माझा बाप लय मोठा माणूस हाय!

बापमाणूस

मी कधीच तुला आदरार्थी शब्दाने हाक मारली नाही.
तू नेहमीच माझा चांगला मित्र बनून राहिलास आणि आरशासारखं मला माझं प्रतिबिंब दाखवत गेलास. आपल्यातल्या वैचारिक कलहंमध्येही तू नेहमीच माझी बाजू मला ठामपणे मांडू दिलीस. मला नेहमी वाटायचं कि मी तूझ्या आणि आई एवढी सुंदर का नाहीये? तेव्हा तू उपहासाने म्हणायचा, तू आमच्या सारखी दिसायला आमची आहेसच नाही, तु तर आम्हाला चोपड्याच्या (जिल्हा-जळगाव)रत्नावती नदीच्या पुलाखाली सापडली होती पण तू ना एखाद्या मोठ्या पुढाऱ्याची , एखाद्या मोठ्या माणसाची मुलगी असशील. कारण तुझ्या इतकं धाडस नाहिये आमच्यात!
अजूनही कॉलेज चा इयत्ता 12 वी चा तो दिवस आठवतो… आजी मला म्हणत होती ओढणी नीट घेत जा, येतांना रस्त्यावर पोरींसोबत दात काढत जाऊ नको, वर्गात सरांच्याही नजरेस नजर भिडवत जाऊ नको, “माणूस नि जातं गयरीं वाईट ऱ्हास माय!” तेव्हा तू आजीला म्हणाला होतास, ‘ती नजरेला नजर भिडवून बोलते म्हणून तर वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवते’.

आणि माझी भोळी भाबळी आजी म्हणायची काय करणार त्या लाकडी-लोखंडी बक्षिसाच त्यापेक्षा तुझ्या कॉलेजवाल्यांना सांग तांबे-पितळेची भांडी देत जा लग्नानंतर पण कामी येतील. मला माहित नाही माझा हा प्रवास मला कुठपर्यंत नेऊन थांबवेल, पण तुझ्या पाठिंब्याशिवाय मी काहीही नाही. गावाकडे बापाच्या धाकान बापाला येतांना बघून खेळता खेळता पोरी घरात पळून जायच्या, पण तुझ्या पाठिंब्यामुळे मी टेबल टेनिस च्या राज्यस्तरीय मॅचेस पर्यंत जाऊ शकली. B.A. च्या शेवटच्या वर्षाला असतांना मला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर चा अवॉर्ड मिळाला हे सगळं तुझ्या पाठिंब्यामुळेच ! हरियाणा ला राज्यस्तरीय पिकल बॉल स्पर्धेसाठी मी पात्र असूनही डावलली जात असतांना तू किती किती लढलास माझ्यासाठी…. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आपल्या गावातील उत्तमोत्तम शाळेत मला शिक्षण मिळाव आणि धर्म-जात, रूढी-परंपरेच्या या विषमतेच्या घोड्याच्या टापाखाली भरडल्या, रगडल्या, चिरडल्या जाणाऱ्या  समाजासाठी मी ढाल बनण्याचं तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल. “आपल्याला दूरचा पल्ला गाठायचा आहे थांबु नको लढत रहा.. कोणी पाडण्याचा प्रयत्न केला तर दुपटीच्या ताकतीने ताठ उभी रहा ” तुझे हे शब्द जेव्हा जेव्हा मी खचते, नकारात्मक होते तेव्हा तेव्हा मला आठवतात.
        अनेक आर्थिक अडचणी आल्यावरही  तू आमचं तिघ भावंडांच शिक्षण कधी थांबू दिल नाहीस. तुझा संघर्ष अतुलनीय आहे. थोडा ही पाय डगमगु लागला, मन खचू लागलं की फुटपाथवर भाजी विकत बसलेला तू आणि माझी मोलकरीण आई डोळ्यांसमोर उभी राहते. शिक्षणासाठी तुझ्या असलेल्या याच धडपडीमुळे  महार, मांग आणि चांभारवाड्यातली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकली गेलेली मुले पुन्हा प्रवाहात येऊ शकली.

               तुझ्या वर बोलावं तितकं कमीच आहे पण तुझ्या सारखा बाप प्रत्येक मुलीला भेटला तर कोणतीही मुलगी शिक्षित झाल्या बिगर राहणार नाही याची खात्री आहे.

परत एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेछा….

-छाया काविरे.