पुन्हा म्हणाल्या : “अब्बू, मुझे कुछ भी कर के पढना है, चाहे कितनी भी कठिनाईयाँ आएँ. आप ने मुझे पढने के लिये शहर नही भेजा तो मैं यहाँ से चली जाऊँगी. अब तुम सोच लो… मैं जाऊंगी मतलब जाऊंगी, अब्बू!,” शबाना यांच्या या शब्दांनी अखेर त्यांच्या वडिलांनी त्यांना पुण्यात पुढील शिक्षणासाठी पाठवायची तयारी केली. पुण्यातील एका लांबच्या नातेवाइकाकडे शबाना यांच्या राहण्याची सोय करण्यात आली. सोबत धान्य पाठवण्यात आलं आणि अखेर, शबाना यांनी पुणं गाठलं.

पुण्यात कॅप्टन अविनाश कोल्हटकर सरांच्या कोचिंग क्लासमध्ये शबाना जाऊ लागल्या. शबाना म्हणतात : “मी कोल्हटकर सरांना कधी बघितलेलं नव्हतं; पण मला नेहमी वाटायचं की, कोल्हटकर सर मुझे सपोर्ट करेंगे. कोल्हटकर सर हे पुण्याचे होते. ते लष्करातून निवृत्त झाले होते व क्लासेस चालवत होते.” शबाना यांनी सरांकडे एक वर्षाचा क्लास केला. त्या ग्रामीण भागातून आलेल्या. शहरातील वातावरण बघून त्यांची घालमेल व्हायची, कावरेबावरेपणा यायचा.

शहरात मुलं-मुली एकमेकांशी बोलायची, सोबत जेवायची. असं करायला शबाना यांना फार संकोच वाटायचा. त्या बुजायच्या. मैदानात धावताना ट्रॅकसूट घालावा लागायचा. मात्र, शबाना यांनी कधी यापूर्वी कधी पँट-शर्ट घातलेला नव्हता. सलवार-कमीज हाच नेहमीचा पोशाख. म्हणून त्या रोज सलवार-कमीजच घालायच्या. त्यामुळे सर त्यांना खूप रागवायचे. त्याचं चांगलं करिअर घडावं असं सरांनाही वाटत असे. शबाना यांनी ठरवलं होतं की, समजा, सर शिस्तीपोटी, कळवळ्यापोटी मारायला आलेच तर त्या दिवशी बघू या काय करायचं ते! सर रोज ट्रॅकसूटबद्दल विचारायचे आणि शबाना सांगायच्या : “सर, मैं ट्रॅकसूट लाने को भूल गयी. मैं कल पहनूँगी.”

शबाना रोज सोबत ट्रॅकसूट न्यायच्या; पण तो घालायची त्यांना लाज वाटत असे, संकोच वाटत असे. ‘टी-शर्ट और पैंट कैसे पहनें? और उस पे दुपट्टा नहीं लेना?,’ असा सवाल त्या वेळी त्यांच्या मनात उपस्थित होत असे. शबाना सांगतात : “ सर म्हणायचे, ‘ट्रॅकपँट घाला, शॉर्ट्स घाला…त्यामुळे तुमचे लेग्ज् ओपन होतील आणि तुम्ही चांगले पळू शकाल’; पण माझी हिंमत होत नसे. ग्राऊंडची परीक्षा जवळ आली. त्या दिवशी मी ट्रॅकसूट घालायचे ठरवले. माझ्या घरातील कुणालाही त्याबद्दल मी सांगितलं नाही. कारण, मला ट्रॅकसूटवर पळायचं होतं. जर कुणाला सांगितलं असत तर ते ग्राऊंडवर आले असते आणि माझा कॉन्फिडन्स कमी झाला असता. प्रत्येक गोष्ट करताना विचार करावा लागायचा. का तर, मला कुणीतरी बघेल आणि काय होईल?”

त्यानंतर शबाना यांची लेखी परीक्षा झाली. मुलाखतीसाठी बराच अवधी होता; पण, गावी जायची शबाना यांची अजिबात इच्छा नव्हती. त्या सांगतात : “कारण, गावात बऱ्याच लोकांना माहीत झालं होतं की, शबाना अधिकारी होण्यासाठी पुण्याला गेली आहे. जर गावी गेले तर लोक त्यासंदर्भात विचारतील म्हणून मुलाखत होईपर्यंत मी पुण्यातच थांबले. नंतर एके दिवशी घरून फोन आला आणि मला गावी जावं लागलं; पण मी काही घराच्या बाहेर निघायची नाही. एके दिवशी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान माझ्यासाठी एक फोन आला. तिकडून कोल्हटकर सर बोलत होते. ते म्हणाले : ‘शबाना, तुझी PSI पदासाठी निवड झाली आहे!’ हे ऐकताच माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मी खुशीनं अगदी बेभान झाले. घरात जल्लोष सुरू झाला. “जिल्ह्यातील पहिली (मुस्लिम) महिला पोलीस-अधिकारी’ म्हणून माझे फोटो वर्तमानपत्रात छापून आले. मी शिक्षण घेत असताना ज्यांनी नाक मुरडलं होतं त्यांनीही माझे ठिकठिकाणी सत्कार केले. माझ्या धाकट्या बहिणींनी फटाके वाजवून जल्लोष केला.”

पोलीस उपअधीक्षकपदासाठी थेट एमपीएससी परीक्षेत शबाना पात्र ठरल्या नाहीत. मात्र, निराश न होता पहिल्याच प्रयत्नात उपनिरीक्षकपदाची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी एमए आणि नंतर एलएलबी पूर्ण केलं. सन १९९२ मध्ये ‘महाराष्ट्र पोलिसा’त शबाना रुजू झाल्या. पुढं त्यांच्या दोन धाकट्या बहिणी १९९५ मध्ये दलात रुजू झाल्या. तर, दुसरी एक बहिण शिक्षिका आहे. गावातील आणि जिल्ह्यातील (मुस्लिम) मुली सरकारी नोकऱ्यांमध्ये मागे राहिल्याचं ‘मिथक’च केवळ या बहिणींच्या यशानं नाहीसं झालं असं नाही, तर या भागातील महिलांच्या शिक्षणाची परिस्थितीही बदलली.

निवड झाल्यानंतर शबाना यांनी एमएचं द्वितीय वर्ष व पुढं एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं. पोलिस दलातील शबाना यांच्या सेवेला आता तीस वर्षं पूर्ण झाली आहेत. या तीस वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक केसेस हाताळल्या. शबाना यांना दोन मुली आहेत. शबाना यांचे पती डॉइश बँकेत उपाध्यक्षपदी आहेत. त्यांच्या एका मुलींचं एमबीए पूर्ण झालं असून ती सध्या इंग्लंडला असते, तर, दुसरी मुलगी बारावीत आहे.

“संपूर्ण करिअरमधील मानसिक खच्चीकरण करणारी केस कोणती?”, असं विचारल्यावर शबाना म्हणतात : माझं कधीही खच्चीकरण झालं नाही. माझ ठरलेलं असायचं… कुठलीही केस असली तरी आपण प्रामाणिकपणे काम करायचंच आहे; मग कुठलंही प्रेशर असेल किंवा काहीही असेल. जो काम करना है उस को करनाही है. आपल्याला जे काम करायचं आहे ते लीगल करायचं आहे. मी इथं लोकांना मार्गदर्शन करतानाही हेच सांगते, ‘तुम्ही कुणाच्याही इल्लीगल ऑर्डर्स फॉलो करू नका. तुमचे वरिष्ठ असतील किंवा अन्य कुणी असतील तरी त्यांनी लीगल परवानगी दिल्यावरच काम करा.’ त्यामुळे, एखाद्या केसमध्ये मला कधी त्रास झालाय, असं मला कधी वाटलं नाही.”

आतापर्यंत हाताळलेल्या सगळ्यात मोठ्या केसबद्दल बोलताना शबाना म्हणतात : “मी नागपाडा पोलीस स्टेशनला PI होते. तिकडे माझ्या तीन केसेस शिक्षेपर्यंत – Conviction – गेल्या. एका केसमध्ये दहा वर्षं…आणि एका केसमध्ये आठ महिने. या दोन केसमध्ये तर आरोपी बाहेर आलेच नाहीत. जे आतमध्ये गेलेत त्यांना जामीनही मिळाला नाही.
कर्तव्य (ड्यूटी) बजावताना कधी कधी सामाजिक, राजकीय प्रेशर असतं; परंतु, त्या वेळी डिप्लोमॅटिकलली आणि टॅक्टफुली केस हँडल कराव्या लागतात. अशा वेळी जे कायदेशीर आहे तेच काम मी करते.”

आज अनेक तरुणांना शबाना मार्गदर्शन करत असतात. डोंगरीमध्ये रुजू झाल्यावर काय अडचणी आल्या असं विचारल्यावर त्या सांगतात : “डोंगरी इथं संमिश्र वस्ती आहे. वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक इथं राहतात. डोंगरी हा भाग लोकांना कम्युनल वाटतो; पण इथल्या लोकांशी संवाद साधला की ते व्यवस्थित सहकार्य करतात. उमरखाडी हा हिंदूंचा परिसर आहे, पालागल्ली, चार्णाल, दर्गा गल्ली इथं मुस्लिम जास्त संख्येनं आहेत. लाल चाळ नावाच्या परिसरात बौद्ध लोक राहतात. मी नेहमी या भागांमध्ये जाते. तिथल्या लोकांशी संवाद साधायला मला आवडतं. चांगलं वाटतं. तिथल्या प्रत्येक व्यक्तीकडे माझा मोबाईल-नंबर आहे. ते कधीही काहीही अडचण असल्यास मला संपर्क करू शकतात. मी या भागात आल्यावर सुरुवातीला ड्रग्जविषयीच्या खूप कारवाया केल्या. आता परिसरातल्या लोकांमध्ये चर्चा असतात, ‘शबानाताई को मालूम हुआ तो छुट्टी नही!’ मला ड्रग्जचं इथून समूळ निर्मूलन करायचं आहे. उस का नामोनिशाँ मिटा डालना है. संपूर्ण मुंबईतील सगळ्यात मोठी केस होती ती म्हणजे फेब्रुवारी २०२१ मधली. ड्रग्जची केस. २५ किलो एमडी ड्रग्ज होतं. किंमत होती साडेबारा कोटी रुपये.

आरोपी कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्यानं गुन्हा केला तर, त्याला शिक्षा ठोठावली जाईल असं पाहिल्याशिवाय मी त्याला सोडत नाही. पोलिसांना कोणतीही जात नसते. पोलीस हीच आमची जात आहे. आतापर्यंत मला कधीही कुणाच्या धमक्या आलेल्या नाहीत.”

“मुस्लिम समाजात मुलींचं शिक्षणात प्रमाण फार कमी आहे. त्यांनीही शिक्षणासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्यांच्या पालकांनीही त्यांना सपोर्ट करायला हवा. कोणावरही अवलंबून न राहता सगळ्या अनावश्यक चौकटी मोडून महिलांनी बाहेर पडायला हवं,” असं शबाना आवर्जून सांगतात.

डोंगरी इथं नोकरीसाठी स्थायिक झालेल्या २८ वर्षीय आमिर शेख याला शबाना यांच्या कामाबद्दल विचारल्यावर तो म्हणतो : “डोंगरी के सभी भाई शबानाताई से डरते है!” मात्र, बाहेर कितीही ‘धाँसू इमेज’ असली तरी शबाना एक आई म्हणून आपल्या कुटुंबीयांबद्दल संवेदनशील आहेत. त्या म्हणतात : “मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या आपण तंदुरुस्त असू तरच कामातही मन रमतं. ये मेरा खुद का लॉजिक है! त्यामुळे मी कुटुंबाकडेही खूप लक्ष देते. घरातही थोडा दरारा आहेच माझा! नाही असं नाही! मी मेंटली आणि फिजिकली थोडीशी स्ट्रेस्ड् असले तरी चालेल; पण माझ्या मुलींसाठी आणि पतीसाठी स्वयंपाक मी स्वतः करते. आमच्याकडे कामाला बाई आहे; परंतु, ती फक्त मदनीस म्हणून आहे. सकस आहारावर माझा भर असतो. आई म्हणून मी कुठंही तडजोड करत नाही.”

कितीतरी चौकटी मोडून आलेल्या शबाना यांची ही संघर्षमय कथा ऐकली की अंगावर शहारे येतात. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मितहास्य आणि डोळ्यांत विजयाची चमक दिसते. त्यांच्या शब्दांमध्ये धीरगंभीरता आहे…बोलण्यात चापल्य हा असा वेगळाच संगम त्यांच्या व्यक्तित्वात दिसतो. त्यांच्याशी बोलताना त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आपल्याही अंगात लहरत असल्याचं भासतं. समाजानं घालून दिलेले अनेक अनावश्यक आणि जाचक पायंडे मोडून त्या आज ‘नगर जिल्ह्यातील पहिल्या महिला पोलिस-अधिकारी – सीनिअर सुप्रीटेंडन्ट पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत…

जैतुनबी : मानवताधर्माच्या कीर्तनकार

समाजातील एक घटक जात-धर्म-वर्ण-लिंग या भिंतींमध्ये अडकलेला असतो, तर एक घटक ह्या बाबींशी संबंधित सर्व प्रश्नांच्या विरोधात बंड करत आव्हानांना सामोरा जात असतो. जन्माने मुस्लिम; पण स्वतःच्या धर्माइतकाच हिंदू धर्माचाही आदर करणाऱ्या व सर्वधर्मसमभाव, समानता ही मूल्ये समाजात रुजावीत, अंधश्रद्धानिर्मूलन व्हावे, स्त्रीशिक्षण वाढीस लागावे यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या एका मुस्लिम महिला-कीर्तनकाराची ही कथा आहे. वारकरी-संप्रदायातील या कीर्तनकार महिला म्हणजे जैतुनबी सय्यद ऊर्फ जयदासमहाराज.

– छाया काविरे (chhayakavire02@gmail.com)

जैतुनबी सय्यद यांचा जन्म माळेगाव येथे (ता. बारामती, जि. पुणे) सन १९३० मध्ये झाला. त्यांचे वडील मकबूलभाई सय्यद हे व्यवसायाने गवंडी होते. एकदा मकबूलभाई यांची भेट वारकरी-संप्रदायातील गोविंदभाऊ यांच्याशी झाली. गोविंदभाऊ हे भिवडी येथे (ता. पुरंदर, जि. पुणे) गवंडीकाम करत असत. विचार आणि व्यवसाय मिळते-जुळते असल्याने दोघेही चांगले मित्र झाले आणि गवंडीकाम एकत्रच करू लागले. दोघा मित्रांची कुटुंबे एकमेकांना सुख-दु:खांत साथ देत असत. कीर्तनकार गोविंदभाऊ यांना सर्व लोक ‘गुण्याबुवा’ म्हणत असत. ते काम करताना सदैव ‘जय जय रामकृष्णहरी’ हा जयघोष करत असत. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांनाही त्यांनी ‘रामकृष्णहरी’चा छंद लावला होता. अशा वातावरणात लहानग्या जैतुनबीवर वारकरी-संस्कार झाले आणि आवड म्हणून त्या गुण्याबुवांसमवेत वारकरी-पंथातील भजन-कीर्तनात रंगू लागल्या.

इयत्ता पाचवीत असलेल्या दहा वर्षांच्या जैतुनबी भजन-कीर्तनात भाग घेऊ लागल्या आणि कालांतराने वारकरी-संप्रदायात समाविष्ट झाल्या. दरम्यान, त्यांची भेट संत हनुमानदास यांच्याशी झाली. त्यांना गुरू मानून जैतुनबी यांनी वारकरी-विचारांची पताका खांद्यावर घेतली. बारामतीच्या घाणेकरबुवांकडून त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. जैतुनबी यांच्या हरिभक्तीला मुल्ला-मौलवींकडून व घरच्यांकडून तीव्र विरोध होऊ लागला. त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची धमकीही दिली गेली; पण त्यांनी वारकरी-पंथ सोडला नाही. ‘भक्तांना जात नसते, तर अंत:करणातील भक्ती-प्रेमाचा सच्चेपणा हीच त्यांची खरी कसोटी असते,’ असा सल्ला तिला हनुमानदास यांनी जैतुनबी यांना दिला. तो गुरुपदेश मानून त्यांनी काम सुरू ठेवले. त्यांच्या भक्तीचे सच्चेपण ओळखून हनुमानदास यांनी त्यांना ‘जयदासमहाराज’ असे नाव दिले.

आजही समाजात स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचा महिलांचा (घटनादत्त नसला तरी) अधिकार नावापुरताच असताना त्या काळी जैतुनबी यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर त्या ठाम राहिल्या. लग्न न केल्याने त्यांना समाजाकडून रोषही पत्करावा लागला; पण कशालाच न जुमानता त्यांची भक्तिसाधना सुरूच राहिली. त्यांनी आयुष्यभर वारकरी-संप्रदायाचा प्रसार केला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून आळंदी ते पंढरपूर या पालखीसोहळ्यात सहभागी होण्यास त्यांनी सुरुवात केली. भागवत-संप्रदायाची शिकवण आचरणात आणणाऱ्या जैतुनबी सायकलवरून गावोगावी जात असत व कीर्तने करत असत. त्यांची रसाळ वाणी आणि सुस्पष्ट विचारांमुळे त्यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असे. संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीसोहळ्यात स्वतःची दिंडी घेऊन त्या सहभागी होत असत. त्यांच्याच नावाने ही दिंडी ओळखली जात असून या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी होतात. पालखीमार्गावर कीर्तन, भजन करत आपले विचार सर्वसामान्य भक्तांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या अविरतपणे करत राहिल्या. महाराष्ट्रातील वारकऱ्यांना जैतुनबी यांच्याबद्दल खूप आदर होता.

सन १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात जैतुनबी यांनी भाग घेतला होता. प्रभातफेऱ्यांमध्ये देशभक्तिपर गीते म्हणण्यात बालकुमार स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्या पुढे असत. स्वातंत्र्यलढ्यातील एका प्रसंगी माधवराव बागल यांच्या सभेत जैतुनबी यांनी पोवाडा गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर बागल यांनी लहानग्या जैतुनबीला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापुढे उभे केले. जैतुनबी यांची धिटाई पाहून नाना पाटील यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यामुळे अधिकच उत्साही होऊन जैतुनबी गावोगावी फिरू लागल्या व राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग नागरिकांमध्ये चेतवू लागल्या. या लढ्यादरम्यान त्यांनी रचलेले अनेक पोवाडे लोकप्रिय झाले.

तरुण जैतुनबी लढ्यासाठी स्फूर्तिगीते गात गावोगाव फिरू लागल्या. पुण्याजवळच्या उरुळीकांचन येथील ‘निसर्गोपचारकेंद्रा’त महात्मा गांधी यांचा मुक्काम असताना त्यांच्यासमोर जैतुनबी यांनी पोवाडा सादर केला होता. अध्यात्माची आणि वारकरी-संप्रदायाची ताकद त्यांच्या लक्षात आली होती. गुरू हनुमानदास यांच्याबरोबर वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरू केलेला वारीचा नियम जैतुनबी यांनी हयात असेपर्यंत कसोशीने सांभाळला. सामाजिक प्रश्नांवरच्या अभ्यासपूर्ण व रसाळ-श्रवणीय कीर्तनांमुळे जैतुनबी यांच्या वयाच्या चोविशीतच हनुमानदास यांनी दिंडीचा सर्व कारभार त्यांच्याकडे सोपवला. विशेष म्हणजे, पालखीत महात्मा गांधी यांचा फोटो ठेवून जैतुनबी वारीत सहभागी होत असत.

आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही वारी त्या करत असत. पंढरपूरच्या वारीसाठी त्यांची दिंडी सासवडपासून प्रस्थान ठेवत असे. संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीमागे एक मैल अंतर राखून ही दिंडी चालत असे. जैतुनबी यांच्या कीर्तनाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्मकांडात न अडकणे. कर्मकांडाचा बडिवार त्या कटाक्षाने टाळत असत. त्यांच्या खणखणीत आवाजामुळे व रसाळ कथनशैलीमुळे त्यांची कीर्तने भक्तांना खिळवून ठेवत असत. त्यांच्या कीर्तनांत सामाजिक आशय असायचा. सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांवर त्या भाष्य करत असत. त्यांच्या कीर्तनांमध्ये स्त्रीशिक्षणावर भर असे. स्त्रियांविषयीची कोंडी फोडण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असायचा. अंधश्रद्धानिर्मूलन, स्त्रीशिक्षण यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी आयुष्यभर जनजागृती केली.


विठ्ठलभक्ती आणि राष्ट्राची आजची गरज यांचा सुरेख मिलाफ जैतुनबी यांच्या कीर्तनांत असायचा. खेड्यातील स्त्रियांच्या अडाणीपणाविषयीचा, त्या स्त्रिया साक्षर नसल्याविषयीचा कळवळा त्यांच्या प्रबोधनातून दिसायचा. संत मीराबाईपासून ते संत कान्होपात्रा यांच्यापर्यंत सर्वांच्या भक्तीचा महिमा सांगून जैतुनबी श्रोत्यांना दंग करत असत.

कोणाच्याही विरोधाला न जुमानता जैतुनबी मानवतेच्या ऐक्याचे कार्य करीत राहिल्या. देशावर, संस्कृतीवर, सर्व देव-देवतांवर प्रेम करत मानवताधर्माचा आचार-विचार त्यांनी लाखोंच्या श्रोतृसमुदायासमोर जाहीरपणे मांडला. ‘‘प्रत्येक धर्म मानवतेचे आणि शांततेचे शिक्षण देत असतो…धर्माचा लढा अधर्माशी असतो…समाजात मानवता हाच एक धर्म आहे…हिंदू-मुस्लिम असा भेद करू नका…अहंकार, अंधश्रद्धा, स्वार्थ यांना तिलांजली द्या…चांगली संगत केलीत तर जीवन सुखी होईल,’’ असा साधा-सोपा संदेश त्या देत असत. ‘आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नही|’ लेकीन खुदा के नूर से आदम जुदा नही’ याची जाणीवही त्या करून देत असत.

जैतुनबी यांच्या कीर्तनांत मानवताधर्माचा प्रसार असे. सत्य, प्रामाणिकपणा, परस्परसौहार्द, सामाजिक एकता, सामाजिक सलोखा या विषयांवर त्या संतवचनांच्या आधारे खूप सोप्या शब्दांत उपदेश करत असत. कीर्तने करून जे मानधन त्यांना मिळत असे त्यातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामांना मदत केली. आळंदी-पंढरपुरात मठ बांधले. कल्याणजवळच्या ‘हाजी मलंग’च्या पायऱ्या बांधण्यासाठी १९६० मध्ये त्यांनी दीड लाख रुपयांची मदत केली होती, तर पंढरपुरातील त्यांच्या मठात अन्नदानाचं कार्य आजही सुरू आहे. संत ज्ञानेश्वरमहाराज – संत तुकाराममहाराज यांच्या पालख्यांबरोबर त्यांनी एकसष्ट वर्षे वारी केली.

ता. सात जुलै २०१० रोजी वारीदरम्यान – पालख्या पुण्यात असताना – त्यांना श्वासोच्छ््वास घेताना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.