मेरी प्यारी अम्मी ❤️

ग्रामीण भागात वाढणाऱ्या मुलींवर घरगुती कामाचं compulsion च असतं; पण माझ्या आईनं मला कधीच ‘तू मुलगी आहेस म्हणून तुला घरातली कामं आलीच पाहिजेत,’ असं सांगितलं नाही. तिला शिक्षणाची आवड; पण पाठीमागं तीन लहान भावंडं असल्यामुळं त्यांच्या सांभाळासाठी आई शिकली नाही. मात्र, तिच्या तिन्ही भावंडांना तिनं २८-३० वर्षांपूर्वी शाळेत पाठवलं. तिच्या लहानपणीच तिचे बाबा – म्हणजे माझे नाना – गेले. मोक्कार दारू प्यायचे म्हणे. नेहमी दारूच्या नशेत असल्यामुळं एका नातलगाच्या मर्डरचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. नाना तुरुंगात गेला. आणि, नानी तिच्या चार लेकरांसह बेघर झाली. नानीच्या चार मुलांमधली थोरली लेक म्हणजे माझी आई. मेरी प्यारी अम्मी ❤️

धुळे जिल्ह्यातल्या शिरुड नावाच्या खेडेगावात आईचं ऊर्फ अनिताबाईचं बालपण गेलं. गावातल्या चौकात नानी चप्पल शिवायचं काम करायची. आणि, आई पेन पकडायच्या वयात कटरणी (चप्पल शिवायची सुई) पकडून चपला शिवायची. या माय-लेकींनी मिळून काबाडकष्टानं आपल्या नवऱ्याच्या आणि बापाच्या – म्हणजे माझ्या नानाच्या – बेलसाठी पैसे जमवले. जिल्ह्याच्या पोलीस ठाण्यात ते पैसे जाऊन दिले. पोलीस म्हणाले, ‘लवकरच त्याची सुटका होईल. तुम्ही जा आता.’ दिवस गेले; पण तुरुंगात गेलेला नाना परत आलाच नाही. तो बेपत्ता झाला. 

चार लेकरांची जबाबदारी नानीवर पडली. नानी चांभारी काम करायची. ती दिवसभर कामात bussy. त्यामुळं आई तिच्या भावंडांची देखरेख करायची. पुढं लहान वयात आईचं लग्न झालं. पुढच्या दोन वर्षांत तिला मी झाले. जेव्हापासून मला आठवतं, मी तिला कधीच निवांत जगताना पाहिलेलं नाही. आधी घरात गॅस नव्हता म्हणून जळण (लाकूडफाटा) आणण्यासाठी तिला लांब लांब जावं लागे. आई तो लाकूडफाटा डोक्यावर घेऊन यायची. दिवाळीत कापूस वेचायला जायची आणि वर्षभर शेतातली इतर कामं मिळतील तशी करायची. शेतात कामं नसली की ही पप्पाला चपला शिवण्यात मदत करायची. 

पुढं ‘बाटा’ वगैरेसारख्या कंपन्या आल्या आणि चांभाराच्या हातावरचं काम गेलं. रापी (चामडं कापायचं एक अवजार) निकामी झाली. मग आईनं किराणा दुकान टाकायचं ठरवलं. मात्र, काही दिवसांतच शेजाऱ्यापाजाऱ्यांनीही किराणा दुकान टाकलं. मग आई टेलरिंग काम करायला लागली. मात्र, घरातली परिस्थिती बिघडतच चालली होती. गावाकडं रोजगार नाही. आम्हा भावंडांच्या शिक्षणाचा खर्च सोसेना, म्हणून आम्ही काही नातलगांच्या मदतीनं मुंबईत स्थलांतरित झालो. आणि मग पुन्हा सुरू झाला आईचा दहा बाय दहाच्या खोलीतला संसार. 

मुंबईत आल्यावर आई धुण्या-भांड्याच्या कामाला जाऊ लागली. सकाळी दहा ते रात्री दहा असं तिचं शेड्युल पॅक असायचं. घरातली कामं बघत ती बाबाच्या खांद्याला खांदा लावून झटली. या सगळ्यात तिनं कधीच माझ्यावर कोणत्याच गोष्टीसाठी दबाव आणला नाही. ‘तुला जे आवडतंय ते कर. फक्त भविष्यात माझ्यासारखी वेळ तुझ्यावर येऊ नये यासाठी शिक’, असं ती म्हणायची. 

मध्यंतरी ती प्रचंड आजारी पडली होती. जवळपास दोन वर्षं. वातावरण बदलावं म्हणून आम्ही भावंडांनी आई-बाबांना पुण्यात शिफ्ट केलं. आई तब्येतीनं आता बरी असते; पण तिची हाडं झिजलीयेत काम करून करून. आयुष्यभर पडेल ती कामं करत आलीय ती. आयुष्यातल्या कठीण काळातही ती कधी डगमगली नाही. मुलगी म्हणजे तिची मैत्रीण म्हणून तिचं सोसणं मी ऐकत आणि बघत आलीय. ‘बाईचा संसारच तिच्यासाठी सगळं काही असतं’, असं ऐकत वाढलेली ती. आमच्यासाठी अनिताबाईनं बाबासोबत फार संघर्ष केलाय. 

शाळेत असताना आम्हाला वसंत बापट यांची एक कविता होती. हल्ली त्या कवितेल्या बाभूळझाडासारखीच भासते ती मला. ऋतू बदलत गेले. वाइटापेक्षाही वाईट दिवस येत गेले; पण ही जागची हलली नाही. अगदी खालील ओळींप्रमाणे : 

अस्सल लाकूड, भक्कम गाठ

ताठर कणा टणक पाठ

वारा खात गारा खात

बाभुळझाड उभेच आहे ।।१।।

देहा फुटले बारा फाटे

अंगावरचे पिकले काटे

आभाळात खुपसून बोटे

बाभुळझाड उभेच आहे ।।२।।

अंगावरची लवलव मिटली

माथ्यावरची हळद विटली

छाताडाची ढलपी फुटली

बाभुळझाड उभेच आहे।।३।।

जगले आहे, जगते आहे

काकुळतीने बघते आहे

खांद्यावरती सुतारांचे

घरटे घेउन उभेच आहे ।।४।।

टक टक टक टक

चिटर फटर चिटर फटर

सुतारपक्षी म्हातार्‍याला

सोलत आहे शोषत आहे ।।५।।

आठवते ते भलते आहे

उरात माझ्या सलते आहे

आत काही कळते आहे

आत फार जळते आहे ।।६।।

अस्स्ल लाकूड, भक्कम गाठ

ताठर कणा टणक पाठ

वारा खात गारा खात

बाभुळझाड उभेच आहे ।।७।।

Happy birthday ammi ❤️

– तुझीच सावली, 

छाया अनिता लक्ष्मण