-छाया काविरे (chhayakavire02@gmail.com)
————————————-
रस्त्याच्या दुतर्फा फुललेली गर्दी…. शेतकरी-कामगारांच्या आसुसलेल्या नजरा…चिमुकल्यांच्या डोळ्यात भविष्याची स्वप्नं…. आणि महिलांच्या मनी सुरक्षिततेची, आपलेपणाची भावना…अशा सगळ्या भारलेल्या वातावरणात राहुल गांधी यांची `भारत जोडो यात्रा` चार राज्यांतून प्रवास करून सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल झाली. अवघ्या देशाला एकात्मतेच्या भावनेनं जोडायला निघालेल्या या यात्रेत एक दिवस का होईना सहभागी व्हायचं असं ठरवलं. राहुल गांधींसोबत आपल्यालाही `भारत जोडो` ह्या ऐतिहासिक ठरू पाहणाऱ्या यात्रेचा भाग होता येणार ह्याचा एक वेगळाच आनंद मनात होता… हिंगोली इथं या यात्रेत सहभागी व्हावं असं आम्ही चार मित्र-मैत्रिणींनी ठरवलं आणि त्यादृष्टीनं नियोजन केलं. जळगाव, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर… वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील आम्ही चौघं शिक्षण आणि रोजगारासाठी पुण्यात काही वर्षांपासून राहायला आहोत. …तर, अशी ही आम्ही चार पाखरं पुण्याहून निघालो हिंगोलीच्या दिशेनं…
बस पकडण्यासाठी मी कशीबशी संगमवाडीच्या बसस्थानकावर पोहोचले. हिंगोलीला जाणारी शेवटचीच बस स्थानकात सज्ज होती. आम्हा चौघांच्या चमूतले तीनजण अद्याप यायचे होते म्हणून मी बस थांबवून ठेवली होती. तिघंही पुण्याच्या ट्रॅफिकला कसा तरी वळसा घालत स्थानकावर पोहोचले आणि सुरू झाला आमचा `भारत जोडो`साठीचा अविस्मरणीय प्रवास! ‘ये दुनिया 2012 में खतम होनेवाली है’ हे वाक्य लहानपणी कधीतरी मैत्रीण क्रांतीच्या कानावर पडलं होतं. या वाक्याचा तिच्या बालमनावर त्या वेळी कसा परिणाम झाला होता ते ती सांगत होती. ते ऐकत असतानाच, एखाद्या झुलत्या मनोऱ्यावर असल्यासारखा फील बसमध्ये येत होता आणि नुकतीच होऊन गेलेली गुजरातमधल्या मोरबी पुलाची दुर्घटना आठवत होती. रात्रीची वेळ…धडकी भरवणारे रस्ते आणि ‘बिन पैंदे का लोटा’ सारखी प्रवाशांना बसमध्ये घरंगळत ठेवणारी `फटाका ट्रॅव्हल्स`!
अशा स्थितीतच एकदाचा कसा तरी डोळा लागला आणि थोड्याच वेळात, आपण कुठं तरी जोरात फेकले जातोय की काय, अस वाटलं…पण, `आपण स्वप्नात आहोत,` असं मी स्वतःलाच सांगणार, त्याआधीच एक मुलगी जोरात किंचाळली. आणि, लक्षात आलं की हे स्वप्न नसून वास्तव आहे! बसचा तोल एका बाजूला गेल्यामुळे आपण फेकले जात आहोत हे प्रत्ययाला आलं. आता मीही घाबरून ओरडेन की काय असं मला वाटत असतानाच बस स्थिरस्थावर झाली. छातीचा ठोका मात्र चुकला.
पुढं बस एका ढाब्यावर थांबली. भुकेनं पोटात कावकाव करून एव्हाना निपचित पडलेल्या कावळ्यांना जागं करण्यासाठी आम्ही बसमधून उतरलो. जेवलो. आणि, परत येऊन बसमध्ये बसलो. पोटोबा झाल्यामुळे आता गप्पांचा मूड नव्हता. मग झोपी गेलो. दिवस उजाडला, सकाळ झाली… आणि बघतोय तर काय, नवलच! लग्नाआधीच आमचे हात पिवळे झालेले आढळले!
हे कधी झालं? कस झालं? कुणामुळे झालं? हे होण्याला कोण जबाबदार….किती तरी प्रश्न क्षणार्धात पडले. प्रश्न पडले की मग उत्तरं शोधणं आलंच. या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधायला लागलो आणि लक्षात आलं की, ही तर रात्री ढाब्यावर जेवलेल्या पनीरची किमया! पनीरमधल्या `जादा` हळदीनं आम्हाला हा अनोखा अनुभव दिला होता!
`ट्रॅव्हल्स`चा प्रवास संपला एकदाचा. आम्ही हिंगोलीला उतरलो. आता कळमनुरी या गावाच्या दिशेनं कूच करायचं होतं. अडनिड्या गावी पोहोचवण्यासाठी `लाल परी`सारखं दुसरं प्रभावी साधन कोणतं? झालो मग आम्ही लाल परीचे सवारी! तिकीट काढण्यासाठी दहा रुपयांचा डॉलर कंडक्टरच्या समोर धरला…`दहा रुपयांचा डॉलर हिंगोली, नांदेड ह्या भागात चालत नाही,` असं तो वदता झाला! आम्ही आश्चर्यचकित.
इकडची मराठवाड्यातली `आरबीआय` वेगळी आहे की काय, असा गमतीदार प्रश्न मनात येत नाही तोच, पुढच्याच क्षणी समजलं की, दहा रुपयांचा डॉलर चालत नाही, ही कुणी तरी पसरवलेली अफवा आहे…कंडक्टरही आमची गंमतच करत होता.
कळमनुरीत उतरलो. तिथल्या `केम्ब्रिज स्कूल`मध्ये आम्ही फ्रेश झालो. पोटातले कावळे आपलं अस्तित्व पुन्हा एकदा दाखवून देऊ लागले. मग काय, नाश्ता करायला जाण्यासाठी रस्त्यावर येऊन थांबलो. एकही रिक्षा थांबायला तयार नव्हती. भूक तर खूपच लागली होती. शेवटी कावऱ्याबावऱ्या झालेल्या आम्हा चौघांना बघून एक टेम्पो थांबला. पिवळ्या रंगाचा. आम्ही त्यात बसलो. असा अनोखा प्रसंग आणि सेल्फी काढायचा नाही म्हणजे काय? सेल्फी काढण्याचा सोहळा पार पडला. सेल्फी काढताना आम्हा चौघांचे डोळे चांगलेच चमकत होते. आनंदानं. कारण, टेम्पोचालक आमच्याकडून पैसे घेणार नव्हता!

आमची थांबायची सोय ज्या शाळेत केलेली होती त्या शाळेत आम्ही परत आलो आणि डॉ. कल्याणराव पतंगे यांच्याकडून समजलं की यात्रेचं वेळापत्रक बदललंय. ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी आणि ज्येष्ठ पत्रकार, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांच्याशी होणारी भेट नियोजनाअभावी चुकली. हळहळ वाटली. मात्र, काहीही झालं तरी आपण `भारत जोडो यात्रे`त सहभागी व्हायचंच असा आमचा निर्धार असल्यामुळं आमच्यासाठी नवंच गाव असणाऱ्या कळमनुरीतल्या रस्त्यांची आणि पुढील प्रवासाची काहीही कल्पना नसताना आम्ही कळमनुरीतून बाहेर पडून उंबरा फाटा-चोरांबा-वारंगा फाटा या वाटेनं निघालो. या वाटेवर एसटीच्या गाड्यांचं प्रमाण कमी, त्यात आम्ही कळमनुरीत नवीन म्हणून ‘घे सातशे न् भर पॅसेंजर’ अशा प्रसंगाला आम्हाला सामोरं जावं लागलं. ‘दे धक्का’ चित्रपटातल्या टमटमसारखे धक्के देत-घेत आमचा प्रवास सुरू होता. ह्या भागात आलू बोंडा हा खाद्यप्रकार खायला मिळाला. पुण्या-मुंबईकडं मिळणाऱ्या बटाटेवड्यासारखाच हा प्रकार; पण मराठवाड्याच्या काही भागांत आणि विदर्भात त्याला म्हणतात आलू बोंडा!
उंबरा फाटा ते सिंदगी या गावाच्या प्रवासात अकल्पितपणे भेटलेल्या तीनपैकी एका काकूंनी आम्हाला चहा प्यायला त्यांच्या घरी निमंत्रित केलं. पुण्या-मुंबईत कामानिमित्त कधी एखाद्या बड्या घरी जाणं झालं तर विचारलं जातं, `पाणी देऊ का?` पुण्या-मुंबईत हे असं काही अगदी सरसकट सगळीकडं घडत नसलं तरी मनानं या दोन घटनांची तुलना केलीच. असो. प्रवासात काकूंशी झालेल्या संवादातून काँग्रेसचा तेव्हाच्या सत्ताकाळाचे आणि भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या सत्ताकाळाचे सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर झालेले चांगले-वाईट परिणाम यानिमित्तानं जाणून घेता आले. त्या तिघी एका नातेवाइकाच्या मुलाच्या अंत्यविधीहून आपल्या गावी परतत होत्या. उच्च शिक्षण घेऊनही रोजगार नसल्यामुळे त्या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गॅस-सिलिंडरच्या आणि कडधान्यांच्या वाढत्या भावाबद्दल काकू पोटतिडकीनं बोलत होत्या. म्हणाल्या : “जीवन जगायला लागणाऱ्या सगळ्या वस्तूची किमती सरकारने वाढून ठेवली पण हामच्या शेतमजुरांच्या मजुरीमदी वाढ होत नाय. गावात पोटापाण्याचा दुसरं मार्गच नसल्यानं मजुरीच हामच्यासाठी मार्ग उरतो. कोपन मदी भेटणाऱ्या तांदूळ अन दाळीची पण quality पण चांगली नसते.” तितक्यात शेजारच्या दुसऱ्या काकू बोलत्या झाल्या अन् म्हणाल्या : “आमची पोरगी 12 वीला 92 टक्के घेतली मॅडम. 80 टक्केच्यावर मार्क भेटले त्या गरीबाच्या लेकरायला बार्टी ची schollership भेटते. माझी पोरगी आता डिग्रीच्या दुसऱ्या वर्षी गेली तरीबी तिला schollership भेटली नाय.” अंगणवाडीच्या सेविका असलेल्या तिसऱ्या काकू म्हणाल्या : “पोराचं स्वाधार योजनेत नंबर लागलय पण त्या स्वाधारच पोराला कसलाबी आधार नाय. पुण्याला कतीबी ऍडजस्ट केलं तरीबी कमीतकमी पाच हजार रुपये महिन्याला जातात. पाच हजार हामच्या शेतमजुरांच्या महिन्याचं कमाई असते. ह्याच्यात पॉट भराव की पोराच्या शिक्षणाला पैसे द्याव?”

अखेर, आम्ही चोरांबा फाट्यावर पोहोचलो. संध्याकाळी साडेसात वाजता राहुल गांधींची इथं सभा होणार, अशी माहिती होती. रिक्षाचालकानं यात्रेच्या एक किलोमीटर अलीकडं सोडलं. सभेला वेळेत पोहोचता यावं म्हणून वेळ न घालवता आमचं `पायदळ` सभेच्या दिशेनं चालू लागलं. जणू काही आम्ही विठ्ठलाच्या वारीचा भाग होण्यासाठीच निघालो आहोत, अशी भावना आमच्या मनात होती. शंभर मीटर चालून होत नाही तोच माझी चप्पल तुटली… बोंबला! चप्पल तशीच घासत मी चालत राहिले. पुढं वाटेत काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याशी संवाद झाला आणि तोंडून आमदार कपिल पाटील यांचं नाव निघालं. मग त्या कार्यकर्त्यानं आमच्यासाठी पटकन् गाडीची सोय केली. गर्दीच्या अलीकडं गाडी थांबवून आम्ही उतरलो. सभेच्या स्थळी पोहोचलो. आणि बघतोय तर काय, सभा वेळेच्या एक तास आधीच आटोपली होती! कार्यकर्ते मुक्कामाच्या ठिकाणी जायला निघाले होते. आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते नाही, त्यात आमच्याकडे पासही नव्हता, त्यामुळं आमची सोय तिथं होणार नव्हतीच. आम्ही गंडलो! आमचं नियोजनच गंडलं! तोंड पाडून शेजारून जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची धूळ अंगावर घेत व कार्यकर्त्यांनी खाल्लेल्या केळ्यांची सालपटं, पाण्याचे प्लॅस्टिकचे ग्लास तुडवत आम्ही परतीच्या वाटेला लागलो. आता सभोवती चांगलंच काळोखून आलं होतं. मग पुन्हा तेच…एकही रिक्षा थांबत नव्हती. शेवटी, आम्ही पोलिसांची व्हॅन थांबवली. त्यांना म्हणालो : “आम्हाला प्रकाशापर्यंत सोडता का; जेणेकरून आम्ही समोरून येणाऱ्या गाड्यांना दिसू शकू आणि आम्हाला स्टेशनला जायला गाडी मिळेल.” त्यांनी आम्हाला त्यांच्या व्हॅनमध्ये घेतलं आणि एक रिक्षा थांबवून आमची स्टेशनपर्यंत जायची सोय करून दिली.

आणि, परत सुरू झाला संवाद रिक्षाचालकाशी आणि रिक्षात बसलेल्या काकूंशी! आमच्यातल्या एकीनं त्या तरुण रिक्षाचालकाला विचारलं : “काका, “तुम्ही नाही गेलात का `भारत जोडो यात्रे`त?” तिच्या ‘काका’ या शब्दानं रिक्षाचालक दुखावला गेला. एका हातात रिक्षाचं हँडल धरत आणि दुसऱ्या हाताची करंगळी नकारार्थी हलवत तो म्हणाला : “काका नाही! काका बोललात तर मी काकू म्हनिल.. जमल का तुमाले?” त्याचं ते आत्मीयतेचं बोलणं ऐकून आम्हाला हसू आवरलं नाही. नंतर त्यांचं उत्तर आलं : “राहुलला काय बायको ना पोरबाळ तस आपल्याला जमते का बाबा… अस सगळं सोडून जायाला. तेयला भेटायला कोणाला बर नाही वाटणार ? पण, आपल्याले कोण जाऊन देईल? हे राजकारणी लोकायच समद खोट राहयत ना. ‘पुडे राजवाडा अन माघे भिकारवाडा’ यात्रा इकडून जाणार म्हणून नगरपालिकेवाले रोडवरचे खड्डे रातीतून भुजले. बॅनर लावले. पण, जस जस यात्रा पुडे गेली तस तस रोडवरचे खड्डे परत दिसू लागले. गांधी माघ सोडून गेलेल्या रोडवरचे झेंडे पोस्टर काढायचं काम लगेच सुरू होते.”
जसे आम्ही चार जण मूळचे जळगाव, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूरचे; पण निघालो होतो पुण्याहून…तसे इतरही आमचे बरेच साथी कुणी नगरचे, कुणी नाशिकचे, कुणी वाशिमचे, कुणी बीडचे त्या त्या ठिकाणाहून भारत जोडायला हिंगोली-कळमनुरीत जमले होते. काही जण खुद्द नांदेड-हिंगोलीचेही होते…अनेकांच्या भेटी-गाठी झाल्या… गप्पा झाल्या. आता एवढ्या लांबून पुण्यासारख्या ठिकाणाहून इथं येऊनही आम्हा चारजणांना राहुल गांधींची सभा अनुभवायला मिळालीच नाही, ह्याची खंत आमच्या मनात जरूर होती…पण सभेशिवायही इतर बरंच काही अनुभवायला, निरखायला मिळालं तेही काही कमी नव्हतं.

आदल्या रात्री ढाब्यावर पनीरच्या हळदीनं अचानकच पिवळे झालेले आमचे हात…ऊस वाहून नेणाऱ्या टेम्पोत बसून केलेला प्रवास…त्या अनोख्या प्रवासाची आठवण छायाचित्रबद्ध करून ठेवणारा सेल्फी…आमच्यासाठी सर्वस्वी नवा असलेला मराठवाड्यातील भाषेचा आगळावेगळा, स्थानिक भाषेची स्वतंत्र ओळख टिकवून ठेवणारा हेल…दहा रुपयांच्या डॉलरबद्दल तिथल्या लोकांमध्ये असलेला गैरसमज…प्रवासातल्या तीन काकूंशी झालेला हृद्य संवाद, त्यांचे समजून घेता आलेले विचार…तरुण रिक्षाचालक `काका`शी झालेला नर्मविनोद, आमच्यासाठी नव्या असलेल्या त्या मुलखातला डोळे भरून पाहिलेला सगळा परिसर… आम्हाला उजेडापर्यंत आणून सोडणारी पोलिसांची व्हॅन…असा आठवणींचा एक कोलाजच परतीच्या वाटेवर असताना मनात तयार झाला…
या `यात्रे`ची आमच्यापुरती सांगता झाली होती…पण सर्वसामान्य माणसाच्या भावनांचे उभे-आडवे ताणेबाणे समजून घेत देशाच्या एकतेचं वस्त्र विणत राहुल गांधी देशाच्या इतर भागांत यात्रा सुरूच ठेवणार आहेत. `यात्रे`ला मनोमन शुभेच्छा देत आम्ही पुण्याच्या दिशेनं रवाना झालो…
मनात आलं :
हिंगोली-कळमनुरीची झाली यात्रा,
संपली वारी…..!
राहुल नावाचा विठ्ठल जर परत आला
तर, सांगाल का, तुमच्या दारी?