सह्याद्री ते सातपुडा…!

काहीही फारस बदललेलं नव्हतं !

आज बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर एका लग्नानिमित्ताने
सह्याद्री ते सातपुडा असा प्रवास झाला. लग्नाच्या आदल्या दिवशी अहेर चा कार्यक्रम झाला. अगदी “घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा.” या म्हणीप्रमाणेच !

लग्नाची वेळ दुपारी 12 ची ठरली होती पण नेहमीप्रमाणेच लग्न मंगलाष्टक आणि ढोल ताशांच्या गजरात सायंकाळी 4 वाजता लागले  आणि जेवायच्या पंगती बसल्या. जेवतांना एक बाई एका माणसाला बोलत होती की, “मी हलक्या समाजाची आहे म्हणत त्यांनी मला निमंत्रण दिले नाही, तरी माझ्या आप्पाने (वडिलांनी) मला जात लपवायला आधीच सांगितलेले होते”. खरंतर यावर अवाक होण्यासारख मला काहीही वाटलं नाही. कारण हे सर्व काही नवीन नव्हतच. तिला मी पुढे काहीतरी विचारणार त्या आधीच एक वेगळाच गोंधळ उडाला. दोन तृतीयपंथी पैसे मागण्यासाठी स्टेज वर चढल्यामुळे हा गोंधळ उडाला होता. ते स्टेज वर चढले म्ह्णून खालून टल्ली झालेला एक काका त्याला शिव्या घालत होता. ”स्टेज वर चढले म्ह्णून काय झालं ती माणसं नाहीत का?” असा प्रश्न मी त्याला विचारला पण तो काहीही उत्तरला नाही. त्याची बोलायची पद्धत नक्कीच चुकीची होती.  तृतीयपंथी 10,000 रुपयांचा हट्ट धरून बसली होती. तेवढ्यात एक समजूत घालणारी बाई म्हणाली, “त्यांना शिव्या घालू नका नाहीतर ते श्राप देतील”. खूप गदारोळानंतर वातावरण शांत झालं आणि उघडी-नागडी कुपोषित दिसणारी पोरं ‘ढसकण’ (पंगतीच्या ताटातील दहा पदार्थ मिक्स करून बनवलेला खाद्य प्रकार) खात बसली. आम्ही मूळ गावी म्हणजेच चोपड्याला आलो. गावात एक वेगळीच निराशा जाणवत होती, गाव फार उदास वाटत होतं.

काहीही फारस बदललेलं नव्हतं, रस्त्यावरून चालतांना खड्डे बघून “आपण इयत्ता 5 वीच्या वर्गात असतांना सायकलवरून शाळेत जातांना ह्याच खड्यात पडलो होतो” याची आठवण झाली. सोन्याची धूळ उडणाऱ्या देशात प्रदूषणाची धूळ उडत बघतांना आठवलं की, काही दिवसांपूर्वीच वक्तृत्व स्पर्धेतील एका मित्राला मी म्हणाली होती की, तू जळगाव जिल्ह्यातील ही स्पर्धा का करत नाही ? तर त्याच उत्तर होत, ”तिकडे फार धूळ असते एकदा स्पर्धेनिमित्त तिकडे जायचं म्हणजे परत येऊन दोन दिवस आजारी पडायचं ठरलेलं असत आणि मग दुसऱ्या स्पर्धेला खाडा पडतो म्हणून नकोच वाटत जायला”.

सगळं अगदी तसंच तर होत, वर्षानुवर्षे तशीच असलेली खड्डे, तापी काठी आणि सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या कधी काळी सुजलाम- सुफलाम वाटणाऱ्या आमच्या गावात आजही भर उन्हाळ्यात महिन्यात 15 दिवसांनी एकदाच पाणी येते, सातपुडा कोरडा पडलाय, गाव ओसाड झालीयेत,  महाविद्यालयातुन पास-आउट झालेल्या बेरोजगार पोरांचा एक लॉट clg च्या कट्ट्यावर पडून असतो, उरलेला तरुण वर्ग मागील काही वर्षात शिक्षण आणि रोजगारासाठी सुरत आणि मुंबईला स्थलांतरित झालाय. मागील काही महिन्यांपासून पुण्यात नद्यांच्या समृद्धीकरणाचे जागोजागी फ्लेक्स लावलेत (नद्यांमधली जलपर्णी ही अजून काढली गेलेली नाहीये तो भाग वेगळाच) पण इकडेही नद्यांचे नाले झालेत. सुलभ शौचालयांची अवस्था बघून त्या “सुलभ” शब्दावर काळा रंग फेकुन मारावं असं वाटत होतं. पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ अभियानात घरोघरी शौचालय उभारली गेली तर आहेत पण, पंधरा-पंधरा दिवस पाणी येत नाही म्हणून लोक शौचास उघड्यावर जाण्याला पसंती देतात.

सगळं अगदी तसच तर आहे, शिकून काहितरि  मोठं करायचंय या भावनेतून शिकणाऱ्या मुली कमी, पण चांगलं स्थळ येत नाही म्हणून शिकावं म्ह्णून पर्यायाअभावी  Msc chemistry, biology , technology शिकलेल्या  कितीतरी मुली आज ही आठवड्यात एकदा तरी महादेवाचा उपवास करतात, ‘सुनेला 3 मुलीनंतर तरी चौथा मुलगा होउदे’ म्हणून बायका नवस करतात किंवा महाराष्ट्रात स्त्री गर्भपाताला बंधी असल्यामुळे सुरतला (गुजरात) जाऊन चाचणी करतात. बाजारात जातांना रस्त्यात कॉलेजचा ज्युनिअर विद्यार्थी भेटला तो आधीपासूनच फार होतकरू होता.  महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यापासून तो स्वतःचा शैक्षणिक खर्च स्वतःच करीत होता . अचानक भेटलेल्या ह्या भेटीत तो त्याच्या संघर्षाबद्दल बोलत होता. बोलताना, “चांगलं व्हयन तुम्ही गाव माई बाहेर पडीसन शिकाले गयात” अस सांगत होता. “इकडे रोजगार नाही पण, मी आता एका कपड्याच्या दुकानात कामाला आहे. दुकानात ग्राहक नसल्यावर मला मिळालेल्या वेळेत मी अभ्यास करतो. मला पुढे माझा व्यवसाय करायचाय”, असं तो सांगत होता.

सगळं अगदी तसच तर आहे,  या दुःखी भावनेने घरी परतत असतांना महार, मांग आणि चांभारवाड्याला जोडणाऱ्या एका चौकात संविधान चौकाचा मस्त लायटिंगने सजवलेला एक फलक पाहिला आणि बरं वाटलं. आणि राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भाषातज्ञ डॉ. गणेश देवींनी सुरू केलेल्या उपक्रमाची आठवण झाली. पण थोड्याच कालावधीत त्याच जागी तो चौक का उभारलाय? हे ऐकून आपली गावे अविकसित का? या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि परत निराशा दाटून आली.

सगळं अगदी तसच तर आहे, आजीच्या हाताच्या खमंग पुरणपोळीचा सुगंध आजही अगदी तसाच आहे, मांगवाड्यात दारू पिऊन पडलेल्या बापाजवळ रडत बसलेला कुपोषित लेकरू ही तसाच आहे, पाण्यासाठी सरकारी टँकर वर हांडा-कळशी घेऊन भांडणाऱ्या गल्लीतल्या काकूंची अवस्थाही तशीच आहे, रस्त्यावरची खड्डे आणि उडणारी कोरडी धूळ तशीच आहे, शेतीव्यतिरिक्त इतर कौशल्य असूनही रोजगार नाही म्हणून हताश होऊन नांगर घेऊन वावराच्या दिशेने निघालेला तरुण वर्ग देखील तसाच आहे.

आणि सगळं अगदी तसच तर आहे म्हणून हे सगळं मी ही तसंच ठेऊन परतीच्या प्रवासाला लागली आणि सातपुडा ते सह्याद्री प्रवास परत सुरु झाला. पण सगळं तसंच ठेऊन परतीच्या प्रवासाला निघाली खरी पण मनात उडालेल ते प्रश्नाचं वादळ कधी थांबणार ? प्रत्येक वेळेस समाजाकडे बोट दाखवणारे आपण फक्त समाज हीताच लिहीतोय आणि लिहून मोकळ होतोय..एवढच समाधान! हे आजुबाजूला घडत असलेल पाहील की राग येतो आपणाला हे खरयं.. पण ज्यांना याच काहीच घेणं- देणं नाही, ज्यांना त्या भावना ही नाहीत त्यांच्यापेक्षा जास्तीचे दोषी आपण आहोत कारण आपणाला हे समजतय तरीही आपण मठ्ठ आहोत. समाज व्यवस्थेला जाब विचारणारी एक भक्कम फळी आपणाला निर्माण करावी लागेल. आणि मगच पूढच्या वेळेसचा सह्याद्री ते सातपुडा प्रवास एका बदलाची अपेक्षा घेऊन येईल…हीच ईच्छा !

-छाया काविरे