
कर्नाटकातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या हंपीत जणू प्रत्येक दगडात इतिहास दडलाय! इथली प्राचीन मंदिरं आणि ऐतिहासिक ठिकाणं पुराणांची-इतिहासाची पानं उलगडायला भाग पाडतात. हंपीचा संबंध रामायणकाळाशी असल्याचं सांगितलं जातं. हनुमानाची आणि वालीचा भाऊ सुग्रीव यांची पहिली भेट इथंच झाली होती, अशी पौराणिक आख्यायिका आहे. ह्या परिसराशी संबंधित असलेल्या रामायणकाळातील अनेक आठवणी इथल्या लोकांकडून सांगितल्या जातात.
हे नगर प्राचीन काळी किष्किंधा ह्या नावानं ओळखलं जाई. वालीचा मुलगा अंगद ह्याची ही तेव्हा राजधानी होती. पुढं काळाच्या आणि इतिहासाच्या ओघात ह्या शहराची नावं विजयनगर आणि नंतर हंपी अशी बदलत गेली. हंपी ही विजयनगर साम्राज्याची पहिली राजधानी होती. हंपीला लागूनच अनेगुंडी/अनागुंडी नावाचं गाव असून त्याच्याच परिसरात अंजनाद्री नावाचा पर्वत आहे. याच पर्वतावर हनुमानाचा जन्म झाल्याचं सांगितलं जातं. हनुमानाची आई अंजनी व हनुमान यांचं, तसंच भगवान रामाचं मंदिर ह्या पर्वतावर आहे.
विजय विठ्ठल मंदिर
विजय विठ्ठल मंदिर हेही हंपीचं प्रमुख आकर्षण आहे. देवराय द्वितीय (सन १४२२ ते १४४६) याच्या काळात हे मंदिर बांधलं गेलं. हंपीतील स्थानिक लोक सांगतात त्यानुसार, ‘महाराष्ट्रात पंढरपूर येथील मंदिरात आज जी मूर्ती आहे ती इथल्याच मंदिरातून तिकडं स्थलांतरित करण्यात आली होती. त्यामुळेच ‘कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु’, ‘कानडा राजा पंढरीचा’ असे उल्लेख संतांच्या अभंगरचनांमधून आढळतात, तसंच ह्या समान धाग्यामुळं कर्नाटकातील हरिदास आणि महाराष्ट्रभरातील वारकरी आषाढी एकादशीला भक्तिभावानं पंढरपुरात येतात.’
कर्नाटकातीलच एक विख्यात संत पुरंदरदास या मंदिरात भजनं गात असत. या मंदिराच्या प्रांगणात भव्य असा दगडी रथ आहे. सध्या चलनात असलेल्या पन्नास रुपयांच्या मोरचुदी रंगाच्या नोटेवर जे चित्र आहे ते याच रथाचं आहे.
चोरी केल्यास असा होता कायदा
हंपीतील स्थानिक लोक सांगतात त्यानुसार, ‘प्राचीन काळी या शहरातील लोक हिरे, मोती, रेशीम यांचा, तसंच घोड्यांचा व्यापार करत. असत. सुमारे शंभर किलोमीटरच्या परिघातलं हे ठिकाण प्राचीन काळी ह्या परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ मानलं जात असे. शनी-शिंगणापूरमध्ये घरांना आणि दुकानांना जसे दरवाजे नसायचे तसेच इथल्या बाजारपेठांमधील दुकानांनाही दरवाजे नसत. दुकान बंद करायच्या वेळी हिऱ्या-मोत्यांच्या थाळ्यांवर फक्त कापड पांघरलं जाई. ‘चोरी करणाऱ्याचे हात-पाय छाटले जावेत’ असं त्या काळी राजाचं फर्मान असायचं. त्यामुळं चोरी करायला लोक साहजिकच कचरत.
रोमसारखंच शहर
डोमिंगो पेस ह्या पोर्तुगीज प्रवाशानं विजयनगरला सन १५२० मध्ये भेट दिली होती. ‘क्रॉनिका डोस रैस द बिस्नागा’ (क्रॉनिकल ऑफ द किंग्ज् ऑफ विजयनगर) या शीर्षकाचा त्याचा प्रवासवर्णनपर ग्रंथ असून ‘विजयनगर हे रोमसारखंच मोठं, अतिशय सुंदर, तसंच जगातील सर्वोत्तम शहर आहे,’ असं मत त्यानं त्यात नोंदवून ठेवलं आहे.
ऐतिहासिक हंपी
‘जगात हंपीइतकं दुसरं मोठं शहर नाही’ असं पंधराव्या शतकातला पर्शियन राजदूत अब्दुर रझाक ह्यानंही नमूद करून ठेवलं आहे. ‘हंपी हे तुंगभद्रा नदीकाठचं एक समृद्ध, श्रीमंत आणि भव्य शहर होतं. पर्शिया (इराण) आणि पोर्तुगाल येथील विविध व्यापारी आपला माल विकण्यासाठी इथल्या बाजारपेठांमध्ये येत असत,’ अशी नोंद पर्शियन आणि युरोपीय प्रवाशांनी, विशेषतः पोर्तुगीज प्रवाशांनी, करून ठेवलेली आढळते.
नंतरच्या काळात दक्षिणेतील मुस्लिम राजवटींनी एकत्र येऊन विजयनगर साम्राज्याचा पराभव केला. सन १५६५ मध्ये या राजवटींच्या एकत्रित सैन्यानं राजधानी हंपी जिंकली, लुटली आणि नष्ट केली. त्यानंतर हंपी हे शहर ‘भग्नावशेषा’त रूपांतरित झालं.
‘विजयनगरची कथा ही विजय आणि विनाश ह्यांची शोकात्म कथा आहे,’ असं सार्थ वर्णन विख्यात अमेरिकी इतिहासकार विल ड्युरांट यांनी आपल्या ‘आवर ओरिएंटल हेरिटेज : द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन’ या ग्रंथात केलं आहे.
वर्तमानकाळातील हंपी
हंपीमध्ये सेंद्रिय शेतीतून केळीच्या बागा बहरल्या आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीला धक्का न लावता दगडांमध्ये इथं आजही शेती केली जाते. केरळ, तामिळनाडू, गुजरात अशा विविध राज्यांतील सांस्कृतिक उत्सवांचं चित्रण करणारी शिल्पं इथल्या वास्तूंमध्ये आहेत. सलोखा जपणारे अनेक राजे इथं होऊन गेल्याचं म्हटलं जातं.
हंपीतील प्रवासादरम्यान मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट ही की, या शहरातील मूळचे लोक अतिशय आत्मीयतेनं आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. रिक्षाचालक, वयोवृद्ध मंडळी…असे सगळेजण आपल्या मोडक्यातोडक्या हिंदीत हंपीचा इतिहास आपल्याला सांगतात.
– छाया काविरे















