
दडपलेल्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी तसेच समाज आणि व्यवस्थेवर प्रकाशझोत टाकण्यासाठी चित्रपट आणि रंगभूमी या दोन्ही कलांचा वापर करणारे दक्षिण छारा पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्र सेवा दल मध्यवर्ती कार्यालय पुणे येथे भेट देऊन विद्यार्थी व सेवादल कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि माझ्यासारखे अनेक विद्यार्थी जातीव्यवस्था, थिएटर, चित्रपट, सामाजिक माध्यमांमध्ये सुरू असलेले राजकारण अशा कित्येक विषयांवर बोलके झाले. मग सुरू झाली ती चर्चा राजकीय वातावरण तापवलेल्या “द काश्मीर फाईल्स” सारख्या चित्रपटांपासून तर सामाजिक सत्यता मांडणाऱ्या “समीर, जय भीम, झुंड” या चित्रपटापर्यंत..!
अहमदाबाद येथील सेवा दलाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दक्षिण छारा हे तथाकथित कलंकित छारा डिनोटिफाईड जमातीतील पहिले भारतीय फीचर चित्रपट निर्माते, पुरस्कार विजेते, नाटककार, लेखक व कार्यकर्ते आहेत. तसेच गुजरातमध्ये “बुधन थिएटर” हा ग्रुप देखील चालवतात. भारतातील वसाहतवादी राजवटीत “गुन्हेगार जमाती” म्हणून ओळखल्या गेलेल्या आणि अजूनही ऐतिहासिक कलंकाचा सामना करणाऱ्या भारतातील भटक्या विमुक्त जमातीसाठी संविधानिक हमी देण्यासाठी चित्रपट आणि थिएटर सक्रियतेच्या माध्यमातून दक्षिण छारा 24 वर्षांपासून अथक प्रयत्न करत आहेत. ते गुजरातमधील आदिवासींना स्वत:चा शोध घेऊन एक कलाकार म्हणून आदर मिळवण्यास मदत करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या कामगिरीने आदिवासी समुदाय ज्या समस्यांशी झगडत आहेत त्यांना दृश्यमानता आणण्यास मदत झाली आहे. त्यांच्या या कामगिरीमध्ये संवैधानिक हमींसाठीचा लढा अधिक ठळकपणे प्रकाशझोतात आला आहे.
“ब्रिटीश काळात १८७१ च्या गुन्हेगारी जमाती कायद्यांतर्गत मूळतः ‘गुन्हेगार जमाती’ म्हणून सूचीबद्ध केलेल्या शेकडो जमातींपैकीच छारा ही एक डिनोटिफाईड जमात आहे. १९५२ च्या गुन्हेगारी जमाती कायद्यान्वये अधिसूचना रद्द केली असली तरी लोकांचे या जमातीबद्दल अजूनही मत परिवर्तन पूर्णपणे झालेले दिसत नाही. त्यांच्यापैकी बरेच जण जन्मत: किंवा सवयीने गुन्हेगार म्हणूनच ओळखले जातात आणि समाजात आजही बहिष्कृत म्हणून जगतात”, असे दक्षिण छारा त्यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगाबद्दल बोलतांना व छारा समुदायाची आजही जनसामान्यात असलेली ओळख दाखवतांना म्हणाले. तसेच प्रा. डॉ. गणेश देवींच्या “पेंटेड वंर्डस” या पुस्तकातील “छिछियारी”, बिजोन भट्टाचार्य यांच्या जीवनातील “नब्बना” (सुनेहरी फसल आयेगी) प्रसंगांमुळे जन्माला आलेला राजकिय नारा आणि आताचा “अच्छे दिन..” हा नारा ह्यातली तफावत, असे अनेक संदर्भ विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी मांडले.
पारंपारिक चित्रपट आणि जाहिरातींना बगल देऊन उपेक्षित समाजातील प्रश्नांना चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न दक्षिण छारा करत आहेत. त्यांनी 46 हून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे, विविध महत्त्वाच्या आणि वादग्रस्त मुद्द्यांवर 84 डॉक्युमेंटरीस बनवल्या आहेत, सात थिएटर गट विकसित केले आहेत आणि उपेक्षित समाजातील 300 लोकांना थिएटरमध्ये प्रशिक्षण देखील दिले आहे.
बुधन थिएटर-
फेब्रुवारी 1998 मध्ये, भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील पुरुलिया जिल्ह्यात राहणाऱ्या बुधन साबरला पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. काही दिवसांनी बुधनचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांनी असा दावा केला की त्याने त्याच्या “गमछा” ने तुरुंगाच्या कोठडीत स्वतःला गळफास लावला, परंतु तपासात पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचे उघड झाले. या घटनेनंतर भारतीय साहित्य समीक्षक व भाषाशास्त्रज्ञ प्रा. गणेश देवी आणि प्रख्यात बंगाली लेखिका व कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांनी बुधन थिएटरची स्थापना केली आणि बुधन थिएटरचे पहिले नाटक दक्षिण छारा लिखित आणि दिग्दर्शित, ”बुधन बोलता है” याचे सादरिकरण केले गेले. त्यांच्यासाठी हे नाटक केवळ बुधनच्या निर्दोषतेबद्दल नव्हते, तर ते बुधनच्या म्हणजेच भारतातील डिनोटिफाईड ट्राइब्स (DNT) बद्दल पोलिसांच्या अमानवी वर्तनाबद्दल होते.

चित्रपट ”समीर”-
2008 मध्ये अहमदाबादमधील 21 बॉम्बस्फोटांची विनाशकारी दृश्ये कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी दक्षिण निघाले तेव्हा “समीर” या चित्रपटाचा जन्म झाला. चित्रपटाचे नाव आधी धुसर (राखाडी) असे होते. हे चित्रपट एका निर्दोष मुस्लिम अभियांत्रिकी विद्यार्थ्याबद्दल आहे, ज्याला दहशतवाद विरोधी पथकाने त्याच्या रूममेटचा शोध घेण्यास मदत करण्यासाठी ताब्यात घेतले, ज्याचा बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग असल्याचे मानले जाते. दहशतवाद हे मुख्यत्वे धर्माशी जोडले गेलेले आहे पण, या चित्रपटात दक्षिण, अर्थव्यवस्थेचा आणि हिंसाचाराचा संबंध पाहतात आणि ”समीर” या चित्रपटातून “अर्थव्यवस्था खाली आल्यावर दहशतवादाच्या घटना नेहमी का वाढतात?” असा प्रश्न समाज आणि राज्य या दोघांसमोर उपस्थित करून सेन्सॉर बोर्डाचे घरटे त्यांनी ढवळून काढले.
छारा असे चित्रपट का बनवतात?
चिपको आणि नर्मदा बचाव आंदोलन यांसारख्या चळवळींच्या व्यापक धारणांसह, अडचणींमध्ये वेढलेल्या आदिवासींची प्रतिमा दाखवण्यासाठी, त्यांच्या जंगलांचे आणि पवित्र पर्वतांचे संरक्षण करण्यासाठी ते लढत आहेत. आदिवासी लोकांचे जमीन, जंगल आणि पाण्यासाठी अथक संघर्ष आहेत. पण आज ही आपल्यापैकी किती जणांच्या मनात त्यांचे अजूनही एक ठराविकच चित्र आहे. दक्षिण छारांसारखे दिग्दर्शक दमदार चित्रपट बनवून आदिवासींच्या संघर्षांबद्दलची आपली समज वाढवण्यास मदत करतात.
दक्षिण छारा यांच्या कलात्मक आणि सामाजिक कामगिरीसाठी मिळालेले प्रतिष्ठित पुरस्कार-
• “द लास्ट मॅन” चित्रपटासाठी केरळच्या आंतरराष्ट्रीय माहितीपट लघुपट महोत्सवात “केरळ राज्य पुरस्कार-२०२१” प्राप्त.
• जानेवारी २०२२ मध्ये “बुधन पॉडकास्ट” साठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार” प्राप्त.
• “द लास्ट मॅन” चित्रपटासाठी जानेवारी २०२२ मध्ये पिकासो आइन्स्टाईन बुद्ध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ”सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक” आणि “सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार” प्राप्त.
• राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकारद्वारे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार, “Mahatma Gandhi Biannual Award for creative writing (2012-13)” “बुधन बोलता है” या नाटकासाठी प्राप्त.
ह्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सेवा दल साथी प्रमोद मुजुमदार, अभ्यासिका समन्वयक व पूर्णवेळ कार्यकर्ते निलेश निंबाळकर, पुणे शहर सेवा दल मंडळ सदस्य राकेश नेवासकर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष कबीर पळशीकर, पुणे शहर राज्य मंडळ सदस्य ममता परेड, मध्यवर्ती कार्यालयातील सेवा दल साथी, अभ्यासिकेतील व वसतिगृहातील सेवा दल साथी तसेच छात्र भारतीचे विद्यार्थी उपस्थित होते.
-छाया काविरे
9022535608.