रात्री उशिरापर्यंत ‘नदी का पहाड’ खेळून मी सकाळी नऊ वाजता आई ओरडल्यावर उठले आणि शाळेत जाण्यासाठी आवरायला लागले. आंघोळीला गेले आणि माझ्या कपड्यांवर रक्त लागलंय हे बघून प्रचंड घाबरले. आरडा-ओरडा करू लागले. आजी पटकन उठून माझ्याजवळ आली. आईने काय झालंय म्हणून विचारलं पण, आजीने तिला जवळ आल्यावर हळूच सांगितलं, “तिला पाळी आलीय!”
सुरुवातीला, ‘ती बाहेरून झालीय’, ‘तिचं डोकं मळलय’ असे शब्द ऐकले की माझ्या प्रश्नांचा भडिमार आईवर सुरू व्हायचा. आई बाहेरून झालीय म्हणजे काय? मी तर कालच केस धुतले, पण तरी माझं डोकं मळलय असं आजी का बोलली? आता माझं रोज डोकं मळणार का? आता पाळी रोज येणार का ? माझं रोज रक्त वाहणार का ? अशा अनेक प्रश्नांचा गुंता माझ्या मनात होत असे.
आजी, आई आणि काकूने माझे खेळणे, मोठ्याने हसणे, धावणे-पळणे बंद केले. जुन्या बाजारातून आणलेला माझा आवडता फ्रॉक घालायच बंद करून माझ्या अंगावर ओढणीचा पंजाबी ड्रेस चढवून, “आता मी मोठी झालीय” असे त्यांनी मनोमन ठरवून माझ्यावर थोपवले. पाळीदरम्यान बसण्यासाठी घरातला कोपरा ठरला. पाचव्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायची मगच सर्व वस्तूंना स्पर्श करायचा, असे बजावण्यात आले.
आधी दर गुरुवारी काकूचा उपवास असायचा. तिला वाचता येत नसल्याने ती मला देवीची पोथी (कथा) वाचायला बसवायची. पण, पाळी आल्यावर पोथीला हाथ लावायचे नाही, असे आजीने बजावले होते. मग मला प्रश्न पडायचा, ”पाळी आल्यावर पोथीला हाथ लावायचा नाही मग, शाळेतल्या विज्ञान, गणिताच्या पुस्तकांना हाथ लावलेला चालतो का ? आणि नसेल चालत तर पाळीचे पाच दिवस माझा अभ्यास कसा होणार ? दर महिन्याला पाच दिवस शाळा बुडाली तर मी मोठी व्यक्ती कशी बनणार ?”
उन्हाळ्याचे दिवस म्हणजे कुरडया, पापडांचा सिझन. काकू म्हणायची की, पापडांसाठी भिजत घातलेल्या धान्यावर पाळी आलेल्या बाईची सावली पडली. तर, पापड नीट बनत नाहीत, त्यांचा रंग बदलतो. कारण ते सणाला देवापुढे ठेवले जाते. हे कितपत खरे असते हे पडताळून बघण्याची मला संधी मिळाली. शाळेतून येतांना गल्लीत एक बाई पापड कुरडया सुकत असलेले खाट पलीकडून पकड म्हटली आणि मी खाटीला हाथ लावणार तितक्यात तिने विचारले, “तू बाहेरून तर नाहीय ना ?” मी मुद्दाम “नाहीतर !” असे बोलली आणि पापडांना स्पर्श केला. दुसऱ्या दिवशी तीच बाई गल्लीभर बायकांना दाखवत होती की बघा, “माझे पापड कसले भारी बनलेत.”
सुरुवातीला पाळी दरम्यान घरात अगरबत्ती लावली की, देवाला चालत नाही म्हणून आई ओरडायची पण, माझा प्रश्न तयारच असायचा, “देवाला जन्म देणारी एक बाईच असेल ना? देवाला पण आई असेलच ना?”, असे प्रश्न विचारल्यावर बाईच्या जातीने एवढं बोलायचं नसतं म्हणून मी घरातल्या बायकांकडूनच शिव्या ऐकायची. पण, माझे प्रश्न कधी थांबायचे नाही.
इयत्ता सातवीच्या वर्गात असतांना शाळेत नरेंद्र दाभोळकरांचे “आपल्याला प्रश्न का पडत नाही ?” या विषयावर व्याख्यान झाले होते. पण, नुसतेच प्रश्न पडून पण काय होणार ना. मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसायची. कारण, कदाचित माझ्या सभोवतालच्या महिलांपर्यंत 13व्या शतकात मासिक पाळी वर निर्भीडपणे अभंग रचणाऱ्या, 700 वर्षांपूर्वी सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना घट्ट असताना कोणी देहाच्या विटाळा बद्दल ”ब्र” काढायचा विचार ही करत नव्हता. त्या काळी बंड करून आपल्या अभंगांच्या माध्यमातून “देहात विटाळ असतो मग, देह कोणी निर्माण केला ?” असे प्रश्न विचारणाऱ्या संत सोयराबाई पोहचल्याच नाही. घरात व्यक्त व्हायला मिळत नाही म्हणून मी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे विषय मुद्दाम स्त्री स्वातंत्र्याशी निगडित निवडत असे आणि जिंकतही असे.
मी अकरावीत असतांना कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक संमेलनात आई बाबांना माझ्यासोबत पारितोषिक स्वीकारायला बोलावले. पारितोषिक वितरणानंतर ते शिक्षकांना भेटले, त्यांना सर म्हणाले, वर्गातल्या इतर मुलींपेक्षा एखाद्या विषयाकडे बघण्याचा हिचा दृष्टिकोन फार वेगळा असतो. संवादातून, प्रश्नांमधून ती समोरच्याला विचार करायला भाग पाडते. मंचावर बक्षीस घेतांना सूत्रसंचालक माझ्या वर्षभरातील शैक्षणिक गुणवत्तेबद्दल बोलत होते. इयत्ता अकरावी ते TYBA पर्यंतच्या पाच वार्षिक बक्षीस वितरण समारंभातून मला फक्त स्मृतिचिन्हे मिळाली नाही तर, मला आई बाबांचा सपोर्ट मिळत गेला. त्यांचे विश्वास संपादन करता आले, त्यांचा अभिमान बनता आले, त्यांना सन्मानाने वागवता आले. नंतर सरावादरम्यान बाबा माझी प्रत्येक भाषण आवर्जून ऐकायचा आणि मी मुद्दाम स्री संबंधीत निवडलेल्या विषयांवर आमची चर्चा व्हायची. मग, बाबा, भाऊ, मित्र-मैत्रिणी आम्ही खुल्यापणे बोलू लागलो. पाळी का येते ? त्या दरम्यान बाईला काय त्रास होतो ? अशा अनेक विषयांवर चर्चा होऊ लागली.
एकदा पूर्ण कुटुंब शिर्डीला गेलेलो असतांना मला प्रवासादरम्यान पाळी आली. तेव्हा काकू आणि आजी मला वाळीत टाकल्यागत लांब लांब राहायला लागल्या. तू मंदिरात यायचे नाही, म्हणून बजावले. पण, तेव्हा बाबा माझा हात धरून मला मंदिरात घेऊन गेला आणि घरातील महिला वर्गाला समजावून सांगू लागला की, हे फार नैसर्गिक आहे तुम्हीच मुलांना म्हणतात ना, आपल्याला देवाने बनवलय मग देवाला पाळी आलेली बाई चाललीच नसती तर, तसा घटक त्यांनी तिच्यात निर्माण केलाच नसता.
ग्रामीण भागात आजही अशा विषयांवर मोकळ्यापणे बोलण्याचा प्रयत्न केला तर बायका “निर्लज्ज कुठली” असा टॅग लावतात. बाई ही समाजाची जननी असते. पुरुषाइतकाच तिलाही जगण्याचा अधिकार असतो. तिच्या योनीतुन पाच दिवस रक्त येणे म्हणजे ती अपवित्र नाही. ती ‘ती’ आहे म्हणून कोणाची गुलाम किंवा बांधील नाही. ती लोपामुद्रा, ती गार्गी, ती मैत्रेयी तर, मध्ययुगातील स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ ‘ती’ आहे, महाराणी ताराबाई, रझिया सुलतान, चांदबीबी ‘ती’ आहे, आधुनिक भारताच्या इतिहासातील उत्तम प्रशासक अहिल्याबाई होळकर, ब्रिटिशांच्या हाती न लागलेली रणरागिणी राणी लक्ष्मीबाई, स्त्री शिक्षणासाठी लढणारी सावीञीबाई फुले सुद्धा ‘ती’ आहे. कित्येक हाडे तुटल्यानंतर होणारा त्रास सहन करत बाळाला जन्म देणारी ‘ती’ आहे, अल्पवयीन असतांना स्वतःवर बलात्कार झाला म्हणून बलात्कार पीडित महिलांसाठी हैदराबादला प्रज्वला नावाची संस्था उभारणारी ‘ती’ आहे, निराधाराची माय होणारी ‘ती’ आहे, अमेरिकेच्या राजकारणात उपाध्यक्ष पदावर झळकणारी ‘ती’ आहे, देशातील पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती ‘ती’ आहे, नाशिकच्या इगतपुरीतील त्र्यंबक देवगाव येथील आश्रम शाळेत शिक्षकांनी पाळी दरम्यान झाड लावू नये अन्यथा ते जळतं असे बजावल्यावर या अंधश्रद्धेविरुद्ध लढत शिक्षकांची तक्रार दाखल करणारी सुद्धा ‘ती’ आहे. अहो इतकंच काय, आपल्या शेतकरी पतीने दुष्काळात आत्महत्या केली म्हणून कर्जाचा भला मोठा डोंगर आपल्या छातीवर ठेवत संसार लोटत नेणारी सुद्धा ‘ती’ आहे….होय ती एक ‘स्त्री’ आहे!
पण तिच्या मासिक पाळीच्या मानसिक गुलामगिरीतुन पूर्णपणे ती कधी मुक्त होणार ? बऱ्याच लोकांना आजही पाळी आलेल्या बाईचा स्पर्श ही चालत नाही. अरे, तिच्याच रक्त मासातून जन्म घेऊन, तिच्याच उदरात नऊ महिने राहून, तिचीच पाळी नकोशी ? एक बाई मला म्हणाली होती की, ग्रामीण भागात एका समाजात आजही स्त्रियांना प्रसूतीनंतर किंवा पाळी दरम्यान घराच्या बाहेर ठेवले जाते. त्यापेक्षा आपले तर बरेच आहे ना ! म्हणजे ते लोक या गोष्टी स्वीकारत नाही म्हणून आपण जेवढे स्वीकारतोय तेवढे खूप झाले, असे समजून बदलासाठी पुढचा पाऊल टाकणेच आपण बंद करतो.
आज ही ग्रामीण आणि शहरी भागातसुद्धा menstrual cup ने Virginity लॉस्ट व्हायचा धोका असतो, अशी समजूत असल्यामुळे मुली ते वापरतच नाही. काही वर्षांपूर्वी लोकमत वृत्तपत्रात एक बातमी होती. सातपुड्याच्या सत्रासेन भागातील एका आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याची ती घटना होती. आदिवासी पाड्यावरच्या त्या बाईने पाळीदरम्यान जुना ब्लाऊस वापरला. त्या ब्लाऊस ला हुक होते, त्या हुकांवर गंज चढला होता आणि तसाच तो कापड तिने वापरल्यामुळे तिला धनुर्वाद झाला आणि तिचा मृत्यू झाला. हे का झालं? कारण ती तिच्या मासिक पाळीच्या आरोग्याबद्दल अनभिज्ञ होती.
आसामच्या काही भागात आजही मुलींना पाळी यायला सुरूवात झाली की, त्यांना शाळेत पाठवणे बंद केले जाते. शिक्षण बंद झाले म्हणजे तिचा मानसिक, सामाजिक विकास खुंटतो, काही वर्षानंतर तुम्ही त्या मुलीला एखाद्या निर्णयाबद्दल विचारले की, तुझी काय इच्छा आहे, तुला काय वाटतय तर ती प्रश्नात पडते, “मला कसली इच्छा असणार ?” तिला वैचारिक स्वातंत्र्य म्हणजे काय ? हे देखील कळणार नाही म्ह्णून तिने स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही स्व-स्वातंत्र्यासाठी बंड करणे गरजेचे वाटते. तिच्या प्रश्नांना, “बाईच्या जातीने एवढं बोलायचं नसत” असे सांगून तुम्ही तिचा आवाज अजून किती दिवस बंद करणार? पुरुषसत्ताक मानसिकतेने बनवलेल्या so called चौकटीत तुम्ही तिला अडकवू शकत नाही. परंपरेच्या नावाखाली तिच्यावर दडपण न टाकता तिला तिच्या मनाप्रमाणे, तिच्या इच्छेने जगू द्या. तिच्यावर बंधने लादून तिचे स्वातंत्र्य हिरावण्यापेक्षा तिचे निर्णय तिला घेऊ द्या.
प्रश्न मासिक पाळीच्या नावाखाली दडपल्या जाणाऱ्या तिच्या भावना, तीचे स्वातंत्र्य, तीच्या स्वच्छंदी जगण्याचा आहे, काळजी च्या नावाखाली पाच दिवस वाळीत टाकल्याची वागणूक देण्याचा आहे. बदलत्या काळानुसार बद्दललेल्या उपाययोजनांनी आता त्या दिवसात तिने कोपऱ्यात बसून राहावे अशी परिस्थिती आता नाही.
पाळी दरम्यान क्रिकेट खेळायला मी येत नाही, माझं पोट दुखतंय, असे भावाला सांगितले तर तो म्हणतो, “पूर्वीच्या काळी राणींना पाळी आली म्हणून त्या काय युद्ध थांबवायच्या का? कुठे खांद्यावर मुलाला बांधून लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि कुठे पाळी आली म्हणून तेच चार दिवस धरून बसणारी तू! चल उठ तुला आज पहिली बॅटिंग देतो.” त्याच्या ह्या शब्दांमुळे माझ्यातला आत्मविश्वास वाढतो आणि मीच माझ्या अवतीभवती लादलेल्या चौकटी तोडून बाहेर पडू लागते.
कारण जेव्हा तिचे ‘ती’ असणे ती गृहीत धरू देत नाही तेव्हा या चौकटी बिथरू लागतात. तेव्हा हा समाज आतल्याआत मोठ्याने आरोळ्या मारत असतो पण, तिच्यापुढे किंचाळी मारायला घाबरतो. होय! घाबरतो. कारण, ती जेव्हा समाजाला घाबरत नाही तेव्हा हा समाज तिला घाबरतो. दाखवत नसला तरीही! तिला प्रत्येक पावलावर काहीतरी असतेच जे काट्यासारखे रुतत असते. छोटी दुखापत होते, काढता आले तर थोडे दुखते आणि नाहीच काढता आले तर, कुरूप होऊन तिथेच घर करते आणि मधून मधून धगधगत असते! ते कुरूप म्हणजे तिची आपलीच लोक असतात. कारण ती आपली असतात ना!
शेवटी ते धगधगण सहन करत ती स्वतःला सिद्ध करत असतेच. कधी ढासळते, चुकते, पडते, उभी राहते पण, चालत राहते. ती कितीही काहीही झाले तरी, थोडा स्वल्पविराम घेईल पण, तिच्या प्रश्नांना आणि जगण्याला पूर्णविराम देत नाही. कोणत्याही स्थितीवर रोखठोक प्रश्न उठवतांना तिच्यावरही प्रश्न उठतात. कारण, रचनात्मक व्यवस्थेवर प्रश्न उभे केल्यावर चारित्र्य नावाचा फालतू विनोद प्रश्न म्हणून नेहमीप्रमाणे तिच्यावर चिकटवला जातो ! पण, तरीही ती निरंतर चालतं राहते. अनेक ध्येय सोबत घेऊन. पण, एक ध्येय जे अटळ असते, तिच्या ‘स्वातंत्र्याच’! तीच ‘माणूस’ म्हणून जगण्याचं! त्यासाठी ती प्रत्येक क्षणी लढत असते… आणि ही लढाई अशीच चालू असते आयुष्यभर! समाजातला एक गट असा असतो की ज्याला तिचे स्वातंत्र्य नकोसे असते. ज्यांना तिला नेहमीच अंधश्रद्धेत, कर्मकांडात गुंतवून ठेवायचे असते. तिला वेळोवेळी त्या समाजाकडून संस्कृतीच्या परंपरेच्या नावाखाली समज दिली जाते की, “बाईच्या जातीने जास्त बोलायचे नसते!”
सामाजिक काम करणारी मैत्रीण चंचल ग्रामीण भागात सॅनिटरी पॅड वाटप करतानाचे तिचे अनुभव सांगते की, आजही स्त्रिया प्रश्न करतात, हे काय? बिस्कीटचा पुडा आहे का? म्हणजे आजही मासिक पाळीबद्दल जनजागृती नाही म्हणजेच तिच्या आरोग्याबद्दल जागृती नाही. तिला पाच दिवस वेगळं राहावं लागेल म्ह्णून खोट्या रूढी परंपरांच्या नादात डॉक्टरांचा सल्ला न घेता मासिक पाळी पुढे मागे होण्यासाठी गोळ्या घेतात. याने आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतात. तिचा स्पर्श चालत नाही म्हणून पाच दिवस तिला वाळीत, मानसिक बंधनात ठेवण्यापेक्षा त्या दिवसात तिला आरामाची गरज असते म्ह्णून “हे तर प्रत्येक महिन्याच!” असे न म्हणता तिला जपले, जसे बाकीचे दिवस ती सर्वांना जपत असते, तर….?
आणि स्त्रियांनी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, देवी ही सुद्धा एक स्त्रीच आहे. तिला मंदिरातून 1 ते 5 दिवस कधी बाजूला होताना पाहिले आहे का? प्रश्न साधा आहे. इथली मानसिकता सडकी आहे. ‘मासिक पाळी मानसिक पाळी झाली आहे’. तिच्या शारीरिक आरामासाठी तिने जास्त काम करू नये. याचे रूपांतर विटाळात झाले आहे. म्हणून इथल्या चुकीच्या गोष्टींना न जुमानता ह्या वेळेस स्त्रियांनी स्वतःचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपत स्व-स्वातंत्र्यासाठी लढलेच पाहिजे. या समाजव्यवस्थेला प्रश्न विचारलाच पाहिजे!
तिचा हा स्वातंत्र्य लढा तेव्हाच संपेल जेव्हा तळागाळातील प्रत्येक स्त्री तिच्या अधिकारांबद्दल, तिच्या मानसिक स्वातंत्र्याबद्दल निर्भीडपणे बोलेल, जेव्हा तीच्या प्रश्नांनी ती समाजाला फाट्यावर मारेल आणि जेव्हा गुलामगिरीच्या जोखडात बंदिस्त ठेऊ पाहणाऱ्या या समाजाच्या प्रत्येकाकडून समाधानकारक उत्तर मिळेल तेव्हाच हा स्वातंत्र्यलढा संपेल.
When_women_will_get_freedom?
Menstrual_cycle_or_mental_cycle?
स्वातंत्र्य दिन
आझादी_का_अमृत_महोत्सव
-छाया काविरे
9022535608