देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे शैक्षणिक योगदान

‘शेतकर्‍याचा आसूड’ या ग्रंथात महात्मा जोतीराव फुले लिहितात :

विद्येविना मती गेली।
मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।।
इतके अनर्थ एका अविद्येने केले!

जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणाच्या संदर्भात मांडलेला हा मूलभूत विचार समोर येतो. महाराष्ट्राने हा विचार गेली अनेक वर्षे जोपासला आणि वाढवला. यामुळेच अगदी दुर्गम भागातदेखील शिक्षणाचा प्रसार झालेला आहे. शिक्षण म्हटले की आपल्या डोळ्यांपुढे साधारणतः दोन प्रकारचे शिक्षण येते. पहिले म्हणजे, शाळा-महाविद्यालयांमधून दिले जाणारे जीवनोपयोगी शिक्षण आणि दुसरे म्हणजे, आयुष्याच्या शाळेतून मिळालेले जगण्याविषयीचे अनुभवसिद्ध शिक्षण. या दोन्ही प्रकारच्या शिक्षणांसंदर्भात महाराष्ट्राची परंपरा समृद्ध आहे. देशाच्या जडणघडणीत या दोन्ही प्रकारातील व्यक्तिमत्त्वांनी अतिशय मोलाचे योगदान दिलेले आहे.

पहिल्या प्रकारच्या शिक्षणाचा पाया घालणाऱ्या समाजसुधारकांची, विचारवंतांची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. दुसऱ्या प्रकारचे शिक्षण दिले ते संतकवींनी-कवयित्रींनी. आपल्या ओव्या-अभंगांमधून त्यांनी सर्वसामान्य माणसाचे आत्मिक उन्नयन केले. तेव्हा, अशा या विचारसंपन्न महाराष्ट्राचे देशाच्या शैक्षणिक जडणघडणीत मोठे योगदान राहिल्यास नवल नाही. आधुनिक शिक्षणासंदर्भात सांगायचे तर महाराष्ट्राच्या प्रत्येकच भागात – मग तो पश्चिम/दक्षिण महाराष्ट्र असो की मराठवाडा-विदर्भ-खानदेश- कोकण असो मोठमोठे शिक्षणमहर्षी होऊन गेले आहेत.
देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे शैक्षणिक योगदान काय याचा विचार साधारणतः तीन टप्प्यांमध्ये करावा लागतो. स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्योत्तर काळ आणि जागतिकीकरणानंतरचा काळ असे हे तीन टप्पे. प्रत्येक टप्प्यावर समाजसुधारकांनी, शिक्षणतज्ज्ञांनी मूलभूत स्वरूपाचे योगदान दिलेले आहे. जे महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या समाजजीवनावर खोल परिणाम करणारे ठरले.

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले-सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहूमहाराज, लोकमान्य टिळक, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान अनन्यसाधारण म्हणावे लागते. कर्मवीर भाऊराव पाटील, मामासाहेब जगदाळे, बापूजी साळुंखे यांसारख्या असंख्य शिक्षणमहर्षींनी यानंतर शिक्षणाची ही मशाल सतत पेटती ठेवली.

जागतिकीकरणाच्या थोडासा मागचा-पुढचा काळ लक्षात घेता उद्योग-विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधन-संगणक अशा विविध क्षेत्रातल्या महाराष्ट्रीय व्यक्तींनी देशाच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. वसंत गोवारीकर ही काही प्रातिनिधिक नावे उदाहरणादाखल पुरेशी ठरावीत. या तीन टप्प्यांचा हा ढोबळ परामर्श घेतल्यानंतर आता शिक्षणक्षेत्रातील थोर व्यक्तिमत्त्वांचा ओझरता परिचय करून देत समग्र आढाव्याकडे यथाशक्य वळू या…

महाराष्ट्रातील संत भारताचे गुरू
महाराष्ट्रातील विविध संतांनी अनुभवसिद्ध चिंतन-मंथनातून केवळ आपल्या भारतालाच नव्हे तर, संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण दिली. संतवाङ्मयातून मांडल्या गेलेल्या तत्त्वज्ञानाचा आज जगभरात अभ्यास केला जातो. संत ज्ञानेश्वरमहाराजांनी मानवजातीचे हित सांगितले. संत एकनाथमहाराजांनी सर्वसामान्यांना व्यवहारात चोख राहण्याचा आदर्श घालून दिला. संत रामदासांनी लोकशिक्षणाचे धडे दिले. आवश्यक तेवढे धन जरूर मिळवावे; पण ते सन्मार्गानेच मिळवावे, ही आजच्या परिस्थितीत आवश्यक अशी शिकवण संत तुकाराममहाराजांनी दिली. राष्ट्रीय चारित्र्य कसे असायला हवे ते तुकडोजीमहाराज, गाडगेमहाराज या राष्ट्रसंतांनी आपल्या आचार-विचारांतून सांगितले. महाराष्ट्रातील या संतांनी कोणताही भेदभाव न करता आपली शिकवण सर्वांना दिली.

ब्रिटिशांचे भारतात आगमन
सोळाव्या शतकात भारतात ब्रिटिशांचे आगमन झाले. त्यांनी येथील शिक्षणपद्धती आमूलाग्र बदलून टाकली. सन १८१८ मध्ये मराठ्यांचे साम्राज्य अस्तंगत पावले व महाराष्ट्रासह भारतात ब्रिटिश राजवट खऱ्या अर्थाने सुरू झाली. सन १८२१ मध्ये पुण्यात संस्कृत पाठशाळेची, तर त्यामागोमाग मुंबईत ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना मुंबईचे गव्हर्नर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी केली. सन १८२३ मध्ये मुंबईत ‘एल्फिन्स्टन कॉलेज’ व १८३५ मध्ये ‘कोलकाता मेडिकल कॉलेज’ या महाविद्यालयांची स्थापना झाली. ब्रिटिश राजवटीत सुरू झालेला शिक्षणाचा हा प्रवास भारतात आधुनिक शिक्षणपद्धती रुजवण्यात महत्त्वाचा ठरला.

…आणि दलितांसाठी शिक्षणाची दारे उघडली
महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात समाजसुधारकांची/शिक्षणतज्ज्ञांची एक मोठी फळी होऊन गेली. त्यांत बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महात्मा जोतीराव फुले, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, गोपाळ गणेश आगरकर हे आघाडीचे समाजसुधारक होते. संपूर्ण भारतात दलितांच्या शिक्षणाची जी व्यवस्था होती ती महाराष्ट्रातही होती; मात्र, दलितांच्या सर्व चळवळी या प्रामुख्याने महाराष्ट्रात उभ्या राहिल्या.

महात्मा फुले यांनी सन १८५२ मध्ये महार-मांग यांच्या मुलांसाठी सुरू केलेली शाळा म्हणजे दलितांच्या शैक्षणिक इतिहासाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे पाऊल. यापूर्वी, म्हणजे सन १८२१ मध्ये, एल्फिन्स्टन यांनी पुण्यात विश्रामबागवाड्यात संस्कृत पाठशाळा सुरू केली होती. मात्र, त्या शाळेत फक्त ब्राह्मण मुलांना प्रवेश होता. यावरून स्पष्ट होते की, अस्पृश्यांना शिक्षण देऊन उच्चवर्णीयांचा रोष ओढवून घेण्याची लॉर्ड एल्फिन्स्टन यांची तयारी नव्हती.

दलितांना शिक्षण न देण्याची ब्रिटिश राज्यकर्त्यांची ही धोरणे लक्षात आल्यावर फुले यांनी दलितांसाठी शाळा सुरू करून समाजात शिक्षणाच्या क्रांतीचे पहिले पाऊल टाकले. याच दृष्टीने सन १८८३ मध्ये आणखी एक मूलभूत विचार फुले यांनी ‘हंटर आयोगा’पुढे मांडला.

तत्कालीन ब्रिटिश शिक्षणतज्ज्ञ थॉमस बॅबिंग्टन मेकॉले यांचे म्हणणे होते की, ‘शिक्षणाचा प्रसार उच्च जातींतील लोकांमधून खालच्या जातींतील लोकांकडे असायला हवा,’ तर फुले यांचे म्हणणे होते की, ‘शिक्षणाचा प्रसार खालून वर जायला हवा. कारण, भारतासारख्या समाजरचनेत उच्चवर्णीयांकडून अस्पृश्य वर्गाकडे शिक्षणाचा प्रवाह येऊच शकत नाही. परिणामी, अस्पृश्य आणि बहुजन समाज समान शिक्षणापासून वंचित राहतील.’ शूद्रातिशूद्रांच्या गुलामगिरीचे, दुःखाचे कारण अविद्या हे आहे असे फुले नेहमी सांगत असत.

महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांचे आयुष्य बदलण्याच्या कामी राजर्षी शाहूमहाराजांनी घेतलेल्या शिक्षणातील ऐतिहासिक निर्णयांची भूमिका महत्त्वाची आहे. शाहूमहाराजांनी प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक मोफत आणि सक्तीचे करण्याचा कायदा सन १९१६ मध्ये संमत केला. प्राथमिक शिक्षणाबरोबरच त्यांनी उच्च माध्यमिक व तंत्रशिक्षणाला महत्त्व दिले. लष्करी शिक्षणासाठी ‘इन्फन्ट्री स्कूल’ही त्यांनी सुरू केले.

सन १९०१ मध्ये शाहूमहाराजांनी विविध जातींच्या विद्यार्थ्यांसाठी जातीनिहाय वसतिगृहे स्थापन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी त्यांनीच शिष्यवृत्ती देऊन आपल्या चळवळीचा वारसा त्यांना दिला. भारतीय समाजव्यवस्थेत विषमता असल्याने शिक्षणात आरक्षणाची गरज असल्याचे शाहूमहाराजांनी ओळखले. देशात आरक्षण देणारे पहिले संस्थानिक ते ठरले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संवैधानिक तरतुदी करून त्याला देशभरात कायदेशीर स्वरूप दिले.

‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,’ असे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून ठेवलेले आहे. कनिष्ठ जातींतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी ता. २० जुलै १९२४ रोजी त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थेची, तसेच ता. १४ जून १९२८ रोजी ‘दलित शिक्षणसंस्थे’ची, तर ता. ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने सन १९४६ मध्ये मुंबईत ‘सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय’, सन १९५० मध्ये औरंगाबाद येथे ‘मिलिंद महाविद्यालय’, सन १९५३ मध्ये मुंबईत ‘सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय’, तर सन १९५६ मध्ये मुंबईत ‘सिद्धार्थ विधी महाविद्यालय’ सर्व समाजांसाठी सुरू करण्यात आले.

सयाजीराव गायकवाड यांनी सन १८७५ मध्ये स्वतंत्र शिक्षण विभागाची स्थापना केली. अस्पृश्यांना व आदिवासींना सरकारी खर्चाने मोफत प्राथमिक शिक्षण आणि वसतिगृह मिळावे यासंदर्भात जगात पहिल्यांदा हुकूम काढला तो गायकवाड यांनीच.

ह्याशिवाय रयत शिक्षण संस्थे’चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, श्रद्धानंद छात्रालय व श्रीशिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक पंजाबराव देशमुख, महाराष्ट्र विद्यालय सुरू करणारे शिक्षणमहर्षी मामासाहेब जगदाळे आदींचे योगदान अनन्यसाधारण आहे.

तर, देशाच्या प्रगतीत शिक्षणाचे नेमके स्थान काय आहे हे लोकमान्य टिळकांनी बारकाईने अभ्यासले व ‘स्वदेशी’ व ‘राष्ट्रीय शिक्षण’ या विषयांकडे देशाचे लक्ष वेधले. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी टिळक-आगरकर आणि महादेव बल्लाळ नामजोशी यांच्या सहकार्याने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.

स्त्रीशिक्षण
भारतीय स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. जोतीरावांच्या मनातील स्त्रीशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. ता. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून या दांपत्याने शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या कठीण कार्यात त्यांना फातिमा शेख यांची साथ मिळाली. शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई म्हणतात :

‘विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून।
तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन।’

सन १८९९ मध्ये पुण्यातील हिंगणे येथे स्त्रीशिक्षणासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सन १९१६ मध्ये महिला विद्यापीठ स्थापन केले. या महिला विद्यापीठाचे नामांतर पुढे ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ (एसएनडीटी) असे झाले. भारतातील अशा प्रकारचे हे एकमेव विद्यापीठ आहे.

ब्रिटिश शिक्षण पद्धतीत दोष; महाराष्ट्रातून विरोध
ब्रिटिशांच्या राजवटीला बळकटी आणणारी शिक्षणपद्धती देशात स्थिर होत असतानाच असंतोष निर्माण झाला. प्रचलित शिक्षणाचा एकांगीपणा, व्यवसायिक शिक्षणाचा अभाव, सर्वसामान्यांची शिक्षणाबद्दल उदासीनता आणि स्त्रीशिक्षणाकडे दुर्लक्ष असे अनेक दोष समोर येऊ लागले. लोकहितवादी, फुले, रानडे, चिपळूणकर, टिळक आणि आगरकर यांनी तत्कालीन सरकारी शिक्षणपद्धतीमधील दोषांवर हल्ला चढवायला सुरुवात केली. त्यातून राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीचा जन्म झाला. महात्मा गांधीजींनी १९२१ मध्ये सुरू केलेल्या असहकार चळवळीमुळे राष्ट्रीय शिक्षणाला चालना मिळाली. नंतरच्या काळात ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांनी अंगणवाड्या, बालशिक्षण, आदिवासींसाठी मातृभाषेतून शिक्षण असे अभिनव प्रयोग शिक्षणक्षेत्रात केले.

आशियातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था ‘रयत’ची स्थापना
सन १९२४ मध्ये ‘स्वावलंबनातून शिक्षण’ या ध्येयाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. भाऊरावांनी दुधगाव (जि. सांगली) येथे ‘दुधगाव विद्यार्थी आश्रम’ नावाचे वसतिगृह सुरू केले. त्यामुळे ग्रामीण भागांतील मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. अशाच प्रकारची वसतिगृहे सातारा जिल्ह्यातील नेले व काले या ठिकाणी सुरू झाली. आज या संस्थेमध्ये ४५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

स्वयंसेवी संस्थांची सुरुवात
मिशनऱ्यांनी चालवलेल्या शाळा ही महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांची सुरुवात होती. सन १८५० च्या सुमारास अशा शाळांमधून धार्मिक शिक्षण देण्याचा प्रघात होता. ही बाब स्वतंत्र वृत्तीच्या लोकांना आवडली नाही. या देशातील लोकही इंग्लिश भाषेतून शिक्षण देऊ शकतात, अशा निश्चयाने सन १८६० पासून पुण्यात खासगी शिक्षणसंस्थांचे काम सुरू झाले. सध्या अस्तित्वात असलेल्या शिक्षणसंस्थापैकी अशा प्रकारची पहिली संस्था म्हणजे त्या वेळची ‘पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन असोसिएशन’. या संस्थेचे पुढे ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ असे नामकरण झाले. पुण्यातील भावे स्कूल, गरवारे महाविद्यालय या याच संस्थेच्या शाखा होत्या. ही संस्था वामन प्रभाकर भावे यांनी सन १८६० मध्ये स्थापन केली.

विविध माध्यमांच्या शाळा
महाराष्ट्रामध्ये इंग्लिश आणि मराठी या माध्यमांच्या शाळांव्यतिरिक्त मुंबई शहरात, ठाणे जिल्ह्यात, तसेच विदर्भातील काही भागांत मराठीबरोबरच गुजराती माध्यमाच्या शाळाही आहेत, तर कोल्हापूर, सांगली, मुंबई, पुणे येथे कन्नड माध्यमाच्याही काही शाळा आहेत. मुसलमान वस्ती असलेल्या ठिकाणी उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत.

मतिमंद मुलांचे शिक्षण
स्वातंत्र्योत्तर काळात व्यावसायिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण, मतिमंद मुलांचे शिक्षण, प्रौढशिक्षण अशा शिक्षणाच्या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. मतिमंद, मूकबधिर, अपंग, अंध इत्यादींच्या शिक्षणासाठी काही वेगळे करायला हवे, ही जाणीव निर्माण झाली आणि मुंबईत हाजी अली, पुण्यात कामायनी शाळा, रुईया मूकबधिर विद्यालय या मतिमंद मुलांसाठीच्या शिक्षणसंस्था सुरू झाल्या.

राज्यातील प्रमुख विद्यापीठे
मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, मराठवाडा आणि एसएनडीटी अशी सहा प्रमुख विद्यापीठे राज्यात आहेत. याशिवाय राहुरी, अकोला, परभणी, दापोली येथे कृषी विद्यापीठे आहेत. पुणे येथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ही एक स्वतंत्र संस्था आहे, तसेच आयआयटी (पवई), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (चेंबूर) अशाही विद्यापीठसदृश मान्यता असलेल्या संस्था महाराष्ट्रात आहेत. कला, शास्त्र आणि वाणिज्य हे विषय शिकवणारी जवळजवळ ४०० महाविद्यालये महाराष्ट्रात आहेत.

अभियांत्रिकी, वैद्यक, कृषी, व्यवस्थापन, कायदा इत्यादी अनेक प्रकारच्या व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संस्था महाराष्ट्रात असून, राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उच्च आहे. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी शेतीसुधारणांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
*
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF)-२०२३’ म्हणजेच, देशभरातील शैक्षणिक संस्थांचे व विद्यापीठांचे रँकिंग जारी करण्यात आले. त्यानुसार देशातील इंजिनिअरिंग शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई आयआयटीचा तिसरा क्रमांक लागतो, तर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये मुंबई आयआयटी चौथ्या क्रमांकावर आहे. देशातील दंतमहाविद्यालयांच्या यादीमध्ये पुण्याचे डी. वाय. पाटील विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
*
सन १९५८ मध्ये स्थापन झालेली ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे’ ही देशातील प्रमुख अभियांत्रिकी संस्थांपैकी एक आहे. ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ आणि ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ यांसारख्या प्रतिष्ठित संस्था मुंबईत आहेत. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूर’ आणि ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई’ यांसारख्या संस्थांनी शिक्षणात राज्याचे महत्त्व राखले आहे.
*
गेल्या काही वर्षांत, महाराष्ट्र सरकारने दर्जेदार शिक्षणात प्रवेश वाढवण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम आणि धोरणे हाती घेतली. आयटी-आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणारी ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड’ (MKCL) हे त्याचेच उदाहरणे होय.
*
अलीकडच्या काळात शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया मानली जाते. त्यादृष्टीने शिक्षणाचा अभ्यास करणारी व संशोधन करणारी पुण्यातील ‘विद्याभारती’सारखी संस्था अशा प्रकारची भारतातील एकमेव संस्था आहे. वेगवेगळ्या विद्याशाखांतर्गत शिक्षणशास्त्रात पीएच.डीसाठी मार्गदर्शन करणे, कृतिरूप संशोधनाचे काम हाती घेणे अशी विविध कामे ही संस्था करते.
*
लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर सन १८५७ मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. सन १८८३ मध्ये स्त्रियांना सर्व पदव्यांसाठी प्रवेश देणारे हे भारतातील पहिले विद्यापीठ होते. या विद्यापीठातून शिकलेल्या अनेकांनी जगाच्या पाठीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. होमी भाभा, न्या. एम. सी. छागला, महंमद अली जीना, फिरोजशहा मेहता, स्वातंत्र्यवीर सावरकर, यांच्यापासून ते लालकृष्ण अडवानी यांच्यापर्यंत अनेकांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेतले.
*
आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात विविध क्षेत्रांत आपण यशस्वी मजल मारली आहे. ‘चांद्रयान-३’ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लवकरच उतरेल. चंद्राच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. देशपातळीवरील ह्या प्रगतीमध्ये महाराष्ट्रातील असंख्य शिक्षणतज्ज्ञांचे, विद्वानांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे.
*
शिक्षणक्षेत्रासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेली विद्यमान काळातील काही महाराष्ट्रीय उदाहरणे : अमेरिकेतील आरोग्य, देखभाल, तंत्रज्ञान व उपाययोजना या क्षेत्रात काम करणाऱ्या ELLKAY या कोट्यवधींची उलाढाल असलेल्या कंपनीचे अध्यक्ष अजय कापरे हे महाराष्ट्रीय आहेत. आंतरराष्ट्रीय ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळवणारे शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी ‘एकलव्य फाउंडेशन’च्या माध्यमातून उपलब्ध करून देणारे राजू केंद्रे, रस्त्यावरील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे या उद्देशाने ‘दादाची शाळा’ सुरू करणारा एकवीसवर्षीय अभिजित पोखर्णीकर…हे सगळे जण महाराष्ट्रीय आहेत. याशिवाय, शैक्षणिक प्रश्नांवर काम करणाऱ्या विद्यार्थी संघटनाही महाराष्ट्रात आहे.
*
एकूण काय तर, मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिक्षणामुळे सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक प्रगल्भता निर्माण होते. काळाची पावले थेटपणे ओळखता येतात. काळासोबत धावत असताना काळाच्या पलीकडचीही स्थिती-परिस्थिती समजून घेण्यासाठी उपयोग होतो तो शिक्षणाचाच.

महात्मा फुले यांच्याच शब्दांत सांगायचे तर, विद्येमुळे मती अधिकाधिक कार्यक्षम होते व पुढचे अनेक अनर्थ टळतात. असे अनर्थ कसे टाळता येतील हे महाराष्ट्राने खूप आधीपासूनच ओळखले आहे व स्वतःच्या सर्वांगीण विकासाबरोबरच देशाच्या जडणघडणीतही आपले अमूल्य असे शैक्षणिक योगदान दिले आहे.

0X0X0

नाव : छाया काविरे (९०२२५३५६०८)
महाविद्यालय : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
पत्ता : सिंहगड रोड, पुणे